सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

सैनिकांना ऊर्जा

 

“आजपासून काही दिवस आपण आपल्या शूरवीरांसाठी, जवानांसाठी ध्यान करणार आहोत. धाडसी जवानांचं मनोबल, मनोधैर्य वाढवण्यासाठी; ज्यांना जखमा झाल्या आहेत त्यांच्या जखमा लवकर भरून येण्यासाठी त्यांना ऊर्जा देणार आहोत…
या उर्जेशी समरस व्हा… आपल्या हृदयातून हा प्रकाश सार्या विश्वात पसरतोय… आपल्या सैनिकांना बळ देतोय… त्यांचे इरादे नेक आहेत, पक्के आहेत… आणि त्यांच्यावर सूर्यादेवाकडून सोनसळी अभिषेक होतोय… अनुभव घ्या…
या जवानांच्या आईवडलांसाठी, कुटुंबासाठी मनापासून ऊर्जा पाठवणार आहोत. फील करा, घरातली सगळी मंडळी कुठल्या परिस्थितीतून जात असतात, त्यांना बळ देऊया…
आपल्या हृदयातून म्हणा
कल्याणमस्तू! कल्याणमस्तू! कल्याणमस्तू!”
ऋताताईंचा आवाज कानात घुमत होता आणि त्याचबरोबर माझ्या कानात एकच वाक्य ऐकू येत होतं.
“खूपच excited आहे.”
काल संजयशी बोलत असताना मी विचारलं?
“तनय कसा आहे?” (तनय संजयचा मुलगा)
एक बाप सांगत होता,
“ सीमेवर आहे. खूपच excited आहे. भरभरून बोलत असतो, सांगायचं तेवढं सांगत असतो.
इतक्या लवकर अशा प्रसंगांना सामोरं जावं लागेल, असं कधी वाटलं नव्हतं. कित्येकांना आपले मनसुबे मनातच ठेवूनच निवृत्त व्हावं लागतं. तनयच्या आयुष्यात अशी वेळ खूपच लवकर आली. या आठवणी चिरंतन लक्षात राहणार्या असतात. खरंतर अशी वेळ कधी येऊ नये पण तरीही प्रत्येक सैनिकाचं ‘आपण देशासाठी भिंत होऊन सीमेवर उभं राहावं,’ हे स्वप्न असतं. तनय तेच करतोय. आम्हाला अभिमान आहे त्याचा.”
संजयचे हे उद्गार राहून राहून मनात येतायत, उर भरून येतो.
लहानपणापासूनचा तनय, त्याची जिद्द, चिकाटी त्याची मेहनत आठवतेय.
शिकत अभियांत्रिकी होता पण स्वप्नं लष्करात जायची होती. त्यासाठी सकाळी उठून टेकडीवर पळत जायचा, सायकल चालवायचा, इतर शारीरिक मेहनतही खूप घ्यायचा.
सेनेचं खडतर प्रशिक्षण संपवून लेफ्टनंट झाला, तेव्हा त्याला भेटले होते. त्याच्याकडून एकेक किस्से ऐकतानादेखील अंगावर काटा येत होता.
गेल्यावर्षी कमांडो ट्रेनिंगसाठी बेळगावला गेलाय कळलं, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर बेळगाव कॅम्प, ट्रेनिंग सेंटर उभं राहिलं. तिथलं प्रशिक्षण घेताना, उभी भिंत चढताना, तारेच्या वेटोळ्यातून सरपटत जाताना, हातात रायफल घेऊन पळताना… सगळ्या कमांडोबरोबर तनय दिसू लागला.
मग कळलं, तनय बॉम्ब निकामी करण्याचं प्रशिक्षण घेतोय. डोळ्यासमोर बंदिस्त पेहरावात, डोक्यावर खास हेलमेट घातलेला तनय आला.
तनय कॅप्टन झाला…
संजय-वंदनाचा फोन झाला, की प्रत्येकवेळी तनयची सुसाट धावत असलेली प्रगतीची गाडी कळत असते.
प्रत्येकवेळी आनंदमिश्रित कौतुक वाटतं.
चार पाच दिवसांपासून खातरी वाटत होती, तनय सीमेजवळ असणार.
काल फोन केला तेव्हा दोघांच्याही मनात तनयबद्दल फक्त प्रेम आणि अभिमानच दिसत होता.
सुरक्षेच्यादृष्टीने तो काय काम करतोय, कुठे आहे, काही सांगू शकत नाही. पण इतकंच सांगू शकते, देशाच्या सुरक्षेसाठी उभा राहिलेला तनय खूप समाधानी आहे, सावध आणि दक्ष आहे.
भेटेल तेव्हा त्याच्याकडून सगळ्या घटना ऐकायच्या आहेतच.
तोपर्यंत त्याला आणि सगळ्या भारतीय सेनेला भरभरून ऊर्जा देऊया!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...