*वाघिणीच्या मनातला गोंधळ*
शांत बसले होते मी. दाट झाडीत एका कटट्यावर, जिथून उजेड हळूहळू झिरपत येत होता. माती अजून ओली होती. पावसाच्या थेंबांनी सगळी हिरवाई कडेकडेने फुलून आली होती. जंगल शांत…. एखाद्या ध्यानस्थ ऋषीसारखं... ना आवाज, ना हालचाल...
मी मात्र आतून अस्वस्थ. काहीशी विचारात गढलेली. नजर समोर, सावजाच्या शोधात. डोळे विचारांच्या पलीकडे बघत होते.
इतक्यात... तो आला.
हळूच. पावलांचा आवाजही न करता. मागून आला आणि गळ्याला मिठीच मारली.
माझ्या गळ्याला अलगद चाटायला लागला, हुंकारायला लागला... प्रेमानं... संयमानं..
क्षणभर अंगभर शिरशिरी आली, त्याच्या जीभेचा तो कोमट स्पर्श…ते केवळ चाटणं नव्हतं, तो संवाद होता. कानात काहीतरी गुजगोष्टी सुरु होत्या. शब्द नव्हते, पण भावनांनी भारलेले ते स्पर्श...
"थोडा वेळ थांब ना…"
"तुला भेटायला आलोय…"
"मी आहे तुझ्या सोबत…"
त्याच्या चाटण्याच्या प्रत्येक लयीत एखादा अर्थ दडलेला होता.
माझ्या आत काहीसं हलत होतं.
पण त्याच वेळी दूर कुठेतरी चरणार्या हरणांच्या कळपाचा वास येत होता.
मन म्हणत होतं, "शिकार जवळ आहे… चलायचं का?" शिकारीचे वेध माझं लक्ष खेचत होते.
पण इथे… इथे तो आलाय, त्याच्या मिठीत एक वेगळाच ओलावा आहे. एका साथीचा, विश्वासाचा, प्रेमाचा.
माझं मन म्हणत होतं, "उठ. वेळ जाईल. शिकार निघून जाईल."
पण माझं शरीर स्थिर... त्याच्या स्पर्शानं घट्ट जखडलेलं...
त्याच्या डोळ्यांत फक्त प्रेम आणि माझ्या डोळ्यांत?
संभ्रम.
नजर सरळ समोर, करारी, पण आत मात्र गोंधळ माजलेला.
शिकार करायची की शरणागती पत्करायची?
पोट भरायचं की मन शांतावायचं?
तो अजूनही काही म्हणत होता… नुसत्या स्पर्शातून.
"थोडा वेळ माझी होशील का?"
"हा क्षण विसरू नकोस…"
मी ना काहीच बोलले... ना चटकन उठले, पूर्ण विसरले.
त्या मिठीत थोडी अडकले… आणि थोडी स्वप्नात हरवले.
आज शिकार नसेल जमली…
पण एका मिठीतली शांतता, प्रेम, आणि गुंतवणूक…
हे समाधान मिळतंय… त्या पेक्षा मोठं काय?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा