सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

तंत्रज्ञान_बदललं__कौशल्यवृद्धी_झाली_पण__संवेदनशीलता???

 तंत्रज्ञान_बदललं__कौशल्यवृद्धी_झाली_पण__संवेदनशीलता???

(खरंतर मला @everyone, @followers असं काही लिहायला आवडत नाही पण आज गरज वाटली.)
मध्यंतरी ‘जल्लोष दिव्यांगांचा, Purple Festival’ मध्ये मी ‘दिव्यांग साहित्य’ या विषयावर परिसंवादात भाग घेतला होता. या साहित्याची गरज काय? त्यांच्या समावेशकतेसाठी प्रयत्न का करावेत? त्यासाठी समाजाची काय जबाबदारी आहे? असे काही मुद्दे मी मांडले होते.
त्या समारंभात सहभागी असलेल्यांना ‘सन्मानपत्र’ वितरणाचा कार्यक्रम काल होता.
त्यासाठी दिव्यांग भवनात आले तेव्हा फक्त औपचारिक कार्यक्रम असेल, असं वाटलं होतं. पण तिथली ऊर्जा, सुविधा, आणि माणूसकी पाहून इतकं चांगलं कार्य सुरू केल्याबद्दल खरोखर कौतुक वाटलं.
त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर,
‘दिव्यांग भवन फाउंडेशन, मोरवाडी’ हे एक समर्पित पुनर्वसन केंद्र आहे, मुलाच्या निदानापासून त्याचे उपचार, कौशल्य-प्रशिक्षण, रोजगार‑स्वरोजगार मार्गदर्शन, आणि सामाजिक समावेशासाठी कार्य सुरू आहे. म्हणजे विशेष मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचा स्वीकार, त्याची प्रगती, प्रशिक्षण आणि तो स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीचं मार्गदर्शन एकाच छत्राखाली सुरू आहे.
तिथं असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा, प्रशिक्षित कर्मचारी, आणि विविध योजनांमुळे हे केंद्र दिव्यांग व्यक्तींच्या आत्मसन्मान व सक्षमीकरणाचं मूर्त उदाहरण ठरत आहे.
कार्यक्रम सुरू असताना केंद्रात काही पालक उपचारांसाठी आले होते तर काही उपचार घेऊन परतत होते.
कार्यक्रम आटोपून मी भवनातून बाहेर पडले.
मनात तिथं दिल्या जाणार्या सुविधांबद्दल कौतुकमिश्रित आदर निर्माण झाला होता.
तीस वर्षांपूर्वी अशा सुविधा नव्हत्या. पालकांना एकेका उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पळावं लागत असे. आता तर एकाच ठिकाणी सगळे उपचार, विशेष म्हणजे पालकांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी पण समुपदेशन उपचार.
किती सकारात्मक बदल झालाय ना?
त्याच नादात चालत ६००-६५० मीटरवर असलेल्या मेट्रो स्टेशनवर आले.
तिकीट काढून फलाटावर आले तोपर्यंत मनातल्यामनात माझी, एक आई म्हणून पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताच्या पालकांची तुलना सुरू होती.
रविवार दुपार तीन वाजताची वेळ असून देखील मेट्रोला गर्दी होती.
काहीजण माझ्यासारखेच दिव्यांग भवनमधून आलेले होते.
मेट्रो आली. दरवाजे उघडले आणि एकच पळापळ सुरू झाली. काही तरुण मुलं, मुली चपळाईनं आत शिरले. वयस्कर, कडेवर मुलं घेतलेल्या आया, एकजण पायात व्यंग असलेले काठी टेकत चढायचा प्रयत्न करणारे दादा… तरुण पिढीने या सगळ्यांनाच मागं सारलं होतं.
मला बसायला जागा मिळाली होती, ती मी त्या काठी टेकत येणार्या दादांना दिली. माझ्याजवळ कार्यक्रमात कर्णबधिर व्यक्तींना सांकेतिक भाषेत समजावणार्या ताई आणि एक कर्णबधिर ताई उभ्या होत्या, शेजारी दोघी आया आपल्या दीड दोन वर्षांच्या मुलांना कडेवर घेऊन उभ्या. मुलं कंटाळली होती, भुकेजली होती पण आया असाहाय्य.
गाडीत बसलेली सगळी तरुण मंडळी मोबाईलमध्ये डोकं घालून आभासी जगात वावरत होती.
उभ्या उभ्या आमच्या तिघींच्या गप्पा सुरू होत्या. ताई वाणिज्य शाखेच्या प्राध्यापक असून अतिशय सुंदररित्या त्या कर्णबधिर मुलांशी सांकेतिक भाषेत संवाद साधताना पाहिलं, म्हणून मी त्यांचं कौतुक करत होते.
विषय निघाला माझ्या लेखनाचा.
मी ‘आरोही’ पुस्तक का लिहिलं? त्यातले इतर उद्देश सांगत असतानाच,
माझा आवाज थोडा चढला,
“पंचवीस तीस वर्षांपूर्वी मी अशीच आरोहीला कडेवर घेऊन बसमधून प्रवास करायचे. उभी असायचे तेव्हा क्वचितच कोणीतरी बसायला जागा द्यायचं. तेव्हा तर मोबाईल नव्हते त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडंतिकडं असायचं, एखाद्याला माझी तारांबळ दिसायची. आता समोर बाळांना घेऊन आया उभ्या आहेत पण ते कोणालाच दिसत नाहीये.”
हे ऐकून आमचं बोलणं ऐकणारी एक बाई उठली, एका आईला जागा मिळाली, दुसरी उभीच.
आज आपण तंत्रज्ञानाच्या झपाट्याने धावणाऱ्या युगात आहोत. १९९०च्या दशकात ज्यांना 'भविष्य' वाटायचं, ते आजचं वर्तमान झालंय.
पूर्वी ज्याठिकाणी फक्त एक रस्ता असायचा, तिथं आता flyovers उभे आहेत.
मध्यमवर्गीयांची एका बसची गर्दी, कैकपटीने सामावून घेणार्या मेट्रोने घेतली आहे.
शाळा-कॉलेजांमध्ये संगणकाचं स्थान केव्हाच पक्कं झालंय आणि मोबाईल हा मानवी शरीराचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
पण…
काल मेट्रोमध्ये मला पुन्हा दिसलं... तेच जुनं दृश्य... फक्त वाहन वेगळं होतं.
या प्रगतीत एक गोष्ट फारशी बदललेली नाही—
माणसाचं मन… त्याची असंवेदनशीलता... त्याचं सामाजिक भान…
काय शिकवतोय आपण आपल्या पुढच्या पिढीला?
फक्त तंत्रज्ञान?
आणि संवेदनशीलता? तिचा तर ऱ्हास होताना दिसतोय ना?
तंत्रज्ञानाने जगणं सुलभ झालंय, पण दुसऱ्यांसोबतची ममत्व भावना मात्र मागं पडलीय.
दिव्यांगांसाठी सुलभता हवीच—पण त्या मागे उभी असते ती एक आई, तिचा संघर्ष, तिची हताश नजर; ती बघायला कधी शिकणार?
तुमची नजर तुम्ही मोबाईलवरून वर कधी उचलणार?
माझ्या लेखनाचा उद्देश कोणालाही दोष देणं नाही—
पण आपण सगळेच एकदा स्वतःला विचारूया:
"मी कुणाला, केव्हा उठून जागा कधी दिलीय का?"
"कुणाची गरज माझ्या मोबाईलच्या स्क्रोलपेक्षा मला कधी मोठी वाटली का?"
तंत्रज्ञान बदलतंय. सुविधा वाढत आहेत. पण ‘माणूस म्हणून प्रगत होणं’ अजून बाकी आहे.
तसं होईल, तर खरंच प्रगती झाली, असं म्हणायला हरकत नाही.
---
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...