संध्याकाळ
आज खूप दिवसांनी अशी निवांत संध्याकाळ मिळाली ना आपल्याला... कित्येक दिवसांपासून तुझी धावपळच सुरू होती. असे कधी बसलोय या पूर्वी ते आठवत सुद्धा नाही...
समोर अस्ताला चाललेलं लालबुंद सूर्यबिंब, त्याला आपल्या मिठीत घ्यायला अधीर झालेले आणि त्याच्याच रंगात न्हाऊन निघालेले शांत पाणी आणि वर आकाश... बघ, त्या सुर्यबिंबाला परततांना बघून जसं काही झुकून वंदनच करीत आहे... आपापल्या घरट्याच्या ओढीने, एकमेकांच्या साथीने परत चाललेले ते पक्षी. इंग्लिश 'V' चा आकार करून एकसंध उडताना जणू काही सूर्याला सलामीच देत असावेत...
अशा या धुंद वातावरणात तू आणि मी दोघेच बसलो आहे. निवांत... शांत...
आपले सहजीवन सुरू झाल्याला २५ वर्षे पूर्ण होतील ना रे आज... दिवस कसे भुर्रकन उडून गेल्यासारखे वाटतात ना? रत्नागिरीच्या समुद्रकिनारी असेच आपण हातात हात घालून बसलो होतो, एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून... किती स्वप्ने पाहिली होती त्या क्षणी... सहजीवनाची सुरुवातच केली होती ना... पण त्या क्षणी, तो अस्ताला जाणारा सुर्य होता ना तोच जाताना त्याची ऊर्जा आपल्याला देऊन गेला असणार. त्याशिवाय का आयुष्यात इतके चढ उतार येऊन सुद्धा आपले बंध अगदी पक्के झालेत...
तुझ्या कर्तृत्वाने तू मात्र वर वर चढत गेलास. मला जमेल तशी मी जबाबदारी पेलत गेले. पण तू कधी तक्रार नाही केलीस. नेहमीच माझं कौतुक करून मला प्रोत्साहन देत राहिलास. तू नसतास साथीला तर जमलं असत का मला एकटीला सगळ्या धक्क्यातून सावरणं...
२५ वर्षांपूर्वी, त्या अस्ताला जाणाऱ्या सूर्यबिंबाकडे पाहत असताना, त्या खळखळून किनाऱ्यावर येणाऱ्या लाटांना पाहून, त्या अंगावर येणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांच्या झुळुकेला झेलून, त्या वाळूत मी रेखाटलेल्या आपल्या नावांना आणि त्याभोवती तू काढलेल्या बदामाला पाहून ... केला होता का रे असा विचार आपण कधी... वाटले होते कधी आपल्यावर आलेल्या संकटांना आपण दोघेच समर्थपणे सामोरे जाऊ? जस जशी संकटं येत गेली तस तसे आपण एकमेकांना जास्तच ओळखत गेलो. आणि आपली वीण घट्ट होत गेली...
२५ वर्षांत किती आनंदाचे क्षण उपभोगले आपण. मुलांच्या प्रगतीने कितीदा तरी आनंदून गेलो. अजून त्यांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत गेलो. माझ्या कोणत्याच निर्णयाला तुझा विरोध नसतो. घरासाठी काही निर्णय घ्यायला पूर्ण स्वातंत्र्य दिलंस तू मला...
तुला मिळत गेलेल्या बढत्यांमुळे माझेही व्यक्तिमत्त्व काहीसं उजळून निघालं.. वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटता आलं.. कधी कोणी काही अडचणी घेऊन आले सोडवायला की आपसूकच आपण मोठे झाल्यासारखे वाटले.. समारंभात मिळणारा मान हवाहवासा वाटू लागला.. सर्वात अभिमान वाटला तो तू २६ जानेवारी ला पहिल्यांदा झेंडा फडकावलास तेंव्हा. किती उर भरून आला होता म्हणून सांगू. तोंडावर हसू अन डोळ्यात पाणी अशी गत झाली होती माझी.. त्यानंतर प्रत्येकवेळी ध्वजवंदन करायला मी हजर राहायचेच. प्रत्येकवेळी तुझ्याबद्दल प्रेम, आदर वाढतच जातो..
आज बघ पुन्हा तसाच अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे बघतो आहोत आपण दोघे. शांत, निवांत. २५ वर्षात झालेल्या घडामोडींचा मागोवा घेत.. भल्या बुऱ्या घटनांची उजळणी करत.. तुला मात्र negative गोष्टी उकरून काढायला आवडत नाहीत. आणि काही वेळा मी विसरू म्हणता विसरू शकत नाही..
तू गाण्यांच्या शब्दरचनेत स्वतःला गुंगवून टाकणारा. आणि मी अगदीच अरसिक. आठवतं का रे ती एक रात्र... तू कुठला विसरतोस म्हणा. कारण त्यानंतर कधीच तसा प्रयत्न तू करायच्या भानगडीत पडला नाहीस. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तू चिडला पण नाहीस. खूप खुशीत होतास तू त्यादिवशी. मला म्हणालास, चल, तुला गझल काय चीज आहे ते सांगतो. कोणती होती रे ती? बहुतेक म. रफीची होती ना? तू सुरुवात केलीस..
फ़ल्सफ़े इश्क़ में पेश आये सवालों की तरह
हम परेशाँ ही रहे अपने ख़यालों की तरह
शीशागर बैठे रहे ज़िक्र-ए-मसीहा लेकर
और हम टूट गये काँच के प्यालों की तरह
जब भी अंजाम-ए-मुहब्बत ने पुकार ख़ुद को
वक़्त ने पेश किया हम को मिसालों की तरह
ज़िक्र जब होगा मुहब्बत में तबाही का कहीं
याद हम आयेंगे दुनिया को हवालों की तरह
सुदर्शन फ़ाकिर
खूप आवडते तुला ती गझल. मग मी ही प्रयत्न पुर्वक ऐकू लागले.. तू तुझ्या धीरगंभीर आवाजात बोलू लागलास,
"ही गझल म्हणजे म.रफी आणि संगीतकार ताज अहमद खान यांनी बनवलेला एक masterpiece आहे." आणि पुढे तुझ्या style ने आधी शब्दाचा अर्थ आणि मग शब्दरचनेचा अर्थ असा सांगायला सुरुवात केलीस..
'फलसफा' म्हणजे.... झालं... इथेच माझी गाडी रुळावरून घसरली.. तू भरभरून बोलत राहिलास आणि मी मात्र निद्रेच्या आधीन झालेली. तू त्या गझल च्या प्रेमात इतका आकंठ बुडून गेला होतास की शेजारी मी तुला रिस्पॉन्स देणे ही बंद केलेले तुला कळले नाही... सकाळी मात्र खळखळून हसत तू ही गोष्ट मला सांगीतलीस. पण निश्चितच रात्री, किती 'अरसिक बायको ही' असे राहून राहून तुला वाटले असणार..
पण नाही तू आपल्या आवडीनिवडी कधीच माझ्यावर लादल्या नाहीस. मी इच्छा व्यक्त केलेल्या प्रत्येक कार्यात मला प्रोत्साहन देत राहिलास... आनंदी बनवलेस माझं जीवन..
धन्यवाद नाही म्हणणार पण असेच समाधानाने जावे पुढील आयुष्य....
१६/०२/२०१८
फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि जाणवायला लागलं की घर सोडून येण्याला 25 वर्षे होत आहेत. गेली 25 वर्षे आणि त्यापूर्वीची 4,5 वर्षे डोळ्यासमोर येऊन उभी ठाकली. आईवडिलांचा विरोध, बहीण भावंडांची साथ, मित्रमंडळींचे पाठबळ, सगळी मनाची घालमेल. अशा अवस्थेत खूप काही थरारक पद्धतीने झालेल्या (म्हणण्यापेक्षा केलेल्या) लग्नानंतर किती त्रासही सोसावा लागला आणि त्याचबरोबर आम्ही दोघांनीच किती आनंदाचे क्षण अनुभवले ते आठवत राहिले. आणि एक दिवस जुना album हातात पडला. त्यात आमच्या लग्नाचे आणि नंतरच्या ट्रिपचे काही फोटो सापडले. फोटो पाहता पाहता एक रत्नागिरीच्या समुद्रकिनारी काढलेला फोटो सापडला आणि मग लिहिले गेले ते... "संध्याकाळ"…… आणि मग आपोआप शब्द सुचत गेले….

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा