झपूर्झा_कला_आणि_संस्कृती_संग्रहालय
‘झपूर्झा’– एक संस्मरणीय सहल
कवी केशवसुत यांनी लिहिलेली "झपूर्झा" कविता:
हर्षखेद ते मावळले,
हास्य निमालें,
अश्रु पळाले;
कंटक-शल्यें बोथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितीला?
झपूर्झा! गडे झपूर्झा!
(हसू आणि अश्रू, आनंद आणि दुःख यांसारखे भावनांचे तीव्र अनुभव कमी होतात
आणि एक शांत, आनंदी अवस्था येते. ही मनाची सर्जनशील अवस्था म्हणजे
'झपूर्झा' किंवा एक प्रकारचे झपाटलेपण.)
‘लहानपणीची ही कविता मनात रुंजी घालत असल्याने संग्रहालयाला ‘झपूर्झा’ नाव दिलं गेलं,’ असं अजितकाका गाडगीळ सांगतात.
तिथं भेट दिल्यानंतर प्रत्येकाला हे नाव शब्दशः सार्थ असल्याची जाणीव होते.
आम्हालाही याची प्रचिती आली आणि मनातले शब्द कागदावर उतरले.
काही दिवसांपूर्वी ‘झपूर्झा’ संग्रहालयाला भेट देण्याचा योग आला. ही सहल खास होती, त्याला दोन कारणं होती, एक तर ‘झपूर्झा’चा तो तिसरा वर्धापन दिवस होता आणि दुसरं कारण म्हणजे, खूप वर्षांनी आम्हा मित्र मैत्रिणींचा चमू एकत्र बाहेर जाणार होतो. तीन मित्र जोड्या आणि व्हीलचेअरवर आरोही. तिच्यासाठी ठिकाणाची निवड खूप काळजीपूर्वक करावी लागते, पण ‘झपूर्झा’ने आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून तिला आनंद दिला.
सात एकराच्या निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे ‘झपूर्झा’.
कौतुकानं सांगावंसं वाटतं, की झपूर्झा संग्रहालयाचा परिसर अतिशय सुलभ आणि सर्वसमावेशक पद्धतीने रचलेला आहे. आरोहीला फिरताना कुठंही अडचण आली नाही. सर्व रस्ते, पायऱ्या, चढ-उतार, हे व्हीलचेअर-सुलभ असून विशेष गरजा असलेल्या व्यक्तींनाही अगदी मोकळेपणानं आनंद घेता येतो. इमारतींची रचना, सुशोभीकरण, तिथला निसर्ग- फळाफुलांनी बहरलेला हिरवागार परिसर पाहून मन प्रसन्न होतं.
पुलंच्या मते “साहित्य, चित्र, संगीत, नृत्य, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. कारण पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं ते सांगून जाईल.”
याच सर्व कला आपल्याला ‘झपूर्झा’ या अप्रतिम कलाविश्वामध्ये बघायला मिळतात.
संग्रहालयातील दहा वेगवेगळी दालनं आणि संस्कृती दालन म्हणजे एकेक थक्क करणारा अनुभव! प्रत्येक दालनात वेगवेगळ्या कलाकृतींची मांडणी अतिशय कलात्मक पद्धतीनं केलेली आहे.
त्यातील काही दालनांची ओळख…
भान हरपून टाकणारी राजा रवी वर्मा, एम एफ हुसेन, जामिनी रॉय, आबालाल रहिमान आणि कित्येक दिग्गज चित्रकारांची रेखाटनं, चित्रं, त्यांचे फोटो.
हेवा वाटेल असे शंभर ते दोनशे वर्षांपूर्वीचे सोन्याचांदीचे दागिने- त्यात सूर्यहार, चंद्रहार, कोल्हापुरी साज, तन्मणी, नथ वगैरे… पूर्वी स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या पण आता दुर्मिळ झालेल्या चांदीच्या वस्तू- ताट, वाटी, पातेली, ताम्हण, नक्षीकाम केलेले ट्रे, अत्तरदाणी, गुलाबदाणी, चांदीची भातुकली, कृष्णाचा पाळणा, चांदीची भलीमोठी अत्तरदाणी वगैरे…
मन मोहून टाकणारं अप्रतिम पैठणी दालन- पुरातन पैठणी आणि त्यावरची कलाकुसर, पितांबर, शेला, पगड्या असे सर्व रेशमी वस्त्र वगैरे... पैठणीच्या काठांचे विविध प्रकार असतात, हे मला तिथं पाहिल्यावरच कळलं. त्यात नारळी काठ, खवले, आसावली, शिकारी, रुईफूल काठ, सूर्यफूल काठ आणि घुंगरू काठ असलेल्या पैठणी. अद्भुत कलाकुसर!
बहुतेक दालनांच्या प्रवेशद्वारात लक्ष वेधून घेणारे सुंदर कोरीवकाम आणि नक्षीकाम केलेले पेटारे.
प्रभात चित्र गॅलरीमध्ये मराठी चित्रपटातील दिग्गजांचं योगदान फोटोंमधून दिसून येतं. यात फोटो, चित्रं, चित्रपटात वापरलेल्या वस्तू, शूटिंग करायला लागणारे कॅमेरे, किल्लीवर चालणारा रेकॉर्ड प्लेयर, प्रभात चित्रपटाच्या जुन्या दगडी records, सुस्थितीत ठेवलेली विविध वाद्यं. तसेच चित्रशाळा छापखान्यात छापलेली शंभर वर्षांहून जुनी पुस्तकं, मासिकं, चित्रं जतन केलेली पाहता येतात.
‘लाइट ऑफ लाइफ’ नावाने असलेल्या दालनात जहाजांवर वापरायचे जुने दिवे, वेगवेगळे लाइट्स, झुंबर, कंदील, अगदी सायकलचा दिवा सुद्धा पहायला मिळतो. महालात वापरले जाणारे मोठे कलात्मक दिवे, देवापुढे लावायचे पंचारतीचे दिवे आणि धातूच्या समया पाहून आपण थक्क होतो.
काही धातूशिल्प अप्रतिम आहेत. जसे लालूप्रसाद शॉ यांचा बाबूगिरी, म. गांधी, डोळे नसलेला धृतराष्ट्र, अंगठा तुटलेला एकलव्य…
छापील चित्रं असलेले जुने चौकोनी डबे, काडेपेटीची देशी विदेशी असंख्य खोकी, आगगाडीची आणि फलाटाची बदलती रूपं आणि बरंच काही अद्भुत आहे; ते पाहण्यातच खरी मजा आहे.
पारंपारिक वाद्यं, खेळणी, ग्रामीण जीवनाची संस्कृती, जुन्या काळातील घरगुती वस्तू, कापड विणण्याची साधनं अशा अनेक गोष्टी बघताना जुना काळ डोळ्यासमोर तरळतो.
विशेष म्हणजे चार सहा महिन्यांनी या वस्तूंची जागा दुसर्या वस्तू घेतात. त्यामुळे दरवर्षी ‘झपूर्झा’ला भेट दिली तरी त्यात वेगळेपण असणार आहे. अजितकाकांनी गेल्या तीस चाळीस वर्षांत संग्रह केलेल्या अंदाजे ३०,०००हून जास्त वस्तू आहेत पण एकावेळी त्यापैकी काहीच आपण पाहू शकतो.
झपूर्झाची ही अद्वितीय संकल्पना श्री. अजित गाडगीळ यांची आहे – जे प्रसिद्ध पु. ना. गाडगीळ अॅण्ड सन्सचे मालक आहेत. लहानपणी घराजवळ असलेल्या बालगंधर्व रंगमंदिरात दर रविवारी भरणारी प्रदर्शनं पाहून मनातली सुप्त इच्छा ‘झपूर्झा’च्या रूपात त्यांनी प्रत्यक्षात साकारली. तेव्हापासून आजतागायत प्राचीन वस्तूंचा संग्रह करण्याची आणि त्यांचं जतन करण्याची विशेष आवड जोपासलेली आहे. विशेष म्हणजे, समाजभान ठेवून त्यांनी संग्रहालयात कर्मचारी म्हणून स्थानिक रहिवाश्यांनाच कामाची संधी दिली. यामधून केवळ सांस्कृतिक वारसाच जतन झाला नाही, तर स्थानिक समाजालाही अर्थपूर्ण रोजगार मिळाला, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
आमची भेट झपूर्झाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने झाली, संपूर्ण आठवडाभर विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केले गेले होते. नादब्रह्म समूहाचा संगीत कार्यक्रम आम्ही पाहिला. आरोहीने तो अगदी मनापासून ऐकला आणि आनंद घेतला. तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान आणि तिचा उत्साह माझ्यासाठी खूपकाही सांगून गेला.
मुलांसाठी लावलेले चित्रकला आणि रंगकामाचे स्टॉल हे आरोहीसाठी पर्वणीच ठरले. तिनं रंगवलेली चित्रं तिच्यासाठी आठवणींचा खजिना बनली आहेत. तिथे रमून गेल्यामुळे आता ती सतत “आपण परत झपूर्झाला जाऊ या” असं सांगत असते. तिच्या त्या सहज, निरागस मागणीत त्या ठिकाणाचा जिव्हाळा दिसतो.
संग्रह बघताना लहान मुलं कंटाळून जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी दर शनिवार रविवारी विविध कार्यक्रम आयोजित करतात.
दालनांच्या फेरफटक्यानंतर संग्रहालयातील उपहारगृहात घेतलेलं घरगुती जेवण आणि नंतर अनुभवलेली निसर्गरम्यता – जसं की प्रसन्न शिवमंदिर, खडकवासला धरणाचं स्वच्छ शांत पाणी, यांनी आमचा दिवस संस्मरणीय केला.
‘झपूर्झा’ म्हणजे केवळ संग्रहालय नाही – ती एक संस्कृतीची जपलेली शिदोरी आहे. आपल्या परंपरेचा, पूर्व जीवनशैलीचा आणि माणसातल्या कलागुणांचा अद्भुत संगम आहे. आरोहीसारख्या विशेष गरजांच्या व्यक्तींनाही मनमुराद अनुभव घेता येईल, असं ठिकाण फार कमी वेळा आढळतं आणि झपूर्झा त्यातलंच एक आहे.
ही सहल आमच्या सर्वांच्या मनात कायमचं घर करून गेली आहे. झपूर्झा हे ठिकाण प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावं, असं मनापासून वाटतं.
राजेश्वरी





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा