शून्य_फुलीचा_डाव_सुखमणी_रॉय
धावतपळत पण उत्साहात चार वाजून दहा मिनिटांनी मी सेंट्रो हॉटेलजवळ पोचले. खरंतर सकाळपासूनच माझी गडबड सुरू होती. सकाळी सकाळी आवरून रावेतला लग्नाला, मग निगडीला तिथून पिंपरीला गेले, मग मेट्रोने संभाजी पार्क आणि शेवटी हॉटेल सेंट्रो. वेळेत पोचते की नाही, अशी शंका होतीच; अखेर प्रबळ इच्छाच ती, सफल झाली.
हॉटेलच्या गच्चीवर प्रसन्न वातावरणात सगळ्यांची लगबग सुरू होती.
डिसेंबर महिना थंडीचा असून देखील दुपार उन्हाळी वाटत होती.
गच्चीवर सभोवार पसरलेली वेलींची जाळी, प्रेमाचं प्रतीकच जणू.
त्यातच छतावरून थोड्याथोड्या वेळानं येणारे पाण्याचे तुषार मन शांत करत होतं.
कदाचित मी धावतपळत आल्यानं मला ते वातावरण जास्तच भावलं.
एकीकडे टेबलावर पुस्तकांचे गठ्ठे, तुळशीची रोपं ठेवली होती. दुसरीकडे सुखमणीताई सगळ्यांशी आपुलकीने बोलत होत्या. त्यांचा मुलगा अविराम, भाची, मैत्रिणी सुलभाताई तेरणीकर आणि रेखाताई कोटस्थाने कुटुंबीय सोबत होते. काही पत्रकार आणि राहिलेले बाकी बहुतेक सगळे मामबोकर.
बर्याच दिवसांनी सगळे मामबोकर भेटत होतो, त्यामुळे एकमेकांचा हालहवाल विचारणं सुरू असतानाच कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अनौपचारिक गप्पांच्या अतिशय सुंदर देखण्या अशा या कार्यक्रमाचं थोडक्यात वर्णन ते असं…
सुरुवात सुखमणीताईंच्या मनोगतापासून झाली.
हा काव्यसंग्रह प्रकाशित करावा की नाही, अशी आंदोलनं मनात सुरू असताना त्यांची मैत्रीण सौ. रेखाताई कोटस्थाने आणि कुटुंबीय यांच्या आग्रहाखातर ‘कवितासंग्रह प्रकाशित करावा’ या निर्णयाप्रत त्यांचा लंबक स्थिरावला.
मामबोकरांचा कार्यक्रम आणि त्यात प्रियाचं मुलाखतवजा सुंदर निवेदन…
निवेदन करताना पडद्यामागच्या एकेक घटना ती उलगडत होती, तेव्हा आश्चर्यमिश्रित आनंद होत होता.
आता आपल्यातल्या बर्याचजणांनी पुस्तकाच्या पडद्यामागच्या घडामोडी अनुभवल्या आहेत पण कित्येकदा आपलं लिखाण प्रकाशकांना दिलं, की संपादन, मुखपृष्ठ आणि सजावट-रचना करायचं काम संपादक बघतात. लेखकाला ते फक्त आवडलं की नाही एवढंच बघायचं असतं.
‘शून्य फुलीचा डाव’ जन्माला येण्यासाठी त्याच्या सजावटीत सहभागी होते, मकरंद गोडबोले. अगदी कलात्मक मुखपृष्ठ-मलपृष्ठ आणि आतील रेखाटने कवितांना अगदी साजेशी अशीच आहेत.
आई एखाद्या गोंडस बाळाला जन्म देते, त्याला सुंदर अंगडी-टोपडी घालून बारसं करतात, तेव्हा ते या जगात स्वतःचं नाव सार्थ करायला तयार होतं; तसंच हे पुस्तकरूपी बाळ तयार झालं. हे निश्चितच मराठी कवितेत मानाचा तुरा मिरवणार आहे.
अतिशय सुंदर मुखपृष्ठ बनवतानाची कहाणी मगो सांगत होते…
ते स्वतः सुप्रसिद्ध गृहशिल्पी असल्यामुळे, त्यांच्या मते, कोणतीही सजावट करण्याचे विचार रात्री मनात ठेवून झोपायचं, सकाळपर्यंत आपल्या मेंदूनं त्यावर सुंदर नक्षी उतरवलेली असते. या मुखपृष्ठाचा विचार मनात असताना, त्यांना झोपेत शाळा-महाविद्यालयाचे दिवस आठवले. वहीचं मागचं पान आठवलं.
आपल्या बहुतेकांच्या आठवणीत असेल, प्रत्येकाच्या वहीच्या मागच्या पानावर अगदी कानाकोपर्यात ‘शून्य-फुलीचा डाव’ खेळलेला असायचा. डाव संपला, की नवीन जागी नवीन डावाला सुरुवात.
या संग्रहाच्या मुखपृष्ठासाठी त्यांनी असाच एक डाव मांडून त्यात शब्दरचना केली आहे.
हाच डाव त्यांनी सागरकिनार्याच्या पार्श्वभूमीवर समर्पकपणे मांडला, यात त्यांची प्रगल्भता दिसून येते.
किनार्यावर उमटवलेली नक्षी एक लाट येते आणि पुसून टाकते; पुन्हा पाटी कोरी करून नवीन नक्षी उमटवण्यासाठी.
ही दोन रूपकं वापरून अतिशय कल्पकतेनं ‘शून्य फुलीचा डाव’साठी मुखपृष्ठ बनवलं.
हे विचार कळले, की आपण पुन्हा एकदा त्या मुखपृष्ठाच्या प्रेमात पडतो.
प्रियाने नंतर बोलतं केलं ते प्रकाशक श्री. पराग लोणकर यांना.
लोणकर सरांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी प्रकाशित केलेला हा पहिलाच काव्यसंग्रह. यातील कविता वाचून ते इतके प्रभावित झाले, की इतक्या वर्षांत आपण कवितासंग्रह प्रकाशित करायचा प्रयत्न का केला नाही, याची चुटपुट त्यांना लागली. अशी त्यांनी प्रामाणिकपणे कबुली दिली. ते म्हणाले, “कविता करण्याचा अनुभव मला नसला, तरी चांगली कविता, सुमार कविता आणि उच्च दर्जाची कविता यातील फरक कळण्याइतकं ज्ञान मला आहे. ‘शून्य फुलीचा डाव’मधील प्रत्येक कविता उच्च दर्जाची आहे.”
निवेदनाबरोबर प्रियाने प्रत्येकाला या संग्रहातील ‘तुम्हाला आवडलेली कविता कोणती?’ विचारलं आणि ती सादर करायला लावली.
त्या कविता ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध होऊन विचार करत होतो; मनात प्रश्न पडत होता, ‘हे रूपक कसं जमलं असावं?’
या काव्यसंग्रहात सुखमणीताईंनी स्त्रीला एक वेगळी ओळख दिली आहे. ती केवळ एक आयुष्य जगणारी व्यक्ती नसून संघर्ष करणारी, आत्मविश्वास असलेली आणि आपल्या जीवनाशी तडजोड करणारी स्त्री आहे. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांनीच त्यांच्या काव्यशक्तीचे कौतुक केले. हा फक्त एक कवितासंग्रह नाही, तर स्त्रीच्या अस्तित्वाच्या लढ्याची एक काव्यात्मक परिभाषा आहे.
कित्येक कविता स्त्रीच्या आयुष्याच्या विविध छटा दाखवतात.
काही कवितांमध्ये तिच्या संघर्षाची आणि तडजोडीची गोष्ट आहे, तर काहींत अस्मितेच्या आणि स्वातंत्र्याच्या ठाम इच्छेचा आवाज आहे.
शब्दाशब्दांमधून स्त्रीच्या भावना, तिचं स्वप्न, तिचं अस्तित्व, तिची एकटीची झुंज, यांचं रूपकात्मक चित्रण केलं आहे.
उदाहरणादाखल या ओळी बघा...
‘गोधडी’
दुःखाच्या रंगी-बेरंगी चिंध्या
जमवल्यास आजवर
आता एक कर :
स्वच्छ धू एकदा सार्या.
इस्त्री फिरव, दिसू देत कोर्या
गडदरंगी कोपर्यात टाक,
मधोमध उलणार्या रेशमी राख. .....
.....
असलेपणाचा सलग वाण
मनातळातून शोधून आण
कर त्याचं बेलाग अस्तर
शीवच अशी गोधडी सुंदर.
पांघरताच ऊब येते खरी,
एवढं करून बघच पोरी.
‘शून्य-फुलीचा डाव’
शून्य-फुलीचा डाव कितीदा खेळलीस तू
आव्हाने जगण्याची अवघी पेललीस तू.
खेळाची अट शर्थीनेही पाळलीस तू,
किती शिताफी, मात प्रसंगी टाळलीस तू.
कधी कुंचले फलक घेऊनी रंगलीस तू,
कधी तबल्याच्या साथीसंगे दंगलीस तू.....
‘समृद्ध’
तू नकोस समजू वठलो वृद्ध, मी तर समृद्ध !
धजावेल ना चिरेबंदीही करण्या मज अवरूद्ध.
शोधत जाईन, पसरत पाळे-मुळे, खोलखोल...
भेटेलच मग मायमातीची स्तन्यस्निग्ध ओल.
झेलिन ऊन नि पाऊसधारा, सोशिन सोसाट्याचा वारा,
धरीन छाया पांथस्थांवर, देइन श्रांत पावलां निवारा.
पालवेन मी पुन्हा कवळण्या आसमंत हा सारा,
मिळेल या फांद्यांवरतीही इवल्याशा पाखरांस थारा.
ऐकता ऐकता भान हरपून जाणार्या या कविता, कानावर पडतच राहाव्यात, असं वाटत होतं.
या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध मराठी लेखिका सुलभा तेरणीकर होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात सुखमणीताईंच्या लेखन शैलीचं, सहजता आणि गहनता यांचा सुंदर मिलाप घडवत केलेल्या या काव्यसंग्रहाचं आणि ताईंच्या इतर सर्वांगसुंदर लेखनाचं कौतुक केलं.
सुखमणीताईंच्या भाचीने त्यांच्या बहिणीचे विचार वाचून दाखवले. शब्दाशब्दांतून बहिणीबद्दल प्रेम, कौतुक दिसून येत होतं.
अविरामने आईबद्दल बोलताना, एक आई म्हणून आणि एक मराठी, हिन्दी, इंग्रजी, पंजाबी, फारसी भाषांची ज्ञान असलेली विदुषी म्हणून ती नेहमीच कशी प्रिय आहे आणि तिच्याबद्दल आदर वाटतो, हे कौतुकाने सांगितलं. या वयात आई आंतरजाल शिकली, यू ट्यूब चॅनेल सुरू करून त्यात व्हिडिओ अपलोड करण्याचं तंत्रज्ञान अवगत केलं, याचं विशेष कौतुक केलं.
या कार्यक्रमाचा समारोप मुखपृष्ठ चित्रित केक (प्रियाच्या कल्पनेतून साकार झालेला) कापून झाला आणि शेवट चविष्ट खानपानाने करण्यात आला.
‘शून्य फुलीचा डाव’ हा काव्यसंग्रह एक नवा अध्याय निश्चितच उघडतो, जो स्त्रीच्या जीवनाच्या विविध पैलूंना समर्पित आहे. याशिवाय काव्यसंग्रहातील काही कविता आध्यात्मिक, आत्मिक चिंतन करायला भाग पाडतात. काही निसर्ग आणि प्रेम कविता मनाला स्पर्शून जातात.
सुखमणीताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या प्रत्येक कवितेत आपल्याला काही अनवट शब्द वाचायला मिळतात, नेहमीच त्यांची शब्दसमृद्धी अचंबित करते. मनातील हळवेपणा अचूक शब्दांत उमटवण्याचं त्यांचं कसब अनुभवायला मिळतं ते ‘मारवा’, ‘गझल असावी’, ‘कवडसे’ यासारख्या काही कवितांमधून. (असं वाटतं, त्यांना ‘मारवा’राग आवडत असावा.)
हा संग्रह केवळ साहित्यप्रेमींनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला विचार करण्यास प्रवृत्त करतो.
त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर,
‘वसा’
माझे-तुझे लोभ-क्षोभ हरवून निरवू दे,
असण्याच्या क्षितिजाशी स्वच्छ पहाट फुटू दे.
पहाटेच्या प्रकाशाचा असो आश्वास सांगाती,
भीती-भिंतींविना भेटू कधीकाळीं गा साकेती.
(फोटो - प्रकाशदादा जोग, अविराम, मिलिंद केळकर यांच्याकडून)
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा