सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

उप

 

सरपंचांनी दुसर्यांदा सत्तेवर आल्याआल्याच 'उप'चा शोध सुरू केला. त्यांना आता 'उप'सरपंच नेमायची गरज वाटतेय की काय? पण त्याचा 'उप'योग होणार आहे का? का फक्त 'उप'चार म्हणून नेमायचा आहे? 'उप'जत हुशार असलेल्या सरपंचांनी एखाद्या 'उप'टसुंभाची नेमणूक केली तर सगळी 'उप'टा'उप'ट व्हायची. त्याची 'उप'युक्तता नसेल तर त्याचे 'उप'देश काय कामाचे? शिवाय त्याचा 'उप'द्रव किती होईल याची कल्पना तरी आहे का?
एखाद्या पदाचा 'उप'भोग एकटयानं घेतला तर कोणाचा 'उप'देश ऐकायला नको.
'उपा'ध्यक्ष, 'उप'सभापती या 'उपा'धी देऊन त्याचं 'उप'योजन योग्यप्रकारे नाही केलं गेलं, तर 'उपां'त्य फेरीतच बाद व्हायची वेळ यायची. उगाच 'उप'स्थितांचं 'उप'हास्य बघावं लागायचं.
अशा 'उप'रोधी परिस्थितीत 'उप'ग्रहावर आसरा शोधायला लागायचा आणि मग 'उपा'हार न मिळता 'उप'वास करावा लागेल. किंवा 'उप'नगरात जाऊन एखाद्या 'उप'वनात बाबाजींची 'उपा'सना करावी लागेल.
या स्थितीत कोणतीही 'उप'मा त्यांना देणं म्हणजे 'उप'हास केल्यासारखं वाटेल.
असले 'उप'द्रव मागे लावून न घेता एखाद्या 'उप'वराप्रमाणे आलेल्या परिस्थितीत 'उप'रणं खांद्यावर टाकून 'उप'योजित नेमणुकीचा 'उप'भोग घ्यावा. 'उप'रा कोणीतरी नेमून फक्त 'उप'मर्दच होईल.
खरं तर सरपंचांना 'उप'देश करण्याचा माझा अजिबात मानस नाही, उलट त्यांची 'उप'युक्तता दर्शवण्यासाठी त्यांना एखादा 'उप'हार देऊन 'उप'कृत करावे, असंच वाटतं. त्यांनी आता कोणतेच 'उप'पद नेमू नये.
त्यांच्या कामाबरोबरच आता त्यांनी एखादा 'उप'न्यास लिहून त्याची 'उप'योगिता सर्वांसमोर आणावी अशी 'उप'रती त्यांना होवो! त्याचा 'उप'सर्ग सहज साध्य होणारा असेल तर 'उप'भोक्ता अनेक असतील. त्या 'उप'न्यासाचा प्रचंड प्रमाणात 'उप'सा होऊन त्याची अनेक 'उप'उत्पादनं निर्माण व्हावीत!
त्यांच्या या 'उप'युक्त कार्यात त्यांना कोणाचा 'उप'द्रव होऊ नये हीच इच्छा!
  • राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...