सकाळी सकाळी जिज्ञासा आली, "काकू, आम्ही सगळेजण सोनंनाणं द्यायला जाणारे, आरोहीला पाठवता का आमच्याबरोबर?"...
आजचा हा दिवस आणि तो पहिला दिवस...
मला आठवतो, तो दिवस जन्माष्टमीचा...
रिमझिम पाऊस सुरू होता. मॅंगोनेस्टमध्ये नुकतंच आम्ही आमचं घरटं सजवत होतो.
इमारतीच्या समुहावर निरोप मिळाला, 'दहीहंडी फोडायला सगळ्या गोपगोपिकांनी संध्याकाळी सहा वाजता मैदानावर जमावे.'
आम्ही मॅंगोनेस्टमध्ये राहायला आल्यापासून फारशी कुणाशी ओळख झाली नव्हती. एकमेकांना जाणून घ्यायला हा उत्सव साजेसा आहे, असा विचार करून आम्ही दोघं आरोहीला घेऊन खाली गेलो.
इमारतीच्या खाली पहिल्या मजल्याच्या उंचीपर्यंत बांधलेली दहीहंडी, फुलांच्या माळा, सोबत तितकाच उत्साह वाढवणारं संगीत, रिमझिम पाऊस... असं एकदम मोहवून टाकणारं वातावरण होतं.
मुलामुलांच्यात चर्चा सुरू झाली...
"ए, ती बघ कोण आलीय."
"तुला माहितीय का ती?"
"ती बोलतेय बघ कशी. अरे तिला सरळ चालता येत नाही, आजारी आहे का?"
"हे कोण? नवीन आलेत का? ही किती वर्षांची असेल?"
अशी नेहमीची कुजबूज कानावर पडली...
मी त्यांना जवळ बोलवत होते पण कोणीच जवळ फिरकलं नाही.
हंडी फोडून, प्रसाद घेऊन सगळे पसार झाले, नजरेतली उत्सुकता कायम ठेवून.
दिवस असेच सामान लावण्यात जात होते.
दरम्यान किशोरनी दोन तीनवेळा बोलून दाखवलं, "इतके दिवस झाले, तरी तुला कोणाशी ओळख करून घेण्यात फारसं स्वारस्य दिसत नाही."
"होतील की ओळखी, घाई काय आहे?"
'गणपती उत्सवात सक्रिय सभासद होणार असाल तर नावे द्या.' असा समुहावर फतवा निघाला. हीच ती वेळ, मानून मी लगेचच नाव दिलं.
भेटी झाल्या, सजावटीच्या कल्पना मांडल्या गेल्या. कोणी काय करायचं, यादी झाली.
"गणपतीला फक्त आरतीच असते का? इतर काही कार्यक्रम?" मी विचारलं.
"दरवर्षी एखाद-दोन कार्यक्रम ठेवतो मुलांसाठी."
"मी अंदमान निकोबार बेटांचे फोटो दाखवून माहिती सांगू?"
"अरे वा! छानच की. काकू, तुम्ही तुमचा कार्यक्रम कराच."
"ठीक आहे, मी करते कार्यक्रम, फक्त कार्यक्रम सुरू करताना पहिली पाचदहा मिनिटं मी विशेष मुलं, त्यांचे आजार, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्यातले चांगले गुण, याबद्दल थोडी माहिती करून देईन."
"नक्की करून द्या काकू, अतिशय गरजेची आहे ही माहिती."
अखेर तो दिवस उजाडला.
वय वर्षं चार ते चौदा या वयोगटातील मुलं आणि काही पालक असे पंचवीसएक जण होते.
टीव्ही शेजारी मी उभी, लॅपटॉपवरून फोटो दाखवणारा किशोर आणि शेजारी खुर्चीवर आरोही.
सुरूवातीला सगळ्या मुलांची नजर आरोहीवर होती.
ठरल्याप्रमाणे मी विशेषत्व म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्य, त्यांच्यातील चांगले गुण, शारीरिक मानसिक वाढ.... वगैरे मुलांना कळेल असं उदाहरणासहित सांगायला सुरवात केली. जसजशी मी माहिती सांगत गेले, तसतसे मुलांच्या चेहर्यावरचे बदलते भाव मी टिपत गेले. 'आरोही' पुस्तक आणि त्यातले काही फोटो दाखवले, तेव्हा तर त्यांची उत्सुकता आणखीनच वाढली.
"ठीक आहे, आता आपण बेट म्हणजे काय ते बघू." असं बोलून मी माझा एक तासाचा कार्यक्रम सुरू केला. मुलांना बेटांच्या नवलाईचं सगळंच अप्रूप वाटत होतं. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन मी कार्यक्रम संपवला.
"मुलांनो खूप वेळ बसून आहात, आता आम्ही आरतीची तयारी करतो, तोपर्यंत बाहेर फिरून या."
सगळी मुलं बाहेर न जाता आरोहीच्या भोवती जमा झाली.
"आरोही मला हाय फाय कर, आरोही माझं नाव .... आहे, तू म्हण ना.
चिन्मय, वेद, आदित्य, जिज्ञासा, पूर्वा, उर्वी, तन्वी, कस्तुरी, रुद्राणी, मनस्वी, अन्वी, अनन्या आणि इतर दोन आरोही.. सगळेच तिच्याकडून आपलं नाव कसं म्हणतेय ते ऐकायला उत्सुक झाले होते.
"काकू, आम्ही उद्या आरोहीच्या बाहुल्या बघायला येऊ का? तिला चालेल का?"
"हो, या की. कधीही या."
झालं... दुसर्या दिवसापासून मुलामुलींची झुंड घरी येऊ लागली. आरोहीच्या सगळ्या लाडक्या बाहुल्यांची नावं तिच्याकडून विचारणा सुरू झाली.
मग बाहेरच्या मुलांच्या गप्पा ऐकून आम्ही हसत बसलो...
"अगं, तिच्याकडे बाहुल्या आहेत ना, सगळ्या बाहुल्यांना नावं आहेत आणि ती नावं तिला सगळी पाठ आहेत."
"आई, आरोहीकडे या टोकाकडून त्या टोकापर्यंत बाहुल्या आहेत. त्यात ना तन्वी आहे, वर्षा आहे, मधुरा, कियारा, मुग्धा, रश्मि, सोनाली....... अरुण बाळ आणि लुल्लू बाळ पण आहे. कसं काय इतकी नावं तिला पाठ आहेत?"
त्यानंतर कधी कोणी मुलं आईबरोबर भेटली, की...
"आई, या बघ आरोहीच्या आई."
"काकू, एका दिवसात तुम्ही काकू सोडून आरोहीच्या आई झालात." तन्मयची आई म्हणाली.
आरोहीला पाहिल्यापासूनची मुलांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आता त्यांना मिळाली होती.
"काकू, आम्ही बाहेर अंगतपंगत केलीय, आरोहीला घेऊन या ना."
"काकू, आता रोज दांडिया खेळायला आणि भोंडल्याचा फेर धरायला आरोहीला खाली घेऊन याल ना?"
आता परिस्थिती अशी झालीय, 'आओ जाओ घर तुम्हारा....'
मुलांना प्रत्येक गोष्टीत आता आरोहीची उपस्थिती गरजेची वाटू लागलीय.
निमित्त झालं, माझी फक्त ती पाच मिनिटं…
राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा