मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

आरंभ

 

आरंभ - एक नवी सुरुवात 



"आरोही, उद्या शाळेचा प्रोग्रॅम आहे. तू बोलणार ना?"

"हो. पिंक साडी नेसायची.  नेलपेंट लावायचं, पिंक बांगड्या घालायच्या, टिकली पण लावायची."

"हो ग माझे बाई, सगळं करते, तू म्हणशील ते करते फक्त मी काय सांगितलं ते सगळं बोलशील ना?"

"हो.  बोलणार." 

"काय बोलायचं माहीत आहे का, विमानात बसून आपण जातो तेव्हा त्या लाल ड्रेस घालून उभ्या असतात ना तशी तू एयर होस्टेस होणार आहेस. त्या म्हणतात तसं, 'नमस्ते आप कैसे हो। आपका स्वागत है। आपकी यात्रा सफल रहे।' असं तुला म्हणायचं आहे, म्हणशील ना?"  


काल रात्री अशी आमच्या दोघींची चर्चा झाली. निमित्त होतं ते आमच्या पहिल्या ऑनलाइन therapy session मासिक समापन समारोहाचं. 


lockdown  काळातला हा गेला एक महिना माझ्या आणि आरोहीच्या दृष्टीने सर्वात धावपळीचा पण उत्साहवर्धक होता. रोजची सकाळ उगवायची ती, "आज काय स्पेशल असेल"  या विचारानेच. 

"आरंभ तर्फे घेण्यात येणार्‍या ऑनलाइन कार्यशाळेबद्दल अंबिका मॅडमची पोस्ट वाचली आणि हे काहीतरी अद्भुत असणार याची जाणीव झाली. लगेचच मॅडमना फोन लावला. नेहमीप्रमाणे मस्त गप्पा झाल्या. 

पंधरा वर्षांपूर्वी मुलांना वर्गात सोडल्यानंतर बाहेर गप्पा मारत उभे रहाणार्‍या आम्हाला कधी वाटले देखील नाही की, ही ओळख पुन्हा पंधरा वर्षांनी ताजी होईल ते. 

गेल्या वर्षी अचानक एक दिवस अनुराधा राजाध्यक्ष यांनी केलेला एक video माझ्या पहाण्यात आला. गंमत म्हणजे हा video श्रीहरी, अंबिका मॅडम आणि 'आरंभ' बद्दल होता. मी video पाहिला तेव्हा लगेच त्या खाली मेसेज करून माझी ओळख सांगितली आणि त्यावेळचा आरोही आणि श्रीहरी असलेला एक फोटो पाठवला. मॅडमनी पण लगेच ओळखलं आणि गप्पा सुरु झाल्या. 

आरंभची प्रगती त्यांच्या फेसबूक वरच्या वेगवेगळ्या पोस्ट्स मुळे कळत होतीच.

पण मला उत्सुकता होती ती इतकी चांगली नौसेनेतील नोकरी सोडून विशेष मुलांची शाळा सुरू केली याचं. मग काय एक दिवस ठरवलं आणि फोन करून वेळ मागून अगदी मुलाखतच घेतली. विशेष म्हणजे त्याचवेळी एक 'आदर्श शिक्षिका पुरस्कार' त्यांना मिळाला होता. 



"हॅलो, अंबिका, मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप सार्‍या शुभेच्छा! 

एका आदर्श मातेला मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार! वा वा. खूप छान". 

"धन्यवाद राजेश्वरी. केलेल्या कष्टाचं चीज झालं. अर्थात मी करतेय ते काही अशा पुरस्कारांसाठी नाही ग. मी माझ्या श्री बरोबरच सगळ्या मुलांसाठी करतेय."

"या तुझ्या प्रगतीचं श्रेय तुला कोणाला द्यावं असं वाटतं?" माझ्या या प्रश्नाने अंबिका विचारात पडली. 

"खरं सांगू का राजेश्वरी, पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी विशेष मुलांच्या प्रशिक्षणामध्ये BEd करत होते. उद्देश फक्त इतकाच होता की मला माझ्या श्री ला योग्यप्रकारे शिक्षण द्यायचं होतं. त्याला त्याच्या पायावर उभं करायचं होतं. तेव्हा श्री फक्त सहा वर्षांचा होता. नवरा नौसेनेत असल्यामुळे दर दोन तीन वर्षांनी बदल्या होत होत्या आणि तो नवीन जागी गेल्यावर सुरूवातीला खूप बावरून जायचा. त्याला नवीन शाळा, नवीन जागेत स्थिर व्हायला खूप वेळ लागत होता. मुंबईत बदली झाल्यावर माझ्या नवर्‍याने नोकरी सोडली आणि आम्ही चांगली शाळा बघून तिथेच स्थायिक व्हायचं ठरवलं. तोपर्यंत माझं BEd पूर्ण झालं आणि मी श्री च्या शाळेत शिक्षिका म्हणून जाऊ लागले. पण माझी त्याला सामान्य करण्याची धडपड आम्ही रहात असलेल्या इतरांच्या लक्षात कमी यायची आणि श्रीने केलेली धडपड, आवाज, आरडाओरडा त्यांना जास्त त्रासदायक ठरायचा. इतका की दोन ठिकाणी आम्हाला घर सोडायला लावलं. मी तर म्हणते त्या लोकांना त्रास झाला, त्यांनीच मला ही झेप घेण्याची ताकद दिली. 

त्या दरम्यान छोटा मुलगा दीड दोन वर्षांचा होता. मी दोघांनाही हाताने जेवणाचं, शिशू चे प्रशिक्षण देत असे. सतत बोलून तर कधी ओरडून, तास तासभर बाथरूममध्ये श्रीला बसवून, उभं करून मी शिकवायची धडपड करत असे. पण आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास व्हायचा आणि आम्हाला घर बदलायला भाग पडायचं. दोन वेळा असं झाल्यावर ठरवलं. आता बास. आता आपण आपल्या स्वतःच्या घरात जायचं. त्यावेळी हातात असलेला पैसा आणि मुंबईत विकत घ्यायच्या सदनिकेचा ताळमेळच बसेना. आम्हाला मुंबई सोडून जाणं भाग पडलं. मग औरंगाबादला थोडसं गावाबाहेर आमच्या आवाक्यात असलेलं घर मिळालं. फार आनंद झाला त्यावेळी. पण तो आनंद काही फार काळ टिकला नाही. श्री चा आजार दिव्यांगातला स्वामग्न गटात मोडणारा होता. त्यादरम्यान कुठेच अशा मुलांसाठी वेगळ्या शाळा नव्हत्या. मानसिकदृष्ट्या मंदबुद्धी असलेल्या शाळेत त्याला घातलं पण म्हणावी तशी प्रगती होताना दिसत नव्हती. त्याच दरम्यान मला एक मैत्रीण भेटली, तिचाही मुलगा स्वमग्न आहे. त्याचक्षणी ठरवलं या दोघांना आपण शिकवायला सुरूवात  करायची. जाहिरातबाजी करून, मोठी जागा घेऊन मला एकदम झेप घ्यायची नव्हती. या दोन मुलांपासून सुरू केलेली शाळा दोन वर्षातच बावीस मुलांची शाळा झाली. तेव्हा घराजवळच एका छोट्याशा खोलीत सुरू केलेली शाळा मग मोठ्या जागेत सुरू करावी लागली. आज मागे वळून पहाता माझा छोटासा आरंभ एका मोठ्या समूहात रूपांतरीत झालेला दिसतोय. आता शाळेत साठ मुलं आणि एकूण सोळा प्रशिक्षक, कर्मचारी वर्ग आहे. 

सुरूवातीला प्रशिक्षक मिळायला देखील त्रास झाला. कारण जाणूनबुजून या मुलांना शिकवायचं काम कोण गळ्यात घेईल ना? नौसेनेच्या 'संकल्प' शाळेत चार वर्ष श्री होता तेव्हा तिथल्या सोयीसुविधा पाहून मला माझी शाळा तशीच खास करायची होती. स्वमग्न मुलं कधी कधी अति आक्रमक होतात तेव्हा त्यांना शांत करायला मला वेगवेगळ्या खोल्या तयार करायच्या आहेत. एक संगीत उपचार खोली, एक स्पर्शज्ञान खोली, एक रंगीबेरंगी आकाशकंदील असलेली अंधारी खोली, मुलांना सुरक्षितरीत्या पळण्यासाठी मैदान, एक व्यायाम उपचार खोली. या सगळ्यांसाठी आम्ही नुकतीच एक मोठी जागा घेतली आहे. तिथेच एक कायमस्वरूपी मुलांची रहायची सोय देखील मी करणार आहे. खर्च खूप आहे पण जिद्द जबरदस्त आहे. आपल्यानंतर काय? हा प्रश्न दिव्यांग मुलांच्या पालकांना नेहमीच पडतो. अशा पालकांना मला खात्रीशीररीत्या दाखवून द्यायचं आहे की, काळजी करू नका, मी त्यांची सोय करण्याचा 'आरंभ' केलाय. म्हणूनच मी शाळेचं नाव "आरंभ" ठेवलंय. एकदा सुरुवात झाल्यावर मग मी मुलांना आणि पालकांना योग्य ते प्रशिक्षण देता यावे म्हणून बर्‍याच ठिकाणी जाऊन तिथले अभ्यासक्रम अवगत केले. दिल्लीला जाऊन परदेशी तज्ञांकडून मार्गदर्शन शिबीरात जाऊन प्रशिक्षण घेतले. चेन्नई, हैदराबाद, मुंबई मधील विशेष मुलांच्या संस्थेमध्ये वेगवेगळे कोर्सेस केले. या सगळ्याचा मला माझ्या शाळेतील कर्मचार्‍यांना अजून शिक्षित करायला खूपच फायदा झाला.  

जसं जसं  शाळेचं कामकाज वाढत गेलं तसं तसं मला इतर गोष्टी शिकण्याची गरज भासू लागली. शाळा नुसती प्रशिक्षण वर्ग न रहाता स्वयंसेवी संस्था झाली. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी वेगळं प्रशिक्षण घ्यावं लागलं. लग्नापूर्वी वडलांनी करायला लावलेल्या संगणक कोर्सचा उपयोग मला करता आला.  

हळूहळू मला जाणवू लागलं, नुसतं मुलांना शिकवून चालत नाहीये तर पालकांचं समुपदेशन देखील करणं क्रमप्राप्त्य आहे. मुलाला शाळेत तर पालक घेऊन येतात पण त्याचं विशेषत्व मान्य करायला उशीर करतात. सामान्य मुलांप्रमाणे एका वर्षात त्यांच्या मुलाने शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करायला पाहिजे असा अट्टाहास करतात. अशा पालकांना समजावणे खूप कठीण काम असतं. प्रत्येक मुलाची बौद्धिक वाढ ठराविक कालावधीपर्यन्त होत असते. त्यानंतर साधारणतः ती वाढ थंडावते. जर मुलाला काही वर्ष सामान्य शाळेत घातलं असेल आणि मग माझ्याकडे आणलं तर त्याची तितकी प्रशिक्षणाची वर्षं वाया गेलेली असतात. अशा मुलांचा नित्यक्रम मार्गी लावणं फार त्रासदायक होतं. सामान्य हुशारीचा बुद्ध्याङ्क असतो त्यापेक्षा थोडा कमी बुद्ध्याङ्क असलेल्या मुलाला आम्ही दहावी पर्यन्त शिकवून मग त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला कार्यशाळेत प्रशिक्षण देतो. तो काहीतरी आर्थिक कमाई करून स्वतःच्या पायावर उभा राहील याची काळजी घेतो. 

आपल्या मराठी सणांप्रमाणे वस्तु आम्ही तयार करून घेतो. रक्षाबंधनसाठी राख्या, गणपतीसाठी आरास, दिवाळीत दिवे, पणत्या आणि इतर मुलांना करता येतील असे उद्योग त्यांना शिकवतो. त्यात घराची तोरणं करून देतो. यात भेटवस्तू, शुभेच्छा कार्ड, चहाचा कप ठेवता येणारे कोस्टर्स, फुलदाणीत घालायला कापडी फुले आणि बरंच काही आम्ही सध्या ईको फ्रेंडली पदार्थापासून करतो. 

या शाळेमुळे श्रीला काय फायदा झाला असा प्रश्न मला पडला होता... 

  • श्रीने माझं बोट धरून या शाळेत प्रवेश केला आणि आता श्री इतर मुलांना आपलं बोट धरायला देतो. त्याला दिसेल ती मदत तो करत असतो. कधी मुलांना व्यवस्थित बसवणे तर कधी मुलांना भरवणे. कधी मुलांकडून व्यायाम करून घेणे तर त्यांना खेळायला शिकवणे हे सगळं श्री अगदी प्रेमाने करत असतो. त्याला तसं बघितलं की मला अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं. 

  • श्री बरोबरच मला त्याच्या वडलांचा म्हणजेच माझ्या अहोंचा देखील पूर्ण पाठिंबा असतो, अगदी सक्रिय पाठिंबा असतो. त्यांच्यामुळेच तर मी अनेकविध छोटे मोठे प्रशिक्षण अभ्यासक्रम करू शकले. प्रत्येकवेळी त्यांनी पुर्णपणे घराची आणि दोन्ही मुलांची जबाबदारी घेतली. माझ्या प्रत्येक घडामोडीत त्यांचा मोलाचा वाटा असतोच. 

  • आरंभचे काम हळूहळू वाढवत जाताना पालकांसाठी देखील वेगवेगळी शिबिरे आयोजित करून पालकांना सरकारी सवलती, कायदे यांचं ज्ञान देतो. कित्येक पालक सरकारी सवलतींबाबत अनभिज्ञ असतात. 

या सगळ्या गोष्टींसाठी घरच्यांचं पाठबळ आणि आर्थिक पाठबळ असणं अतिशय गरजेचं आहे. मी माझ्या शाळेचा उद्देश कधीच पैसा मिळवणे हा ठेवला नाही. 

नजर न स्थिरावलेलं मूल माझ्या शाळेत प्रवेश करतं आणि त्यानंतर जेव्हा ते मला बघून हसून हात हलवतं तो क्षण मला सार्थकतेचा भासतो. नशिबाने मला साथ देणारे सगळेच माझे कर्मचारी माझ्याप्रमाणेच समर्पित भावनेने काम करतात आणि त्याचं फळ आम्हाला मिळत आहे. 

  

"हो, ग. मी बघतेय ना सध्या ऑनलाइन प्रशिक्षण घ्यायला मुलं किती सरावली आहेत ते. अशीच तुझी प्रगती होत राहुदे  आणि कित्येक आयांना आपलं मूल काहीतरी करू शकतंय याचं समाधान मिळू दे. तू मुलांसाठी हा जो स्वमग्न ते सामान्य असा वसा घेतला आहेस,  त्यात तुला खूप खूप यश मिळू देत.     

   


आरंभ तर्फे आता खास विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी एक महिन्याची कार्यशाळा घेत असल्याचं तिच्याकडून कळलं. Speech, Music, Dance, Art and Craft Online Therapy घेणार होते. 

रीतसर नाव नोंदणी झाली आणि घाबरतच लॅपटॉप समोर आरोहीला घेऊन बसले. 

आजपर्यंत तिने आमच्या zoom meetings बघितल्या होत्या आता आम्ही तिच्या बघणार होतो. 

2,3 दिवसातच मुलं एकमेकांना ओळखू लागली. वय वर्षे 4 ते 30 पर्यंतची सगळी बाळं घेऊन आम्ही आया online व्हायचो. 

सौरभ सर मुलांना बोलतं करत होते तर चेतन सर मुलांना हलवत होते. मंजुषा मॅडम मात्र मुलांना हलवत हलवत बोलतं ठेवायच्या. प्रगती आणि प्राची मॅडमची कला पाहून आरोहीला पण चित्र काढावं असं वाटायचं. 

स्क्रीन वरच्या छोट्या छोट्या खिडकीत बसलेली मुलं पाहून आरोहीला जुन्या शाळेतल्या आठवणी यायच्या. रुची आणि देवांशी तिच्या सगळ्यात आवडत्या होत्या. अनन्या आणि अवनीला उड्या मारताना बघून आरोही फार खुश व्हायची. त्यातच त्यांनी नाच केलेलं, तिच्या आवडीचं गाणं, 'नाच रे मोरा'. मग काय, आमची गाडी खूषच.

रोजचे session सुरू करायचा अवकाश, हिचं लगेच सुरूच व्हायचं, "नमस्ते, आप कैसे हो?" मग तो mike सुरू आहे की नाही, त्याच्याशी काही तिचं देणं घेणं नसायचं. 

2,3 वेळा उत्साहाच्या भरात नाचल्यावर संध्याकाळी तिची शुगर कमी व्हायची. मग काय डोकेदुखी, उलट्या सुरू झाल्या. तिचं तिलाच जाणवलं आणि तिने नाचणं बंदच करून टाकलं. 

अति स्मरणशक्तीचा परिणाम, धोका ओळखून हळूच अंग काढून घ्यायचं चांगलं जमतं तिला. काही वेळा तर उठ म्हणता उठायची नाही. 

आरोही, यापूर्वी ज्या सरांकडून शिकायची, ते सर तिच्याकडून रोज तेच ते पुस्तक आणि त्यातली चित्रे, गाणी पाठ करून घ्यायचे. ती सवय म्हणून की काय, या online शाळेत हे काहीच विचारत नाहीत पाहिल्यावर दिवसभर माझी शिकवणी सुरू राहायची. 'भाज्या सांग, फळं सांग, पक्षी सांग, प्राणी सांग, देव सांग...' सगळी उत्तरं देईपर्यंत माझी सुटका नसायची. 

एकूण काय मरगळलेल्या मुलांना ताजेतवाने  करण्याचे श्रेय तमाम "आरंभ" टीमला जाते. 

अंबिका मॅडम, प्रज्ञा मॅडम आणि त्यांच्या टीमचा उत्साह, सकारात्मक ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. 

आजचा समारोपाच्या कार्यक्रमात शाळेतले विविध गुणदर्शन पहायला मिळाले. आमच्या प्रत्येक बाळांनी उत्तम सादरीकरण केले. 

प्रतिथयश नृत्यांगना, शर्वरी जमेनिस यांची उपस्थिती आणि त्यांचे मनोगत आम्हा पालकांचा उत्साह द्विगुणित करून गेला. त्यांनी सादर केलेली 'मोराचे गर्वहरण' कथा आणि अभिनय वाखाणण्याजोगा होता. वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती प्रशंसनीय होती. 

मधे पंधरा दिवसांची सुट्टी देऊन पुन्हा online कार्यशाळा वर्ग सुरू केले. यावेळी अजून नवीन मुलं लॅपटॉप पडद्याच्या वर्गात आरोहीला दिसू लागली. पण दुसर्‍यांदा सुरू झाल्यावर मात्र आरोही लॅपटॉपच्या पडद्याकडे बघायला नाराज असायची किंवा डोळे बंद करून ऐकत असायची. मला तीचं ते वागणं खटकत होतं. सकाळी उठल्यापासून माझी धडपड सुरू असायची, दुपारी साडे बारा वाजता शाळा सुरू होण्यापूर्वी स्वयंपाक आणि आरोहीचं आवरून मस्तपैकी तासभर आरोहीला जवळ घेऊन बसायचं आणि तिच्याकडून गाणी म्हणून, प्रश्नांची उत्तरं देताना उच्चार स्पष्ट येतील याची काळजी घ्यायची. पण... शेवटी कोणत्याही कार्यात 'पण' हा ठरलेलाच असतो. आरोही नुसती पडद्याकडे बघून देखीलल कंटाळून जायची आणि शाळा संपल्या संपल्या सगळ्यांना टाटा बाय बाय करून झोपून जायची. मग ती दिवसभर मरगळलेली रहायची. शुगर कमी व्हायची. तो महिना असाच 'हो नाही हो नाही' करता करता संपला. मीही तिला फार बघण्याची जबरदस्ती करू शकले नाही. 

सगळा एकत्र परिणाम म्हणा किंवा डोळ्यांचा त्रास म्हणा, पण तिचं डोकं अतिशय दुखायला सुरुवात झाली. मायग्रेनचा त्रास होतो तसा त्रास सुरू झाला. डोकं दुखायला लागलं की उलट्या मग पोट रिकामं झालं की ती झोपणार आणि शुगर कमी होणार. सुरूवातीला तर दिवस रात्रीतून तीनतीनवेळा हा त्रास झाला. डॉक्टरनी सांगितलेल्या गोळ्या सुरू केल्या. त्यांच्यामते हळूहळू हा त्रास कमी होईल. आठ दिवस गेले, पंधरा दिवस गेले, गोळ्या बदलत गेले. allopathy झालं, homeopathy झालं मग अगदी फुलांचे अर्क घातलेल्या गोळ्या दिल्या, acupressure सुद्धा सुरू केलं. त्रास कमी झाला पण तरीही लॅपटॉप मोबाइल, टॅब्लेटचा पडदा बघितला की त्रास होतोच. मला भीती वाटत होती ती तिला परत फिट्स येतील की काय याची. पण फिट्सच्या गोळ्या वेळेवर देत असाल तर मग फिट्सची काळजी करू नका असं डॉक्टर म्हणाले. मग थोडं हायसं वाटलं. पण मुख्य प्रश्न मिटला नाहीच म्हणून मग डोळ्यांच्या डॉक्टरना विचारलं तर ते म्हणतात तिला डोळ्यांना नंबर असणार आहे पण नेमका नंबर ती नीट काढून देणार नाही आणि चुकीचा नंबर असलेला नंबर आणि चष्मा तिच्यासाठी जास्त त्रासदायक ठरेल. त्यापेक्षा तिच्या डोळ्यांना कमीतकमी त्रास द्यायचा आणि डोकं दुखलं तर दुखणं थांबवायची गोळी तिला द्यायची हा एकच मार्ग आहे. 

अखेर सुरू असलेली online कार्यशाळा तिला बघू न देणे इतकेच माझ्या हातात आहे. तिच्या आनंदापुढे तिच्या तब्येतीने हात टेकले असल्याने तिची प्रकृती महत्वाची हे नक्की.    

अजून असंच lock down असेपर्यंत online कार्यशाळा वर्ग सुरू असतील पण त्यात आरोही नसेल याचं अंबिका मॅडम आणि इतरांना देखील वाईट वाटतं, कारण सगळ्यांना पडद्यावर बघितल्या बघितल्या आरोहीचा "नमस्ते, आप कैसे हो?" असा स्वर ऐकायची सवय झाली होती. कधीतरी आरंभच्या विशेष भागात थोडावेळ तिला सगळ्यांना भेटवून आता मी तिच्या डोळ्यासमोरचा लॅपटॉपचा पडदा बंद करते. 

पण 


तेवत्या_आठवणी


#कथा 

#तेवत्या_आठवणी  



ब्रिगेडियर विनोद (सेवानिवृत्त) रोजचा दमछाक होईपर्यंत सराव करुन आपल्या आवडीच्या आराम खुर्चीत बसले होते. शेजारच्या खिडकीतून येणारी, अंगाला स्पर्श करणारी कोवळी सूर्यकिरणे तापायला लागेपर्यंत त्या खुर्चीत ते आणि त्यांचे वाचन सुरू असे. शिसवी लाकडाने बनवलेली ती भारदस्त खुर्ची आणि त्यात बसलेले ब्रिगेडियर साहेब. पंधरा वर्षं झाले निवृत्त होऊन तरी तब्येत अजूनही एखाद्या तरुणाला लाजवेल अशी. भरदार मिशांचे केस पांढरे झाले म्हणून वाढलेलं वय वाटतं, नाहीतर आवाजाची धार अजूनही तितकीच एखाद्याला हुकूम देत आहेत अशी. ऊंची सहा फुटापेक्षा जास्तच, दणकट शरीरयष्टी, सैन्याधिकाराची चाल. कोणाच्या समोर उभे राहिले तर समोरच्याची बोलतीच बंद व्हायची. नजरेतील जरबच त्यांच्या कुशल कर्तव्याची ओळख होती. इतकी वर्षं झाली तरी कधी रोजचा सराव चुकला नव्हता. जेवणखाण, झोप, वाचन सगळं वेळेवर असायचं. पूर्ण कुटुंबाला त्यांच्या या दिनचर्येची सवय झाली होती. एक मिनिट पुढे मागे चालत नसे. 

वर्षातला एक दिवस मात्र त्यांचा स्वतःचा खास असायचा. देशातीप्रेमाने, अभिमानाने, आनंदाने, उत्साहाने सळसळणारा. त्यादिवशी त्यांना त्यांच्या आठवणीत रमायचं असतं. समोर कोणी असेल तर त्याला त्या आठवणींचे एकेक पदर उलगडून दाखवायचे असतात. अगदी सुरुवातीपासून त्यांना स्पष्टपणे डोळ्यासमोर येत असतं. आज त्या सुवर्ण क्षणाचा सुवर्ण महोत्सव होता. मग काय मिनिट अन मिनिट त्यांना आठवायचं होतं, त्यात रमून जायचं होतं..... 


पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ ते मनोमन स्मरू लागले....  

एखाद्या चित्रपटातल्या नायकाला देखील लाजवेल असं ते रूप होतं त्यांचं. सहा फुटाच्यावर ऊंची, पिळदार बाहू, गोरापान वर्ण आणि बोलण्यातला आत्मविश्वास त्यांची प्रतिमा अजूनच उजळवत असे. वडलांना लहानपणापासून आर्मी पोषाखात बघून बघून त्यांचं देखील सैन्यात भरती व्हायचं स्वप्न होतं. कळायला लागल्यापासून मैदानी खेळ, कवायत करून शरीर तगडे बनवले होतं जणू. वयाची सतरा वर्षे पार केली आणि त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी मध्ये प्रवेश घेतला. प्रबोधिनीमधील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भल्याभल्यांनादेखील नकोसा वाटणारा तो रात्रंदिवस करून घेतलेला सराव उत्तम रीतीने पूर्ण झाला होता. सहाध्यायी आता वेगवेगळ्या कामगिरीवर भारतभर विखुरले जाणार म्हणून पदवीदान समारंभ सगळ्यांनी मिळून झोकात साजरा केला होता. टोप्या वर उडवणे, गाणी आणि त्यावर थिरकणे, प्रशिक्षकांबरोबर झालेली पार्टी सगळं वेगळं आणि नवीन आयुष्याची सुरुवात असल्याचं जाणवत होतं.  पुढील प्रशिक्षणासाठी आधी डेहराडूनला एक वर्ष आणि मग सैन्य इंजीनीरिंग कॉलेजमध्ये यंग ऑफिसर ट्रेनिंग कोर्सच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाले. नावामागे देशाभिमान वाटावा अशी लेफ्टनंट ही पदवी लागली होती. कॉलेजमध्ये देखील युद्ध प्रशिक्षण सुरू होते. 

सन १९७०/७१ चा तो काळ होता. प्रशिक्षण पुरे होण्यापूर्वीच भारत पाकिस्तान दुसर्‍या युद्धाचे बिगुल वाजले, लेफ्टनंट विनोद आणि समूहाला युद्धभूमीवर पाठवण्यात आले. जाण्यापूर्वी सगळ्यांना एकेठिकाणी एक दिवस युद्धनीती, कोड्वर्ड, त्यांना प्रत्येकाला पाठवण्यात येणारे ठिकाण, तिथल्या परिस्थितीची कल्पना दिली. त्यांनी कोणत्या कमांडरना रिपोर्ट करायचा ते सांगितलं. कमांडरनी दिलेल्या सूचना पाळायच्या आणि त्याप्रमाणे हमला करायचा. प्रत्येकाच्या हाताखाली काही जवान नेमून दिले. प्रत्येकाची ठिकाणं वेगवेगळी होती. दुसर्‍या दिवशी पहाटे, उजाडण्यापूर्वी हेलिकॉप्टरने एकेकाला त्याच्या तळावर उतरवले गेले. काळाकभिन्न अंधार, डोळे ताणून बघितलं तरी समोर काय आहे ते कळत नव्हतं. टॉर्च पेटवायची अनुमती नव्हती. हळूहळू डोळे सरावले. नाही म्हणायला एक दोन दिवसांपूर्वीच पोर्णिमा होऊन गेल्याने चंद्राच्या प्रकाशाने परिसर उजळला होता. पण राहुटयांना असलेलं कापड आणि जंगल सगळं सारखंच. खिशातला कंपास(दिशादर्शक होकायंत्र) काढला आणि दिशा बघून अंदाज घेतला. कोणतीच हालचाल शत्रूला कळू द्यायची नसल्याने सावकाशीने, सावधपणे हालचाली करणे भाग होते. अखेर एक जवान अचानक समोर आला आणि तो कमांडरकडे घेऊन गेला. त्यांनी पुन्हा एकदा परिसराच्या खाचाखोचा आणि रणनीती समजावली. अशारीतीने आयुष्यातल्या पहिल्या लढाईला लेफ्टनंट विनोद सामोरे जायला सज्ज झाले.  

खरंतर त्यांना खडतर प्रशिक्षणानंतर पोस्टिंग येईल तिकडे जाण्यापूर्वी मित्रमंडळींना भेटायचे, घरच्यांबरोबर थोडा वेळ घालवायचा होता, आईच्या हातचे जेवण जेवायला मन आसुसले होते.  पण जवान म्हणजे चोवीस तास अविरत, अथक देशसेवा हेच खरे.   

०३ ते १६ डिसेंबर १९७१ असं तब्बल तेरा दिवस चाललेले युद्ध अखेर पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावून संपुष्टात आलं.  त्या तेरा दिवसात क्षणाक्षणाला 'माझे मरण म्या डोळा पाहिले' अशी अवस्था असायची. कधीही कुठूनही गोळीबार व्हायचा. सतत जागृत रहावं लागायचं. जवळच टाकलेला एखादा बॉम्ब फुटला की काळीज फुटून जाईल की काय असा कानठळ्या बसवणारा आवाज एकीकडे देशप्रेम जागवत शत्रूला नामोहरम करण्याची जिद्द वाढवत असायचा पण दुसरीकडे  

या युद्धातून आपण सुखरूप घरी जाऊ की नाही याची भीती मनातला आवाज गोठवून टाकायचा. वेळ मिळेल तेव्हा पोटात चार घास घालायचे आणि एकाडएक पहारा देत दुसर्‍याला डोळे मिटायला, पुन्हा लढायला तरतरी यायला थोडावेळ विश्रांती द्यायची. त्यातच जर कमांडिंग ऑफिसरचा संकेत आला तर कुठली झोप आणि कुठले जेवण असं व्हायचं. पहिले चार दिवस तर कोणीच झोपू शकलं नव्हतं. फावल्या वेळात आपल्या बंदुकीची निगराणी राखायची. त्याचबरोबर काहीजण आपल्या कमरेला लावलेल्या खंजीर/कट्यारीला धार लावत असायचे. न जाणो शत्रू आमनेसामने येऊन ठेपला तर बंदूक उचलून नेम धरायला वेळ मिळाला नाही तर त्याऐवजी कमरेचा खंजीर शत्रूचा घात करायला कामी येईल, असा सरळ सरळ केलेला विचार. 

 'आत्ता तर सुरुवात आहे, अजून देशासाठी खूप घाम गाळायचा आहे देवा, नको मला इतक्यात मरण,' असा धावा करावा वाटायचं सगळ्यांना. आपले सहाध्यायी, हाताखालचे जवान युद्धभूमीवर शहीद होत असताना पाहून मन हेलावून जायचं. पण तितकाच शत्रूबद्दल रोष, बदला घ्यायची भावना वाढीस लागायची. अखेर १६ तारखेला शत्रूच्या शस्त्र समर्पण करण्याचा संदेश आला आणि हायसं वाटलं. तरीही तल्लख मन आणि सभोवार दृष्टी फिरत ठेवणं गरजेचं होतं. शत्रूला नामोहरम करून तिथेच आनंद लुटायचा तो क्षण नव्हता. शत्रूचे उध्वस्त केलेले बंकर आणि त्यात सापडणारा दारूगोळा एकत्र करायचा होता. एका उध्वस्त केलेल्या बंकरमध्ये डोळ्यात तेल घालून नजर फिरवत असताना अचानक एक ब्रीफकेस हाती लागली....  



शत्रूच्या बंकरमध्ये हाती लागलेली ती ब्रीफकेस सावधपणे विनोदनी उघडली. आत रोजच्या वापरातल्या काही गोष्टी म्हणजे हातरुमाल, दाढीचे सामान, साबण, कात्री, वगैरे  होत्या. त्याचबरोबर त्यात एक लिफाफा होता... 

 तो उघडून बघताच दिसली ती सुगंधी, गुलाबी कागदावर सुवाच्च अक्षरात लिहिलेली प्रेमपत्रं. पंधरावीस तरी  प्रेमपत्रं होती. प्रत्येक पत्राची सुरुवात आणि शेवट प्रेमळ शेर लिहून केलेली होती. शत्रूत्वाच्या भावनेत देखील ते गुलाबी कागद त्या जवानाचा प्रेमळ कोपरा दाखवत होते. कोणाच्या प्रेमाच्या खाजगी भानगडीत न अडकता विनोदची  शोधक नजर त्यावरच्या तारखांवर गेली. तेरा दिवसात इतकी प्रेमपत्रं? काहीतरी गणित चुकतंय. त्याचवेळी त्यावरच्या तारखेवरून काळात होतं की, त्यातली काही पत्रे तीन  महिन्यांपूर्वीची होती. प्रेमाने ओथंबलेली प्रेमपत्रं आणि सोबत अतिसुंदर, देखण्या प्रेयसीचे फोटो. कोणाही तरुणाला मोहित करतील असे ते फोटो. वाचताना निश्चितच स्थळ काळ विसरून जायला होत असेल तिच्या प्रियकराला. रणांगणावर असताना त्याला वेगळीच ऊर्जा, जिद्द मिळत असेल. लढाई संपवून सुखरूप तिच्याकडे परत जायची इच्छाशक्ती तयार होत असेल, तिचा एकेक शब्द वाचून. 

'आपली पण कोणीतरी अशी वाट बघत असेल का? ती लिहिल का अशी पत्र? आई पण आता घरी गेल्यावर मुलींचे प्रस्ताव समोर ठेवेल.  सध्या इथे तर जगण्याची शाश्वती नाही आणि हा विचार नकोच ते.' लेफ्टनंट विनोद  भानावर आले. 

त्या पत्रांवरून निष्कर्ष असा निघत होता की, म्हणजे पाककडून या युद्धाची तयारी तीन महीने आधीच सुरू झाली होती. विनोदनी त्यातली दोन प्रेमपत्रं आणि तिचा फोटो स्वतःच्या ताब्यात घेतला आणि उर्वरित ब्रीफकेस जमा करणार होते. थोडयाचवेळात उत्तरेकडून एक गाडी येताना विनोदना दिसली. गाडी शत्रूच्या ताफ्यातली होती. लेफ्टनंट विनोद तिथेच बंदूक रोखून उभा राहिले. गाडी अगदी जवळ येऊन थांबली आणि एक अधिकारी खाली उतरला. त्यांना त्यांची शस्त्रं जमा करायची होती. ती कुठे करायची ते विचारत होता. विनोद त्यांना माझ्याबरोबर चला म्हणत होते. शस्त्रागार जरा दूर होते. त्यांनी विनोदनाच त्यांच्या गाडीतून चलण्याचा आग्रह केला. युद्ध संपलं असलं तरी शत्रूवर विश्वास कसा ठेवायचा, त्यांनी जर किडनॅप केलं तर? गाडीतच गोळ्या घातल्या तर? असा विचार त्याक्षणी डोक्यात आला आणि विनोदने  त्या अधिकार्‍याला स्वतःच्या गाडीतून यायला सांगितलं, पाठोपाठ त्यांची गाडी. गाडीत बसण्यापूर्वी त्याची झडती देखील घेतली पण आक्षेपार्ह असं काही त्याच्याकडे नव्हतं. गाडी सुरू झाली आणि नीरव शांततेत फक्त गाडीचा आवाज येत होता. पूर्ण प्रवासात दोघेही काहीच बोलले नाहीत. विनोदना ते नुकताच सैन्यात दाखल झालेले आहेत हे त्याला कळू द्यायचं नव्हतं. दोन्ही गाड्या शस्त्रागाराकडे पोचल्या आणि विनोदनी रीतसर तिथल्या अधिकार्‍यांना सविस्तर माहिती दिली. अधिकारी विनोद आणि पाक अधिकारी बसले होते. सैन्यकारवाई सुरू झाली तेव्हा साहेब त्याला नाव, गाव विचारू लागले.  त्या पाक अधिकार्‍याने त्याचं नाव 'कॅप्टन मन्सूर' असं सांगितलं आणि त्याच्या गावाचं नाव ऐकताच लेफ्टनंट विनोद पुरते उडालेच. 'अरे हा तर आपल्याच गावचा दिसतोय. असं त्यांना जाणवलं.' वडील पण सैन्यात असल्याने दर तीन वर्षानी होणारी बदली एकदा भारताच्या उत्तर सीमेला झाली असताना, विनोद परिवार त्याच गावात काही काळ राहिले होते. आश्चर्य म्हणजे ज्या शाळेत तीन वर्षं त्यांनी धडे गिरवले त्याच शाळेत तो अधिकारी पण शिकला होता. मग काय बर्‍याच वर्षांनी जुन्या शाळेतले कोणी भेटल्यावर बोलतात तसे ते दोघे बोलू लागले. त्या शाळेतल्या शिक्षकांवर, त्यांच्या शिकवण्याच्या लकबीवर, कोणाच्या रागीटपणावर तर कोणाच्या मृदुपणावर त्यांची चर्चा झाली. कॅप्टन मन्सूर विनोदपेक्षा वयाने दोन वर्षांनी मोठा होता.  ते दोघं एकदम त्यांच्या शालेय जीवनात रमून गेले. कारवाईची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा निरोप आला आणि त्यांच्याकडील शस्त्रसाठा जमा करून पुन्हा आल्यापावली परत निघाले. पुन्हा तसेच, विनोद आणि मन्सूर एका गाडीत आणि बाकीचे मागोमाग. आता दोघांच्याही मनात भीतीचा लावलेश देखील नव्हता. फक्त भारताने युद्ध जिंकले  होते आणि ते भारताचे युद्धकैदी होते. गाडीत बसल्यावर विनोदना एकदम त्या ब्रीफकेसची आठवण झाली....


 त्या पत्रांवर नाव कधी मनू तर कधी मन्सूर असेच होते म्हणून त्याला त्या  ब्रीफकेसबद्दल विचारलं.


 विनोदचा प्रश्न संपता संपताच एक लाजेची लकेर आणि आनंदाने चमकणारे डोळे त्यांना दिसले. मग त्याला विनोदनी आपल्या राहुटीकडे नेलं आणि ती ब्रीफकेस दाखवली. प्रेमपत्रांबद्दल विचारलं तर तो थोडासा लाजलाच. त्याला स्वतःकडे ठेवून घेतलेली सर्वात जुनी दोन पत्रं दाखवली आणि फोटो ठेवतोय, असं सांगितलं तर खरं,  पण नंतर त्यांना स्वतःचीच स्वतःला लाज वाटली आणि तो फोटो त्याला परत केला. त्याची प्रश्नार्थक नजर खूप काही विचारून गेली. विनोद म्हणाले, ''असा जर माझ्या प्रेयसीचा फोटो कोणी ठेवून घेतला असता तर मला ते आजिबात आवडलं नसतं आणि म्हणूनच मी हा फोटो तुला परत करतोय. ही दोन दोन पत्रं मात्र मी आठवण म्हणून माझ्याजवळ सुरक्षित ठेवेन.'' त्याला बंदी म्हणून नेण्यापूर्वी मात्र न राहून दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. शत्रू असले तरी त्याक्षणी शाळासोबती म्हणून ही भेट होती.  

त्याला सांगितल्याप्रमाणे विनोदनी त्या दोन पत्रांची फ्रेम करून घेतली. पण मग त्यांच्या पत्नीने ती फ्रेम घरी आणण्यास सक्त मनाई केली. ठराविक वर्षांनी बढती मिळत मिळत लेफ्टनंट विनोद नंतर कॅप्टन, कर्नल आणि शेवटी ब्रिगेडियर पदावर विनोद पोचले. त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या ऑफिस केबिनच्या भिंतीवर ती पत्रं दिमाखात विराजमान असायची. त्यांच्या सेवानिवृत्तींनंतर मात्र ती घरी आणायला बायकोने परवानगी दिली. दरवर्षी या दिवशी ब्रिगेडियर साहेब त्या पत्रांकडे टक लावून बघत बसायचे. ती नुसती प्रेमाची निशाणी नसून भारतीयांच्या जेतेपदाची आठवण होती. 

कॅप्टन मन्सूरची आठवण जशी मनात आयुष्यभर कोरली गेली होती तशी अजून एक ब्रिगेडियर अस्लम यांची आठवण ब्रिगेडियर साहेबांच्या मनात साठून राहिलीय...  

 पाकिस्तानची कोंडी करून यश टप्प्यात आलं होतं. गोळीबारी कमी झाली होती, शत्रूला शरण येण्याचं आवाहन करत होते. भारताचे ४००० आणि पाकचे त्याच्या दुपटीने सैनिक मारले गेले होते. त्यावेळी नुकतेच लेफ्टनंट झालेल्या विनोदना आपल्या कारकिर्दीची सुरुवातच युद्धापासून होईल असा विचार देखील मनात आला नव्हता. आता सेवानिवृत्तींनंतर ते अभिमानाने सांगत असतात की, त्यांच्या पूर्ण तीस वर्षांच्या कारकिर्दीत जितके प्रसंग आले असतील, त्यापेक्षा सुरुवातीच्या युद्धाच्या एका महिन्याच्या काळात आलेले अनुभव त्यांना सर्वात जास्त समृद्ध करून गेले. एक रक्षक म्हणून, एक माणूस म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून, असा सर्वतोपरी आकाराला आलो असं त्यांना वाटतं. तसं पाहिलं तर इनमीन विशी पार केलेला एक तरुण होते ते तेव्हा पण एक जबाबदार सैन्य अधिकारी बनायला ते अनुभव नक्कीच उपयोगी आले. शत्रूकडून रोज वेगळी आखणी, रोज वेगळी संकटं सामोरी यायची. स्थितप्रज्ञ राहून योग्य तो निर्णय घेणे आणि तोही तत्काल घेणे गरजेचं असतं.   

ब्रिगेडियर विनोदना आठवतेय ती पहाट अजूनही. युद्ध संपायच्या दोन दिवस आधीची पहाट, पूर्वेकडे सूर्योदयाची चाहूल लागत होती. उजाडता उजाडता शत्रू कधी कुठे गोळीबारी सुरू करेल त्यावर जवानांचं लक्ष असायचं. सगळ्यांनी  डोळ्यात तेल घालून, कान टवकारून नेहमी तयारच असलं पाहिजे अशी ती वेळ होती.  डोक्यावर हेलिकॉप्टरची घरघर ऐकू आली म्हणून विनोद आणि त्यांचा सहकारी राहुटीच्या बाहेर आले. हेलिकॉप्टर शत्रूपक्षाचं होतं. सध्या सगळ्यांनाच उठता बसता मोबाइल हातात लागतो तसं, त्यावेळी त्यांच्या हातात आमच्या बंदुका ठेवाव्या लागत होत्या.  जवळ शस्त्रसाठा होताच. ते तेरा दिवस कोणी कधी झोपायचे  आणि कधी उठायचे ते कोणालाच कळत नव्हतं. लक्ष्य एकच, 'शत्रूला नामोहरम करायचं.' ते हेलिकॉप्टर त्यांच्या टप्प्यात आलं आणि त्यांनी त्यावर नेम धरला. ते जमिनीवर कोसळणार इतक्यात त्यातून दोन पॅरॅशूटधारी बाहेर पडताना दिसले.  त्या दोघांना बंदी करायला जवानांना घेऊन विनोद धावले.  त्या दोघांना सहीसलामत पकडून त्यांना बॉसकडे म्हणजेच कमांडर, ब्रिगेडियर माखिजांकडे घेऊन गेले. दोघांच्या पोषाखावरुन त्यातील एक कर्नल आणि दुसरे ब्रिगेडियर आहेत ते समजलं. ब्रिगेडियर अस्लम त्यांचं नाव. आता ते युद्धकैदी होतील, त्यांना बंदी बनवलं जाईल. त्यांचे हाल हाल करतील असा विनोदचा कयास होता. 

परवानगी घेऊन ते ब्रिगेडियर माखिजांच्या केबिनमध्ये दोघांना घेऊन शिरले. एक नजर पुरेशी होती, दोघांना एकमेकांची ओळख लागायला. ब्रिगेडियर माखिजां उठले आणि, 'अस्लम तू? कया बात, कितने दिनो बाद?' असं म्हणत दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. विनोद ते दृश्य बघतच राहिले. पॅरॅशूट घेऊन उडी मारलेला आणि त्यानंतर त्यांच्या ताब्यात आलेला तो अधिकारी ज्या तणावाखाली वाटत होता आणि त्यांना सहीसलामत पकडलेली विनोदची टिम उल्लेखनीय कामगिरी बजावली म्हणून अभिमानाने, ताठ मानेने उभे असताना एकदम असा विरोधाभास पहायला मिळणं म्हणजे आक्रीतच की. 

खरं आक्रीत तर पुढे होतं... 

कमांडर ब्रिगेडियर माखिजां, ब्रिगेडियर मधुसुदन आणि ब्रिगेडियर अस्लम हे तिघे अलिगढ विद्यालयात  एकत्र शिक्षण घेतलेले. गंमत म्हणजे तिघेही रूम पार्टनर. दोन वर्षं एकत्र राहिलेले. शिक्षण पूर्ण झाले आणि सैन्यात सामील झाले.  त्याच दरम्यान फाळणी झाली. अस्लमचे गाव पाकिस्तानात म्हणून ते पाक सैन्यात दाखल झाले आणि हे दोघं भारतीय सैन्यात. मग काय दोघांच्या जुन्या आठवणी काढत गप्पा सुरू झाल्या. विनोद त्यावेळी मागे उभा राहून आ वासून ऐकत होते. फाळणी नंतर तब्बल तेवीस चोवीस वर्षांनी भेटत होते दोघं आणि तेही असे अनपेक्षितपणे. गप्पा संपल्या की दोघांना कैद करायची होती. विनोद कागदोपत्री कारवाई होईपर्यंत वाट पहात उभे होते. 'आता भेटुच पुन्हा' असं म्हणत दोघांनी पुन्हा एकदा गळामिठी मारून एकमेकांचा निरोप घेतला. 

विनोदना समोरचं दृश्य भारत पाक क्रिकेट मॅच सारखं वाटत होतं, मैदानावर शत्रू आणि मॅच संपली की मित्र. पण मग विनोदनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि पुढची कारवाई करण्यासाठी मदत केली. 

सगळ्या शरणागतांना/पाक कैद्यांना काही काळानंतर सोडून दिले तेव्हा त्यांनी भारतीयांबद्दल आदर व्यक्त केला आणि कैदी असून देखील चांगली वागणूक दिल्याबद्दल आपल्या सरकारकडे भारताची प्रशंसा केली. 


आता पन्नास वर्षांनी देखील ब्रिगेडियर विनोदना सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं रहातं. 

कर्तव्य बजावत असताना कमांडर ब्रिगेडियर माखिजांच्या केबिनमध्ये जायचे तेव्हा भिंतीवर असलेला या तिघांचा कॉलेजवयीन एकत्रित फोटो नेहमीच या क्षणाची आठवण द्यायचा. 

या पन्नास वर्षात त्यापैकी कोणत्याच पाक अधिकार्‍यांच्या संपर्कात रहाता आलं नव्हतं. अखेर शत्रू ते शत्रूच ना? पण वाटतं खरंच ते शत्रू होते का, आहेत का? कधीतरी संपर्क करायचा प्रयत्न करायची इच्छा झाली तरी करता येत नव्हता कारण लगेच देशद्रोही म्हणून आरोप व्हायला कमी केलं नसतं कोणीही. 

प्रत्येक देशाने आपल्या सीमारेषेच्या आत आनंदी, समाधानी, प्रगतिशील रहायला काय हरकत आहे? 

का उगाच दुसर्‍याच्या जागेवर आक्रमण करून जागा बळकवायला बघायचं?

का दुसर्‍या देशाला पाण्यात पहायचं? 

का आपल्या जवानांना दुसर्‍या देशात दंगे करायला पाठवायचे आणि त्यांच्या जीवाशी खेळायचं?

का का आणि का याचं उत्तर नाहीच.....  

 


राजेश्वरी 

१६/११/२०२१ 



 

      


वाचन वेडे स्पर्धा

 

संवर्धन मराठीचे


'संवर्धन' कसा आहे ना शब्द? पर्यावरण संवर्धन, संस्कार संवर्धन, निसर्ग संवर्धन, वृक्ष संवर्धन.... आणि यातच मातृभाषा/मराठी संवर्धन, मराठी संस्कृती संवर्धन... 

वेगळं काय करायचं असतं यासाठी? कोणी काय केलं, हा विचार मनात येतो तेव्हा आठवतात त्या काही व्यक्ति ज्यांनी  मातृभाषा, मराठी साठी काहीतरी आगळा वेगळा उपक्रम केला. जसा माझ्या माहितीतला गंधार कुलकर्णी भारतभर सायकलने फिरला फक्त मातृभाषेचा प्रसार करायला.  कै. सुधीर देव यांनी तब्बल पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ मराठीच्या संवर्धनासाठी अनेक उपक्रम केले. परदेशात किंवा परराज्यात राहून देखील मराठी संवर्धन करणारे अनेक समूह आहेत. खूप छान छान कार्यक्रम ते आयोजित करत असतात. माझ्या काही मैत्रिणी आहेत, ज्या परदेशात राहून आपल्या मुलांना शुद्ध आणि स्पष्ट मराठी बोलायला आणि वाचायला शिकवतात. अगदी संध्याकाळी परवचा, श्लोक, आरत्या म्हणायला शिकवतात, सगळे मराठी सण समारंभ साग्रसंगीत साजरे करत असतात. खूप समाधान वाटतं असं पाहिल्यावर. मराठी माणसाने खरं तर प्रत्येकाने घरात जाणूनबुजून मराठी बोललं पाहिजे. मराठी पुस्तकं वाचली पाहिजेत. पण असं पुस्तक वाच म्हणून सांगून थोडीच आपली मुलं पुस्तकं वाचणार आहेत? त्यासाठी काहीतरी युक्त्या शोधाव्या लागतात. कधी आवडलेल्या पुस्तकातील उतारा मुलांना वाचून दाखवला पाहिजे, तर कधी त्या पुस्तकाचा सारांश मुलांना सांगितला पाहिजे. माझी एक मैत्रीण आपल्या मुलाला आणि गुजराती सुनेला मराठी पुस्तक वाचून दाखवते. 

खरंच मराठी साहित्यात प्रचंड विविधता आहे. फक्त वाचणारं मन पाहिजे. 

नुकतंच मला एका स्पर्धेबद्दल कळलं. मराठी साहित्याची उकल, परीक्षण करण्याची नजर आणि वाचनवृद्धी करण्यासाठी आयोजित करत असलेला एक अनोखा उपक्रम...    

एक दिवस फोनची रिंग वाजली. मॅडमनी सुरूवातीला नाव गाव सांगितलं आणि प्रास्ताविक बोलणे झाल्यानंतर म्हणाल्या, “निकोबारची नवलाई” पुस्तक आमच्या ‘वाचन वेडे’ मध्ये सर्वात जास्त चर्चिलं गेलेलं पुस्तक आहे. सर्वांना फार आवडलं आणि वाचन वेडे स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे." याखेरीज अजून एक विनंती होती, "या कार्यक्रमाच्या उपांत्य फेरीसाठी तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून याल का? उपांत्य आणि अंतिम फेरी १५ ऑगस्टला आहे." शेवटी असा प्रस्ताव मांडला. हा फोन करणार्‍या साधना पाटील या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या सल्लागार सदस्य आहेत. म्हणजे, भारतातील विविध भाषेत तयार होणार्‍या प्रत्येक चित्रपटांना या सदस्यांनी मान्यता दिल्याशिवाय, प्रशस्तीपत्र दिल्याशिवाय ते चित्रपट पहायला आपणापर्यंत पोचत नाहीत. त्यांचं बोलणं ऐकून मी क्षणभर स्तब्धच झाले. 

"काय आहे ही स्पर्धा? मला याबद्दल काहीच माहीत नाही. जरा माहिती देता का?"

यावर्षी स्पर्धेचं हे तिसरं वर्ष होतं. जसजशी मॅडम माहिती सांगत गेल्या तसतशी उत्सुकता ताणली गेली. 

दीड एक महिना चालणारी ही मेजवानी होती माझ्यासाठी. त्यात तिखड, गोड, कडू, आंबट रस होतेच पण साहित्याची पंचपक्वान्न देखील पुरेपूर होती.

एखादं पुस्तक कसं वाचावं? वाचनालयात गेल्यावर आपण पुस्तक हातात घेताना काय विचार करतो? 

सुरूवातीला मुखपृष्ठ बघतो, नाव बघतो आणि मलपृष्ठ बघतो. ते आवडलं, मनाला भावलं तर हातातलं पुस्तक उघडून मधेच एखाद्या पानावरच्या चार ओळी वाचून बघतो. त्यातली भाषा कशी वाटते ते बघतो. बरं वाटलं तरच घरी घेऊन येतो. स्वतःला विकत घ्यायचं असेल तर चिकित्सा अजून जास्तच करतो. 

पुस्तक आणलं, वाचलं की ठेवून देतो किंवा जवळच्या कोणाशी त्याबद्दल बोलतो. काही पुस्तकं मनात खोलवर रुतून बसतात, विचार करायला लावतात, त्याविषयी कोणाशी तरी बोलायला भाग पाडतात, आपल्याला जाणकारांना भेट द्यायला भाग पाडतात. बस्स इतकंच. 


वाचन वेडे काय करतात? पुस्तकाकडे कसे बघतात? नाही...  त्यांना बघायला लावतात, डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, जे स्वतः एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि एक सुजाण पुस्तक प्रेमी आहेत. त्यांच्या पुढाकाराने ही संकल्पना साकारलीय आणि त्यातूनच ही स्पर्धा आकाराला येतेय. 

स्पर्धेत सामील होण्याचा निकष एकच, तुम्हाला पुस्तक कसं वाचावं याची जाण असली पाहिजे. डॉक्टर दर वर्षी ही स्पर्धा आयोजित करतात आणि विशेष म्हणजे दरवेळी स्पर्धेत स्पर्धकांना दिलं जाणारं कार्य वेगवेगळं असतं. त्यामुळे स्पर्धेची उत्सुकता अखेरपर्यन्त ताणली जाते. याखेरीज ही स्पर्धा सोडूनही डॉक्टर सतत त्यांच्या 'शतकोटी' नावाच्या समूहाला वेगवेगळे विषय, संकल्पना देऊन प्रोत्साहित करत असतात. त्यांनी दिलेल्या विषयांची विविधता आपल्या मनातील विचारांना सतत कार्यरत ठेवते, निरीक्षणशक्ति वाढवते, सादरीकरणाचे धाडस वाढवते. फेसबूकवर सुरू केलेल्या  'झपूर्झा' पानामधून आपल्याला त्यांच्या 'अजेय' संस्थेबद्दल अद्ययावत माहिती जाणून घेता येते.

'अजेय' ही डॉक्टरांनी स्थापन केलेली नाट्यसंस्था आहे. या संस्थेमध्ये महिन्याला एक उपक्रम, साहित्यिक कार्यक्रम, शॉर्ट फिल्म, नाटक, एकांकिका, फीचर फिल्म, वेब सिरिज अशा अनेक माध्यमातून कलाकारांना संधी मिळत असते, या उपक्रमातून कलाकारांची कला उमलत रहाते, बहरत जाते.  गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांचं हे कार्य सुरू आहे. स्वतः डॉक्टरांनी 'New techniques of acting in digital age' हा विषय घेऊन डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांची 'चिंब', 'कट्टा', 'H2O'  ही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.  

त्यांच्या या चळवळीत सहभाग घेणार्‍या आणि  सहाय्य करणार्‍या साधनाताई पाटील, गौरव संभूस आणि इतर अनेक उत्साही कलाकार त्यांच्या टीम मध्ये आहेत.    

या स्पर्धेसाठी डॉक्टर आधी स्वतः आणि त्यांच्या समूहातील इतरांनी वाचून अभ्यासलेली पुस्तकांची यादी तयार करतात. 

स्पर्धकांनी आपलं नाव नोंदवायचं, गट तयार करायचा आणि मग  गटाने यादीतील पाच पुस्तकं निवडायची. बस्स, मग सुरू होते स्पर्धा. 

यावर्षी एका गटात सात स्पर्धक असे एकूण आठ गट होते. प्रत्येक गटाचे नाव देखील त्यांनी निवडलेल्या पुस्तकातील एका पुस्तकाचंच ठेवलं. जसं - स्मृतिचित्रे, कोसला, पैस, ययाती, विशाखा, मृत्युंजय वगैरे...  गट विभागणी करून झाली की, चर्चा करून थोडक्यात त्यांना करावे लागणारे कार्य समजावून सांगितलं जातं. दर तीन दिवसांनी एक कार्य दिलं जातं. यावेळी मी पाहिलेल्या स्पर्धेतील काही कार्ये आणि निरीक्षणे.....

१. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून तुम्हाला काय वाटलं? त्यातून पुस्तकाबद्दलची काय माहिती मिळते? 

  • बापरे! स्पर्धकांनी मुखपृष्ठावरील फोटो, चित्र पाहून कायकाय निष्कर्ष काढले ते फारच कौतुकास्पद होते. त्यावरचा पांढरा, लाल रंग काय दर्शवतो, शिडी काय दर्शवते, नदी, डोंगर, माणूस, हिरवळ, समुद्र, लाटा..... त्यांचे पुस्तकाप्रमाणे अनेकाविध अर्थ काढले या स्पर्धकांनी.

२. तीच प्रक्रिया होती मलपृष्ठाबद्दल काय वाटतं याची. त्यातही मी न पाहिलेल्या पुस्तकाचे देखील मलपृष्ठ माझ्या डोळ्यासमोर आलं. 

3. गाडी पुढे गेली ती अर्पण पत्रिकेवर. तुम्ही निवडलेलं एक पुस्तक कोणाला आणि का अर्पण केले? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? 

४. पुस्तकातला आवडलेला उतारा सादर करायचा. यात अभिनय आणि सादरीकरण आवश्यक. 

  • सादरीकरण बघत असतांना तर मला एकपात्री प्रयोगच बघत असल्याचा भास होत होता.           

५. थोडक्यात पुस्तकाबद्दल आपलं मत मांडायचं. 

  • हे कार्य मात्र अचंबित करून गेलं. कोणी भारुड रचून आणि गाऊन, तर कोणी द्विपात्री एकांकिका करून, कोणी बुरगुंडा भारुड सादर करून पुस्तकाचं विश्लेषण केलं, तसेच कोणी छान काव्य रचून किंवा साधे सरळ लेखामधून विचार मांडले. एक पुस्तक वाचून त्यावर आपल्याला भावलेल्या मुद्द्यांवर अशी रचना करणं आणि तेही दोन दिवसात, अगदीच कौतुकस्पद होतं. 

६. पुस्तकातील आवडलेले एखादे विधान किंवा वाक्य सांगा. 

  • इतक्या पुस्तकाच्या पानांमधून एक विधान शोधून ते का आवडलं सांगणं खरंच कठीण काम होतं. 

७. लेखकाची शैली कशी वाटली? 

  • इतक्या बारीक नजरेतून, शब्दाशब्दातून लेखकाची शैली वेगळी असते हे कळायला किती प्रचंड वाचन केले पाहीजे...  

८. पुस्तकातल्या एखाद्या व्यक्तिरेखेवर बोला. 

  • ती व्यक्तिरेखा कणखर, खंबीर का वाटली? त्यातून काय विशेष जाणवलं? नकारात्मक भूमिका कोणती वाटली? स्पर्धकांच्या सादरीकरणातून अशा अनेक व्यक्तिरेखा कळत होत्या. उलगडत होत्या. 


९. पुस्तकात लिहिलेला एखादा प्रसंग तुम्हाला अजून वेगळा कसा मांडता आला असता ते सांगा. 

  • याचं उत्तर ऐकायला देखील मजा आली. कारण पुस्तक लिहिताना लेखकाने केलेला विचार आणि वाचकाने वाचताना केलेला विचार कसा भिन्न असू शकतो ते जाणवत होतं. 

१०. पुस्तकात कोणत्या प्रसंगातून नकारात्मक विचार पहायला मिळाले? 

११. हे पुस्तक तुम्ही का निवडलं? 

  • याचं उत्तर देताना स्पर्धकाने किती विविध अंगांनी त्या पुस्तकाचं परीक्षण केलं ते दिसून आलं.

१२. अंतिम फेरीत तर त्या पुस्तकामधून असे काही प्रश्न काढले की, त्याची फक्त एक ते दोन वाक्यात उत्तरं द्यायची आणि ती देखील फक्त एक मिनिट विचार करून.   


दर आठवड्याला असे कार्य दिले जायचे आणि स्पर्धक आपलं साहित्य ज्ञान, कौशल्य पणाला लावायचे. प्रत्येकजण अतिशय सुंदररीत्या आपले विचार मांडायचे. त्यांच्या विचारातून मला देखील काही वाचलेल्या पुस्तकातील खाचाखोचा लक्षात आल्या. 

स्पर्धा संपल्यावर मला एका स्पर्धकाचा फोन आला. तिने ‘निकोबारची नवलाई’ हे पुस्तक अभ्यासासाठी निवडलं होतं. पुस्तकाबद्दल तर ती भरभरून बोलत होतीच पण पुस्तकाच्या नावावरून तिने जो काही विचार केला तो खरं तर मी किंवा संपादकांनी नाव ठरवताना केला नसेल असंच वाटलं. ती म्हणाली, "नवलाई वाचायला सुरुवात केली तेव्हा जाणवलं की या पुस्तकात सुरुवातीपासूनच कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या वाचून आपल्याला नवलच वाटते. कारण त्या काही गोष्टी आपल्या रोजच्या जगण्याचा कधीच भाग झालेल्या नव्हत्या, म्हणून नवलाई हे नाव सार्थ ठरतं. असं असून देखील शेवटी एका भागात बदलत जाणारं निकोबार आहे. तो भाग वाचून जाणवलं की, त्सुनामीनंतर त्या स्थानिकांची बदललेली परिस्थिति ही त्यांच्यासाठी एक नवलच आहे. कित्येक अनभिज्ञ गोष्टी त्यांना आता अनुभवायला मिळू लागल्यात. म्हणजे वाचकांसाठी निकोबार हे नवलाईपूर्ण आहेच पण निकोबारींसाठी देखील त्यांचं बदलतं जग देखील सगळं नवलाईपूर्ण घडलं आहे. याच दोन कारणांसाठी पुस्तकाचं नाव 'निकोबारची नवलाई' अगदी सार्थ ठरतं." तिचं हे वक्तव्य ऐकून मी खरंच अगदी अवाक झाले. 

मराठीच्या पदवी परीक्षेत तरी मुलांनी असा विचार केला असेल की नाही माहीत नाही पण या स्पर्धेमुळे मला पुस्तक हातात घेतल्यावर काय काय आणि कसं निरीक्षण करायचं हे मात्र निश्चित कळलं.    

वाचन वेडे बद्दल मला वाटतं... 


वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे...

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे...

संकल्प आहे...

वाचन वृद्धी करण्याचा... 

साहित्य अभ्यासण्याचा... 

आणि

साहित्यिकांना समजून घेण्याचा...


वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे... 

संकल्प आहे...

अभ्यासू वाचक निर्माण करण्याचा...

रंगमंचावर आपलं मत सादर करण्याचं धारिष्ट्य दाखवण्याचा... 

आणि

साहित्यातील विविध पैलू उलगडून दाखवण्याचा...

 

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे... 

संकल्प आहे...

लोककला मनामनात रुजवण्याचा...  

इतरांचे विचार समजण्याचा... 

आणि

त्याच बरोबर आपल्या विचारांना साकारण्याचा... 

वाचन वेडे ही स्पर्धा नसून एक संकल्प आहे. 


या समुहाच्या पुढील वाटचालीतील उपक्रमांसाठी सर्व वाचन वेड्यांना शुभेच्छा !!


-  राजेश्वरी 

२४/०८/२०२१


 मी एकटी??

"आई, पेपर दे ग जरा."
"अरे मी कोडं सोडवतेय ना.."
"सोडव ग नंतर. तुला काय काम आहे नाहीतरी. आरामात सोडवत बस. मला जरा घाई आहे. चाळतो पेपर आणि देतो मग तुला."
"बरंचसं सोडवलं पण एकाच शब्दासाठी गाडी अडकलीय.. सांग ना रे, तुला तो शब्द आठवतोय का?"
"आई, आता दुपारी बघू. आत्ता आजिबात वेळ नाहीये मला."
आजकाल असं का होतंय? काही कळत नाही. पेपरात कोडं सोडवायला बसले तर शब्दच आठवत नाहीत. कुठे गेले ते डोक्यातले सगळे शब्द? सगळेच सुट्टी मिळाल्यासारखे खेळायला गायब झालेत. कुठे शोधू आता त्यांना? रोजच्या वापरातले तर आहेत. तो एक उभा काय आहे? पाच अक्षरी, नद्यांचं समोरासमोर भेटणं... काय बरं म्हणतात? मिलन? नाही मग काय? का आठवत नाहीये. पूर्वीपासून कित्येक वर्षे तर मी रोज जायचे घराजवळच्या, नदीच्या घाटावर...देवाला नमस्कार करून पायर्यांवर नदीकडे बघत तर बसायचे की...आजकाल बाहेर जाणं राहिलं तसं नदीचं दर्शन देखील राहिलं. पुन्हा एकदा जाऊन बघू या का, कदाचित तिथं गेल्यावर आठवेल तो शब्द.
पायात चपला अडकवल्या आणि निघाले, मी मला न आठवणारा शब्दच शोधायला...
आठवेल का तिथं गेल्यावर? जाऊन तर बघू. "नकोच पण, इतक्या लांब जाण्यापेक्षा गच्चीवर झोपाळ्यावर बसू."
मुलाने जोपासलेल्या गच्चीवरच्या बागेत फिरू, झोके घेऊ, विसाव्याला बाकडी पण आहेतच की. लॉनच्या गालिच्यावर पाय मोकळे करू...
या झोपाळ्यावर झोके घेत बसलं की मन कसं शांत शांत होत जातं. शांत संथ लयीत, डोळे बंद करून एकेका पायाने झोका घ्यायची ही जुनीच आवड माझी. कधीतरी मुलाला बोलून दाखवली आणि त्यानं ती वयाच्या सत्तरीला पूर्ण केली. पूर्वी सारखं उंचावर जाणं झेपत नाही आताशा पण संथ झुलत रहायला आवडतं. मनाच्या मनाशी गप्पा मारता येतात मग. सध्या माझ्याशी बोलायला वेळ तरी कोणाला आहे? खाऊन पिऊन सुखी असलं की झालं का सगळं? कोणालाच कसं वाटत नाही, थोडावेळ बसावं, हालहवाल जाणून घ्यावा माझा.
खरं तर आज चार तारीख.. आज माझा वाढदिवस. कितवा? वयाची फक्त पंच्याहत्तरी पूर्ण होतेय आज...
कोणाच्या लक्षात तरी आहे की नाही काय माहीत.
मागच्या वर्षी मस्त घाटावर साजरा केला होता. नदी काठी पायऱ्यांवर बसून. सगळं कुटुंब एकत्र गोल करून बसलो होतो. सगळे खुशीत, हसत होते. मीही त्यात सामील होतेच की. आवडती भेळ, डोसा, पाणीपुरी आणि काय काय मागवलं होतं...
आज वाटतं, पडावं बाहेर, बागडावं मनासारखं. कित्येक वर्षांच हे माझं स्वप्न पुरं करावं. पण... पण झेपेल का बाई तुझ्या शरीराला? त्यापेक्षा हा झोपाळा बरा आहे की.
खरं तर, आयुष्याच्या उदयाला बघितलेलं मनसोक्त बागडण्याचं स्वप्न किमान मावळतीला तरी पूर्ण करू या. अस्ताला जाताना मनात रुखरुख नको रहायला, नुसतं स्वप्न बघितलं, सत्यात उतरवायचा प्रयत्न देखील केला नाही, असं आजकाल सारखं वाटत रहातं. शब्दशः बागडणं आता थोडंच जमणारं आहे, सगळं कसं आभासी करायचं...
काहीही झालं तरी आजचा दिवस माझा, असं ओरडून सांगावं वाटतं सगळ्यांना पण आवाज कुठे फुटतोय आताशा.
कधी कधी ओढून ताणून आणलेले ते कोणाचे खोटे खोटे मुखवटे, नको वाटतात मला बघायला. त्यांच्या सांगण्यावरून वागणे, आजचा दिवस साजरा करणे सहन होत नाही. पण विरोध करायला जमलंच नाही मला कधी. पण आज थोडंसं बंड पुकारू या. बघूया, काय होईल ते होईल...
का कोणाला कधी वाटलं नाही विचारावंसं, 'बाई गं काय पाहिजे तुला? काय आवडतं तुला?' आजच्याच काय पण इतर कोणत्याही दिवशी विचारलं कोणी? छे, कधीच नाही...
गोड बोलून फायदा करून घेतात सगळे. आता बास. किती दिवस मी यांच्या तालावर नाचायचं? आणि का? जाऊ या बाहेर, वाट फुटेल तिकडे. बंड करून उठूया असा विचार कित्येकदा मनात आला.
डोंगर कपारीत शिरू या. हिरव्या गार रानाचा वास मनात भरून घेऊ या. वरुन येणाऱ्या खळखळत्या झऱ्याला निरखत बसू या. त्याचा आवाज कानात भरून घेऊ या...
बागडणारी फुलपाखरं बघत बसू या. सूर्यकिरणांनी चमकणारे, वाऱ्याने डोलणारे गवतफूल बघत बसू या. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर त्याच्याबरोबर आपण पण डोलू या...
काय करू नी काय नको अस्सं होतं कधी कधी, पण ते देखील फक्त मनातल्या मनात.
आज मी अशी एकटीच झुलत बसलेय आणि मनात विचारांची आंदोलनं झुलताहेत माझ्याबरोबर. या आधी कधी अशा मनाशी गप्पा मारल्या, ते आठवत पण नाही...
का आपण असं स्वतःला घरात कोंडून घेतलं? का नाही मोकळं होता आलं मला. सगळंच का इतरांनी वागवलं तसं वागले मी? का का आणि फक्त का?
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हे कबूल आहे, पण इतक्या उशिरा?
मनातल्या हिंदोळ्याबरोबर पावलं देखील एका लयीत उचलली जात आहेत... वेग वाढत चाललाय. इथे तिथे कुठे बघावं असं देखील वाटत नाहीये...
मन मात्र मागं मागं खेचतंय मला. मनातली तगमग शरीराला झेपत नाहीये आताशा...
झोका थांबवून कट्ट्यावर विसावू या क्षणभर. हृदयाचे ठोके शांत केले पाहिजेत. घोटभर पाणी पिल्यावर जरा मन शांतावलं...
असं मनाचं मनाशी हितगुज करायला मजा येतेय. याआधी असं मी कधीच कसं नाही केलं? अर्थात तसा वेळ तरी होता का? सतत काम काम आणि फक्त काम करत तरी राहिले नाहीतर पुढचं काम काय करायचा त्याचा विचार तरी करत राहिले...
आज पेपरमध्ये आपल्या गावाच्या वेशीबाहेरच्या माळरानावर वणवा पेटलेली बातमी होती. त्या वणव्याच्या बातमीत मला माझं जळणारं घर दिसू लागलं. वय होतं जेमतेम तीन चार वर्षे. दंगलीत पेटलेला तो वणवा. आधीच आई हे जग सोडून गेली होती. बाबांनी सुगी झाल्यावर आम्हा बहिणींना नवीन कपडे आणले होते. आम्ही आई शिवाय साजरी करणार होतो ती दिवाळी. बालमनाला नवीन फ्रॉकचं अप्रूप होतं. ताई माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. तिला फारसा आनंद झाला नव्हता पण मी फार खुश झाले होते, नवीन फ्रॉक बघून. तो घालून मला गोल गोल गिरक्या घ्यायच्या होत्या. पण कसचं काय. घराच्या जळण्यात ना तो फ्रॉक राहिला ना सुगीचे धान्य राहिले. मेल्यांनी सगळं जाळून टाकलं. एकदा सुद्धा मनात विचार आला नाही, बिना आईच्या या मुलींचं डोक्यावरचं छप्पर काढून घेतलं तर काय करतील त्या, कुठे जातील त्या? अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर काढलं. आजोबा बाहेर यायला नकार देत होते तर त्यांच्या सकट घरावर रॉकेलचे पेटते बोळे फेकले घरात. घाबरून बिचारे ते पण पळत बाहेर आले. रात्रीची वेळ, आजूबाजूला नुसता हलकल्लोळ माजला होता आणि पेटत्या घरांचे वासे पळायला रस्ता दाखवत होते. शत्रूवर देखील अशी वेळ येऊ नये कधी..
तसाच हलकल्लोळ आज माझ्या मनात माजलाय. माझ्या सगळ्या इच्छांची होळी झालीय. कसंही करून पेटणाऱ्या त्या भावनांना शांत केलं पाहिजे. नकोशा वाटतात अशा बातम्या वाचायला. तो फोटो आठवून देखील अंगावर काटा उभा रहातोय. मनातून हे घालवलं पाहिजे. उठून गेलं पाहिजे. जाऊ या घरात? नको नको अजून मारू की गप्पा थोडावेळ...
अरेच्चा, हे काय? किती ते गार, दचकायलाच झालं अगदी. झाडांना पाणी घालता घालता, पाईप सुटून पाणी गच्चीभर पसरलं की. पायाखालचं ते गार गार पाणी एकदम मनाला पण शांत करून गेलं. त्या आयुष्य कडवट करणाऱ्या आठवणीतून बाहेर पाडलं जणू आपल्याला..
निसरड्या फरशीवरून देह सांभाळत चाललं पाहिजे हे कळतंय पण मनाला सांभाळणं, सावरणं कठीण जातंय. हळूहळू मनात उसळलेला डोंब शांत होतोय मात्र...
बसूया तिथेच कट्ट्यावर पाय पाण्यात सोडून थोडावेळ. तळपायाची आग पाण्याच्या इवल्याश्या लाटांनी थंडावताना जाणवतेय...
अधांतरी तरंगत राहिलेल्या पायांना त्या थोड्या थोड्या वेळाने येणाऱ्या इवल्याशा लाटा जणू कुरवाळत होत्या...
लग्नानंतर वर्षभरातच विधवा झालेली मावशी नाही का आपल्या सगळ्यांच्या केसातून अशी हळुवार हात फिरवायची. आमच्या दोघींच्या आई बरोबरच एक मामी सुद्धा प्लेगच्या साथीची बळी पडली होती. तीन मामे बहिणी आणि एक भाऊ कन्हय्या. आम्ही सहाच्या सहा जण मावशीच्या अवतीभवती असायचो... जगाकरता वांझ असलेली मावशी अचानक आम्हा सहा जणांची आई झाली होती...
मावशीच्या हातचा तो पिठलं भात देखील पंचपक्वान्न वाटायचा. तिचं प्रेम त्यात ओसंडून वहात असायचं. कोणालाच कमी नाही की जास्त नाही. एकटा मामा पोस्टाची नोकरी करणारा, खाणारी इतकी तोंडं कशी काय पोसणार?
आम्ही एकेकीने काम करणं सुरू केलं. किडुकमिडुक कमाई सुद्धा त्यावेळी लाख मोलाची वाटायची...
किती समाधान मिळायचे त्यावेळी, अगदी तेच समाधान आत्ता या कुरवाळणाऱ्या लाटा मला देत आहेत. मनातला क्षोभ कमी करत आहेत... घरातून निघतानाची घालमेल कमी होताना दिसतेय...
पण बाईसाहेब उठा आता इथून पुढचा पल्ला गाठायचाय तुला. माझं मन मलाच सांगत होतं. उठले, गच्चीच्या काठाकाठाने चालत राहिले...
हळूहळू जाणवलं, मनातली पायवाट जरा दूर नेतेय, आडवाटेला. पण इलाज नाहीये. मागे पुन्हा बघायचं नाही आणि पुढे काय वाढून ठेवलंय ते आठवत रहायचं. किती त्या विलक्षण आठवणी. दर काही वर्षांनी आयुष्यात अचानक घडामोडी होत गेल्या तेव्हा समोर येईल त्या अडचणींना तोड देत गेले.
समोरच्या कुंडीत किती गोड फूल उमललंय पण हात देखील लावता येत नाहीये. आपल्या आजूबाजूला काटयांत गुंतवून घेतलंय त्यानं स्वतःला.
अशीच काहीशी परिस्थिति तर झाली होती आपली, जेव्हा शिक्षणाकडे पाठ फिरवली आणि समोर आलेल्या बिजवराच्या गळ्यात माळ घातली. भला मोठा वाडा, एकत्र कुटुंब. दोन जावा आधीच्या आणि अजून दोघांची लग्नं व्हायचीत आणि एकुलती एक लहान बहीण...
आपल्या उलट परिस्थिती. आपण पाच बहिणी एक भाऊ आणि इथे पाच भावात एक बहीण. इथेही आईवडील देवाकडं निघून गेलेले...
सगळ्या भावंडांचे राज्य. थोरामोठ्यांचं घराणं म्हणून खायला ददात नव्हती. पडेल ते काम तर मी करत राहिले. पण थकलेय आता. आठवलं तरी आश्चर्य वाटतं.
पाण्याचा नळ बंद केल्यावर गच्ची लगेच तापायला लागलीय आता. उन्हाचे चटके बसून पाय पोळू लागलेत. विसाव्याला पुन्हा झोपाळा जवळ करूया... मनाला, शरीराला आलेला थकवा, पक्ष्यांच्या चिवचिवाटाने, गुंजनाने हलकेच दूर होत होता. जवळच पक्ष्यांची जोडी आपल्या पिल्लांना भरवत होती, उडायला शिकवत होती, साठलेल्या पाण्यात बागडायला शिकवत होती. ती दोन पिल्लं पण आपल्या आईला बघून कशी पाण्यात पंख फडफडवत आहेत ना. मजा वाटतेय बघायला.
जसं घरात एकेकांची लग्नं, मुलं बाळं होत गेली तसा बाळलीला बघण्यात, त्यांच्याशी खेळण्यात कामाचा रगाडा वाटत नसे. मुलं आपली आपली खेळात मग्न असली की कधी कधी जाणवायचं, आई तू हवी होतीस. आईची आठवण नकोशी करायची. आई तू हवी होतीस ग, तुझ्या नातवंडांचे लाड करायला. माझ्या कामातून मी नाही वेळ देऊ शकत मुलांना, याची खंत वाटायची. मी वेळात वेळ काढायचा प्रयत्न करायचे. मुलांची प्रगती सुखावून जात असे. अजून अजून त्यांनी मोठं व्हावं, नाव कमवावं म्हणून त्यांचे लाड करू लागले...
विचार करता करता, झुलता झुलता थकव्याने ग्लानि आली. मग मी माझी राहिलेच नाही...
जे काही करायचं ते इतरांच्या पसंतीचं, इतरांच्या इच्छेला आपली इच्छा समजायची सवय लागली. नवऱ्याच्या समाजसेवेच्या व्यसनात मीदेखील हरवून गेले होते. समोरच्याच्या आनंदात मी आनंद मानत राहिले होते…
विसरून गेले होते मी मला. त्या ग्लानीमध्ये किती दिवस, किती वर्षं सरली तो विचारच मनाला शिवला नाही...
जाग आली तेव्हा संध्याछाया पसरू लागली होती. गोखुराची धूळ हवेत विरत चालली होती. सगळे पक्षी, पिल्ले आपआपल्या जागी स्थानापन्न होऊ लागले होते...
माथ्यावरून 'टुही टुही' शिळ ऐकू येत होती. जणू ते मलाच हाकारत होते. अरेच्चा हे तर रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन आलेले पोपट दिसतायत. गच्चीच्या कठाड्यावर ओळीने बसलेत जणू शाळाच भरलीय यांची. यापूर्वी असे कधी बघितलेच नव्हते. 'अग यापूर्वी बागेत जाऊन कधी बसलीयेस अशी?' माझी मीच मला प्रश्न विचारू लागले...
लालबुंद डोकं आणि केशरी पिवळी चोच. किती गोड ते रूप. अंगावर देखील पंचमीचे हिरवे पिवळे रंग उधळलेले. चेहर्यावर खट्याळ भाव...
आठवण जागी होतेय ती मुलाने, सुनेने, जावयाने भारतभूमीवरची दाखवलेली अनेक ठिकाणं. प्रेमानं, हक्कानं फिरवून आणलेल्या बागा…
माझ्या पण डोळ्यात, मनात त्यावेळी असेच खुशीचे अनेकानेक रंग होते. प्रत्येक ठिकाणी काढलेले माझे फोटो नेहमीच माझ्या मनाला विलोभून टाकतात, त्या आठवणीत रंगवून टाकतात मला...
या रंगीत पक्षांना, रंगीत फुलपाखरांना सांगावं वाटतंय, 'बाबांनो असेच आनंदाचे रंग उधळत रहा. मला आज दाखवताय तसे इतरांना पण दाखवत रहा...
हळूहळू शरीराला रितेपण जाणवू लागलं होतं. मुलं मोठी होऊन दूर जाताना दिसत होती.
इतक्यात काही पक्षी परतीच्या वाटेवर चिवचिवाट करत जाताना ऐकू येऊ लागले...
दूरच्या मंदिरातून आरतीचा घंटानाद कानावर येऊ लागला... मुलांनी लहानपणी म्हणलेल्या परवाचाचे बोबडे बोल अजून वेळ झाली की कानात घुमतायत असा भास होतोय…
पोटात खड्डा पडलाय, रात्रीच्या पोटापाण्याचे विचार मनात घोंगावतायत. पण मी का विचार करतेय हे? मी तर या सर्वांना मागे टाकून बाहेर पडलेय आता. आता नको पुन्हा त्या पाशात गुंतायला. छान वाटतंय की असं इथं झुलत रहायला, मधेच गच्चीत फेऱ्या मारायला.
चालता चालता मधेच वाट चुकल्याची जाणीव होऊ लागली. कोपऱ्यात लावलेल्या लॉनवरची गवताची पाती पायाला गुदगुल्या करू लागलीत, आठवणी देऊ लागलीत...
नातवंडांचे पायात घुटमळणे, त्यांचे इवले इवले हात, बोबडे बोल, न संपणारे प्रश्न, आयुष्याबद्दलची उत्सुकता, सगळं सगळं कसं गमतीशीर होतं ..
मनात साठवलेले त्यांचे आवाज पुन्हा रितेपणाची कसर भरून काढू लागले. पुन्हा एकदा नातवंडांसाठी शरीरात तरतरी आल्याचे जाणवलं...
काय करू? घरी जायचंय मला? का पण? तिथेच पुन्हा अडकून पडले तर? आता नाही. आता बास. माझं मला उठलंच पाहिजे. माझी स्वप्नं मी बघितलीच पाहिजेत... कळत नाहीये आता कुठे जाऊ. हे शरीर थकलंय आता. मन अजूनही उत्साही आहे. काहीतरी वेगळं करण्याची उमेद आहे. पण काय करू तेच सुचत नाही...वातावरणात अंधार दाटून येऊ लागलाय. अचानक शेजारी नाजुक, लाडिक कुईकुई ऐकू येतेय. कोण बरं आहे माझ्या मागे? हा तर आपल्या राजा कुत्र्याचा आवाज. राजा? तू? इथे कसा काय? अरे लबाडा, तू शोधून काढलंस मला. आज तुला खायला मिळालं की नाही रे? अशी कशी तुला विसरले मी? माझी पाठराखण करत होतास काय? ये, असा जवळ ये माझ्या. तुझ्या पाठीवरुन हात फिरवू दे मला. इन मीन गेल्या चार वर्षातली जवळीक आपली. कोणीतरी नतद्रष्टाने तुला आईपासून तोडून माझ्या दारात आणून सोडलं आणि मी दोन वेळची तुझी भूक भागवली. इतकीच काय ती आपली साथ. पण तू मात्र खाल्ल्या घासाला जागलास. माझी साथ नाही सोडलीस...
असा नको रे मला अडकवून ठेवूस. मला जाऊ दे माझ्या मार्गाने. तू जा तुझ्या मार्गाने...
नाही म्हणतोस. मग काय करू या. अरे माझा पदर का ओढत चाललास? थांब थांब येते मी. हळू हळू चाल रे. पायऱ्या पळत उतरायची सवय राहिली नाही आता. अरे अरे, तू तर मला परत माघारी घेऊन चाललास. मला मुक्त व्हायचं आहे रे सगळ्या पाशातून. तिथे आता माझी गरज नाही. संपलं माझं कर्तव्य...
राजा तू अस्सा हट्टी आहेस ना. ऐक म्हणता ऐकणार नाहीच. बरं बाबा, तुझंच खरं. चल जाऊ तू म्हणशील तिकडे...
"हुश्श, आलीस बाई एकदाची. कधीची वाट बघतोय आई आम्ही तुझी. अशी न सांगता कुठे गेली होतीस?"
"असं काय ग आजी, वाढदिवस कोणा बरोबर साजरा केलास? आम्ही इथे तुझ्या आवडीचं काय काय करून ठेवलंय बघितलंस का? तुला आम्ही सरप्राइज देणार होतो ना."
नातवंडांचे ते गोड गोड बोल ऐकले आणि मनातली रितेपणाची भावना, एकाकीपण, मनातली स्वप्नं पुन्हा एकदा गाठोड्यात बांधून टाकली…
कुठेही गेले नव्हते बाळांनो, थोडावेळ रस्ता चुकले होते पण आता आले पुन्हा परत...
आयुष्याचं कोडं सोडवण्यासाठी बाहेर पडले होते, पण ते इथे घरात परत येऊनच सुटले होते…
माझं एक काम करता का? आजचा पेपर हवाय मला, कोडं सोडवायला. 'प्रीतिसंगम' शब्द आठवत नव्हता तो आठवला आत्ता. डोळ्यात उभे राहिलेले आनंदाश्रू लपवत मी उद्गारले.
"हृदयाचा हृदयाशी संवाद" हा प्रयोग आयुष्य बदलवून टाकतो असं आजपर्यंत ऐकलं होतं नुसतं, आज अनुभवलं...
--राजेश्वरी किशोर
May be an image of 1 person, ocean and text

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...