सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

आठवणीतली_भाजी

 आठवणीतली_भाजी

“अगं, यावेळचा विषय काय दिलाय बघितलास का? छान विषय आहे.”
वैशालीताईंचा फोन आला…
भाजीवर काय लिहायचं, ते कळेना. एकदा कधीतरी भल्यामोठ्या दुधीला संपवताना कसं नाकीनऊ आलं होतं, ते लिहिलं होतं. मग ठरवलं, इतरांचे लेख वाचूया.
वाचता वाचता माझ्या डोळ्यांसमोर आली ती भाजी, भरपूर कोथिंबीर घातलेली अंडाभाजी.
माझी मोठी नणंद आणि मेव्हणे पहिल्यांदाच घरी आले होते. मी आपली माहेरच्या पद्धतीनं साग्रसंगीत गोडाधोडाचा स्वयंपाक करत होते. तीन चार दिवस झाले, तरी मी त्यांच्या आवडीच्या जेवणाचं नाव काढत नव्हते. मला तरी काय माहीत, यांना पार्टी म्हणजे श्रीखंड, गुलाबजाम नकोत तर तंगडी पाहिजे. न राहवून अखेर ताईंनी किशोरला ते आणायला पाठवलंच. किशोर तर काय एका पायावर तयार.
जसा तो बाहेर गेला, तसा मी भराभर भाताचा कुकर लावला, पोळ्या केल्या, माझी भाजी केली. त्यांच्यासाठी ताटभर कांदे कापून, आलं लसूण वाटण करून ठेवलं. कांदे परतून ठेवले. इथपर्यंतची तयारी मी केली आणि स्वयंपाकघरातून मी बाहेर पडले. भाऊ-बहीण एकदम उत्साहात.
कुकरच्या शिट्ट्या झाल्या. सूप पित असतानाचे .... आवाज आले. एकंदरीत घरात खुशीचा माहोल होता, तो त्यांचा होता. मी वाट बघत होते, कधी एकदा जेवणं होतील आणि कधी एकदा कट्टा साबणाने धूऊन काढते.
“ताई, मला तू सांग, तसा मी रस्सा करतो.” किशोर म्हणत होता.
“घाल ना रे अजून तेल, तिखट वाढव अजून. पाणी कमी झालं बघ, घाल आणखी एक तांब्याभर.”
असे सगळे आवाज आतून येत होते. झणझणीत रस्सा तयार झाल्यावर हातानं फोडलेले कांदे घेऊन जेवणाची पानं वाढली गेली. मी जरा लांबच, नको तो वास, असं वाटत होतं मला.
समोर कढईत भाजी बघितली, “बापरे! इतका रस्सा! चार दिवस खात बसणार का?” मी बोलून गेले.
“आम्ही उद्या गेलो, तरी किशोर खाईल. असूदे. तू तर काही त्याला करून देत नाहीस. पोट आणि मन भरेपर्यंत खाईल.” नणंदेचा टोला.
मी काहीच न बोलता जेवण केलं आणि आवरासावर केली. साबणाचं पाणी, मग चांगलं पाणी, मग फडक्यानं घासून पुसून कट्टा साफ केला.
दुसर्या दिवशी किशोरचे दुसरे मेव्हणे त्यांच्या तीन मित्रांना घेऊन घरी आले. न कळवता अचानक आले. किशोर ऑफिसला गेला होता, मला काय करावं सुचत नव्हतं.
“तू एकीकडे पोळ्या कर, आणि दुसरीकडे काल आणलेली आठ अंडी उकडायला ठेव.” ताई म्हणाल्या.
आता इतका रस्सा आज पुन्हा करायचा, माझ्या अंगावर काटाच आला होता. पोळ्या करून झाल्यावर मी गपगुमान कांदे कापायला घेतले. तितक्यात ताई म्हणाल्या, “अगं, काल रस्सा खूप पातळ झाला म्हणून पातेलंभर रस्सा काढून ठेवलाय बघ. त्याच रश्श्यात उकडलेली अंडी सालं काढून सोड. (तिला भीती वाटली, कदाचित मी अंडी तशीच सालासकट टाकतेय की काय.) वरून भरपूर कोथिंबीर कापून घाल आणि उकळ, छान लागेल बघ.”
आदलेदिवशीच्या पातेल्यात काय आहे, ते पाहायचं धाडस मी केलं नव्हतं, कारण रस्सा सगळा संपला, असंच मला वाटलं होतं. माझं काम सोपं झालं म्हणून समाधान वाटलं.
सगळ्यांना जेवायला वाढलं, “राजेश्वरी, तुमच्या हाताला चव आहे. अंडाकरी फार छान झालीय. अगदी चिकनकरी सारखी लागतेय.” असं म्हणत पाहुण्यांनी अगदी भरपेट जेवण केलं.
मी गप्प. मनातल्या मनात हसत होते.
अजूनही त्यांना मी केलेली ‘ती’ अंडाकरी आठवते. पण अद्याप ‘त्यात कोणता मसाला घातला होता?’ या प्रश्नाचं उत्तर गुलदस्त्यातच ठेवलं आहे.
  • राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...