कणा
‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून :
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
मराठी दिनानिमित्त कविश्रेष्ठ 'कुसुमाग्रज' यांच्या कवितांचं रसग्रहण करण्यासाठी मी त्यांची 'कणा' ही कविता निवडलीय.
गेले वर्षभर जगभरात कित्येकांना अनेक अनपेक्षित संकटांना तोंड द्यावं लागत आहे. त्या अनुषंगाने पोळलेल्या अंतःकरणांमध्ये नवीन उमेद जागवण्यासाठी मला 'कणा' या कवितेचा उल्लेख प्रकर्षाने करावासा वाटतोय.
जेष्ठ, श्रेष्ठ कवींचं, त्यांच्या रचलेल्या कवितांचं श्रेय हेच असतं की त्या कालातीत असतात. त्यांनी लिहून कितीही वर्षं झाली तरी त्या कविता आपल्याला जगण्याचं बळ देतात..
कविता म्हणजे तरी काय असतं? कमीत कमी शब्दात भावनांचा उत्कट, समर्पक आणि उत्स्फूर्त आविष्कार'..
कुसुमाग्रजांच्या 'कणा' या कवितेत कित्येक गोष्टी न उच्चारता देखील आपल्याला उमगतात. या कवितेचं वैशिष्ट्य असं की यात कुठेही महापुराचा उल्लेख नसतानाही वाचक महापुरात लोटले जातात आणि त्या महापुराला ताठ कण्याने, खंबीरपणे सामोरे जातात.
‘ओळखलत का सर मला?’ - पावसात आला कोणी,
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून,
‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.
यात कविवर्य दाखवत आहेत...
एका हाडाच्या प्रामाणिक शिक्षकाचा विद्यार्थी,
आपल्या गुरूंकडे अतिशय खिन्न मनाने पण धीर एकवटायला आलेला असतो..
गंगा गोदावरीला आलेला महापुर..
त्यात वाहून गेलेलं त्याचं अर्धअधिक घर..
गंगार्पण झालेलं काडी काडी करून जमवलेलं घरातलं सामान..
असा सगळा विध्वंस पाहून त्रस्त झालेला असतो..
तो त्यांना परिस्थितीचे वर्णन करून सांगत असतो...
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली,
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.
यात मला सर्वात जास्त आवडलेला त्याचा विचार म्हणजे, गंगा/गोदावरीला त्याने मुलीची/ माहेरवाशिणीची उपमा दिली.. म्हणजे, लग्नानंतर परकी झालेली पोर, जेव्हा जेव्हा माहेरी येते, तेव्हा तेव्हा ती जशी आनंदाने उचंबळून येते, घरात सगळीकडे बागडते, कानाकोपर्यात तिचा हात फिरतो, तिच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात, तशी ही नदी माझ्या घरात येऊन नाचून बागडून गेली..
सगळं पुन्हा सुरुवातीपासून उभं करायचं असताना देखील त्याच्या मनात मात्र सकारात्मक विचार असतात.. सगळं वाहून गेलं तरी बायको वाचली हे समाधान आहे त्याला.
भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले,
प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.
निसर्गाच्या कोपाने असं त्याला रितं केलं खरं, पण त्यातही त्याचा आशावादी सुर दिसतो आणि अश्रुंना तो प्रसाद म्हणून स्वीकारतो.. असा विचार केला तर आपत्तीचा कसा राग येईल हो कोणाला? कसे कोणाला नैराश्य येईल? किती तो मनोधैर्य वाढवणारा विचार..
कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे,
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
‘पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला.
सगळा झालेला विस्कोट पाहून शांतावलेला तो, उठून सहचारिणीच्या सहाय्याने पुन्हा विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न करणार आहे..
स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असल्याने त्याला त्याच्या गुरू कडून पैसे नको आहेत तर पाठीवर मायेचा एक हात फिरलेला पाहिजे आहे..
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्त लढ म्हणा’!
ज्या गुरूंनी लहानपणा पासून ताठ मानेने जगायचे संस्कार केलेत ते अजूनही तो विसरलेला नाही पण या एकाकीपणात त्याला पाठीशी कोणीतरी आहे याचं समाधान पाहिजे. तो आधारच त्याला पुढचं सावरायला मदत करणार आहे..
कसं असतं ना, जेव्हा कधी संकटं समोर येतात तेव्हा, जवळचे म्हणवणारे दूर निघून जातात. आर्थिक नुकसानीने खचलेल्याला अजून खचून जायला ते पुरेसं होतं. अशावेळी, 'तू पुन्हा पहिल्यासारखा उभा रहाशील, धीर सोडू नकोस.' असं म्हणणारा पाठीवर हात असावा असं वाटत राहतं..
कुसुमाग्रजांच्या 'मुक्तहस्त' अलंकाराने नटलेल्या या कवितेत दिसतं,
ते एक संवेदनक्षम मन आणि त्याबरोबरच
जीवनात गरजेची असते ती सकारात्मकता...
अशी ही ऊर्जा देणारी कविता म्हणूनच मला भावते....
राजेश्वरी
२४/०२/२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा