#पुस्तक- द फोर्स बिहाइंड द फोर्सेस
#लेखिका- स्वप्निल पांडे
#अनुवाद- 
भारतीय वीर पत्नींच्या कथा - सैन्यामागील शक्ती
भारतीय वीर पत्नींच्या कथा - सैन्यामागील शक्ती
#अनुवादक- सुनेत्रा जोग
महिला दिनाचं औचित्य साधून आज मला काही खास महिलांची ओळख करून द्यावी, असं वाटलं. खरंतर या महिला, आपली मैत्रीण सुनेत्रा जोग हिच्या ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा - सैन्यामागील शक्ती’ या पुस्तकात आपल्याला भेटतात.
जवानांच्या शूर पत्नींचं पहिलं दर्शन मला २६ जानेवारी २००१ च्या भूकंपाच्यावेळी झालं. भूकंपात स्वतःची घरं मोडकळीला आलेली असताना सगळे जवान बचाव कार्यासाठी गेले आणि त्यांच्या पत्नी घराबाहेर राहून आपलं घर सांभाळत, एकमेकांना आधार देत होत्या. त्यांच्या अधिकारी पत्नी स्वतःचं कुटुंब समजून सगळ्यांना हवं-नको विचारत होत्या. अतीव थंडीमुळे मुलं आजारी पडत होती, तेव्हा त्यांची काळजी घेत होत्या. त्यावेळी सगळ्यांना आपले जवान काम झालं, की परत घरी येणार याची खातरी होती.
पण हेच जवान जेव्हा आपल्या देशाचं रक्षण करायला सीमेवर जातात, तेव्हा त्या पत्नी, मातांची मनःस्थिती कशी असेल? लेह-लडाख, काश्मीरच्या काही भागात दूरध्वनी चालत नाही आणि पत्र पाठवायचं तर ते वाचायला वेळ मिळेल, याची शक्यता कमीच. ‘काही अपघात तर नसेल झाला ना?’ अशी शंका रात्र रात्र मनाला घेरत असते. घर सांभाळत त्या वीरपत्नी कशा एकेक दिवस मोजत असतील, कल्पनाच न केलेली बरी. आपण युद्ध जिंकतो, त्या दिवशी दरवर्षी आनंदोत्सव साजरा करतो. पण त्यासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचा तो स्मृतिदिन असतो, हे आपण विसरतो.
कसं असेल त्यांचं जीवन? सगळीकडे आनंद साजरा होत असताना तिच्या दरवाज्यात सैन्याची गाडी थांबते, त्यातून तिच्या शहीद पतीचं शव असलेली पेटी समोर आणली जाते.
त्या प्रसंगाला तिला सामोरं जायचं असतं…
पुढचं पूर्ण भविष्य अंधारलेलं असतं…
एखादी आई, जी मुलगा लढाईवरून परत आला की, घरात सून आणायची स्वप्नं पाहत असते, मुलगा गेल्यावर तिच्या आयुष्यात पोकळी निर्माण होते.
एखादी नववधू, जी अजून आपल्या नवर्याला धड ओळखत पण नसते, तिला स्वतःला खंबीरपणे उभं राहायचं असतं.
एखाद्या आईला आपल्या मुलांचं संगोपन करताना क्षणाक्षणाला वीरगती प्राप्त झालेल्या नवर्याची अपूर्ण स्वप्नं आठवत असतात, बाप मुलांची मस्ती आठवत असते.
युद्धानंतर सुट्टीवर आल्यावर करायच्या योजना बंदुकीच्या, तोफेच्या धूराबरोबर हवेत विरून जातात.
कसं असेल या वीरपत्नी, मातांचं मनोधैर्य? पुन्हा उभं राहायची जिद्द?
सगळं सगळं आपल्याला वाचायला मिळेल ‘भारतीय वीर पत्नींच्या कथा - सैन्यामागील शक्ती’ या पुस्तकात. खरंतर हे पुस्तक नसून सात वीरपत्नींचं मनोगत आहे. प्रत्येकीचं अलौकिक साहस आहे.
प्रत्येकीचा प्रांत वेगळा, बालपण निराळं, पण देशभक्ती एकच आहे. कोणाच्याच मनोगतात देशासाठी लढताना वीरमरण आल्याबद्दल शल्य नाही.
प्रत्येकीची आयुष्यकहाणी वाचताना अंगावर शहारा येतो, डोळ्यात अश्रू जमा होतात आणि समोर शवपेटी आहे समजून नकळत salute केला जातो. एक कहाणी वाचली, की त्यानंतर काही वेळ, काही दिवस त्याच विचारात जातात. मग दुसरी कहाणी वाचली जाते. प्रत्येक घटना मनात अगदी घर करून जाते.
मी सगळं पुस्तक वाचून झाल्यावर सुनेत्राला फोन केला. तिला एकच प्रश्न विचारला, ‘तू हे पुस्तक लिहायचं धाडस केलंस, अनुवाद करायला किती दिवस लागले?’
कठीण होतं हे शब्दांत उतरवून काढणं, पण तिचा निर्धार होता म्हणून तिला जमलं.
प्रत्येकानं हे पुस्तक निश्चितच वाचलं पाहिजे.
पुस्तकात या सात वीर आणि वीर पत्नींची कहाणी आणि डोंगराएवढं दुःख पेलताना त्यांनी केलेला संघर्ष दिसून येतो.
१. तिच्यासोबत देशानेही अश्रू ढाळले - लेफ्ट नितिका कौल आणि मेजर विभूती एस. दौडियाल, शौर्य चक्र (मरणोपरांत)
२. एक शाश्वत प्रेम कहाणी - तृप्ती नायर आणि मेजर शशीधरन विजय नायर
३. कधीही हार मानू नका - मेजर प्रिया सेमवाल आणि नायक अमित शर्मा
४. शेवटची भेट - सुजाता आणि मेजर सतीश दहिया, शौर्य चक्र (मरणोपरांत)
५. शरीर दोन, आत्मा एक - सारिका गुलाटी आणि कर्नल राजेश गुलाटी, सेना मेडल (मरणोत्तर)
६. एक सशक्त स्त्री - जया महतो आणि लान्स नायक राजकुमार महतो
७. कारगिल प्रेम कहाणी - सौम्या नागप्पा आणि कॅप्टन नवीन नागप्पा, सेना मेडल (शौर्य)
लेफ्ट. नितिका कौल - लग्न होऊन इनमीन दहाच महिने झाले असताना पतीला वीरगती प्राप्त होते. दुःख बाजूला सारून देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी नितिका कौल स्वतः सेनेत सामील होतात. त्यांची जिद्द आणि कठोर मेहनत वाचून मन अस्वस्थ होतं.
शशिधरन नायर - तृप्ती - यांची प्रेम कहाणी अगदी चित्रपटात शोभावी, अशी. साखरपुडा झाल्यावर पत्नीला मल्टीपल स्क्लेरोसीस हा असाध्य आजार होतो. लग्नासाठी घरून विरोध झाला, पण पत्नीच्या शरीरावर नाही तर मनावर प्रेम करणारे शशी पत्नीवर शक्य तितके उपचार करत राहिले. बायकोची काळजी घेणारे मेजर शशी सात वर्षांत सोडून जातात. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला चाकाच्या खुर्चीवर बसून आलेल्या तृप्तीना बघून, त्यांचं धैर्य बघून मन पिळवटून जात होतं.
मेजर प्रिया सेमवाल देखील अशीच धाडशी वीर पत्नी. जवान पती शहीद झाल्यावर सैन्यात सामील होऊन मेजर या अधिकारी पदावर पोचतानाचा प्रवास हादरून सोडतो.
जया महतो यांची कहाणीच निराळी. लग्न झाल्यावर मोलमजुरी, पुरुषांचा मार खाणे, बिनपगारी गुलामी करणे अशा संस्कृतीत आल्यावर पाहिल्याच दिवशी पतीने, ‘शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहशील,’ असं तिच्याकडून लिहून घेऊन जणू करारच केला. खूप त्रास दिला गेला पण खचून गेली नाही. पतीला वीरमरण आलं, तेव्हा हातात कष्टानं मिळवलेली पदवी आणि दोन लहान मुलं होती. खरा त्रास तर तिथून पुढे सुरू झाला. मागास गावातील पद्धती तिला घराचा उंबरा ओलांडू देत नव्हत्या. तिला चेटकी ठरवून त्रास देत होते. लष्करातील अधिकारी पत्नीला हा प्रकार कळल्यावर दुसर्याच दिवशी लष्करी ताफ्याने तिच्या घराला वेढा देऊन तिला बाहेर काढलं आणि आर्मी पब्लिक स्कूलमध्ये नोकरी दिली.
अशा या सगळ्या वीरपत्नींची कहाणी, पती असताना आणि पती शहीद झाल्यावरची परिस्थिती वाचून कधीकधी अंगावर काटा येतो. पण या आणि अशा कित्येक स्त्रिया पुन्हा स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या घराला, मुलांना सावरत आहेत.
पुस्तक वाचून निश्चितच आपल्याला आपल्या अडचणी कस्पटासमान वाटतात आणि मनातली निराशा दूर होते.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सर्वत्र विविध पद्धतीने महिला दिन साजरा होतोय. त्या निमित्ताने महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसतो आहे. या अनन्यसाधारण महिलांना वंदन करून मी सगळ्या मैत्रिणींना त्यांच्यासारखी जिद्द, विश्वास आणि ऊर्जा सकारात्मकता अंगी बाळगण्यासाठी शुभेच्छा देते!
- राजेश्वरी किशोर

 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा