सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

यथा_काष्ठं_च_काष्ठं_च कविता

 अचानक ती आली…

जशी झाडीत सापडावी वाट हरवलेली,
तशी एकेक ओळ मनात उमगलेली.
शब्द आले, मागं मागं धावत,
सुचली वाक्यं, फुलली भावना मनात.
मी लिहिलं, मनसोक्त लिहिलं
जणू स्वतःलाच उधळून दिलं.
पानं भरत गेली,
रात्र फुलत गेली,
डोळ्यांत जाणवे थकवा,
पण मनात होता गारवा.
ती उर्मी, माझी सखी…
एक वेडी सावली,
एक नदी उधाण आलेली.
मग...
न सांगता निघून गेली
अचानक आल्यापावली.
ना निरोप, ना थांबणं,
ना "परत येईन"चं म्हणणं.
अचानक वहीची पानं कोरी
लागली खुणावायला मनोमनी.
हातात धरून पेन…
बघतेय मी तिची वाट,
मनात अडकलेल्या विचारात,
एखादी नजर पुन्हा यावी…
एखादी रेखा पुन्हा उमटावी,
आणि पुन्हा ती उर्मी यावी.
आताशा जाणवतं…
दोन लाकडं सागरात
अनाहूतपणे भेटतात,
पुन्हा हरवतात लाटात.
तशीच माझी ती उर्मी…
आताशा नाही येत मनात,
शब्द मागे टाकून गेली ध्यानात.
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...