शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

करोनानुभव

#राजेश्वरी किशोर

#करोनानुभव 



"कशी तब्येत आहे ग दोघांची आता?"

"बाकी ठीक आहे पण मला कालपासून वास येत नाहीये."
"तो गेलेला वास येईल दोन तीन दिवसात. काळजी घे."
काल मैत्रिणीचे आणि माझे असे चॅटिंग झाले.'हे काय वास येत नाही तर काळजी घे' असं का म्हणतीये मी, असं नक्कीच तिला वाटलं असणार.
संध्याकाळी दुसर्या मैत्रिणीचा फोन, "अगं, कसे आहात तुम्ही सगळे?"
"आम्ही बरे आहोत आता. तुम्ही ठीक ना?"
"आता ठीक आहोत ग. मागच्या माहित्यात मात्र धाबं दणाणलं होतं."
"का गं?"
"कसला वास येत नव्हता की चव लागत नव्हती. मी तर नुसता कापुर चुरुन नाकात घालून बघायचे पण उपयोग शून्य. फार घाबरले होते मी. काहीही खाल्लं तरी सगळं सारखंच लागायचं. पुठ्ठा खाल्ल्यासारखं. ना मिठाची चव, ना तिखटाची ना साखरेची. नाक, जीभ सगळं बधिर झाल्यासारखं. कान तेवढे शाबूत होते इतकंच."
------------
आजकाल असे संवाद बहुतेक सगळ्यांनी ऐकले असणार. मी कितीही विसरू म्हणता परत परत माझा अनुभव मला आठवायला लागतो मग. कारण मला त्यावरून इतरांना सावध करावं असंच वाटतं. आठवलं की अजूनही अंगावर काटा येतो.
कसं कळलं असेल मला वास येत नाहीये ते? दूध उतू गेलं म्हणून की भाजी जळली म्हणून? नाही नाही... असं काही झालं नाही.
एप्रिल महिन्याचा मी म्हणणारा उन्हाळा होता. दारं खिडक्या संध्याकाळी उघडल्या की बाहेरच्या हिरव्यागार वनराईत दिवसभर आडोशाला बसलेले डास झुंडीने घरात शिरायचे. मग मी आवडीने घेतलेला मातीचा तवा घरात आणायचे. भाकरीसाठी गॅसवर वापरता न आल्याने त्याचा उपयोग आता डासांना पळवण्यासाठी मी करते. त्यात आजूबाजूला मुबलक असणारा कडूलिंबाचा पाला, भाज्यांचे वाळवलेले अवशेष, कापुर वगैरे साहित्य तव्यावर घालून त्याला पेटवायचं. थोडं पेटलं की आग विझवून धूर करायचा आणि थोडा थोडा वेळ सगळ्या खोल्यात तो तवा फिरवायचा असा माझा रोजचा उद्योग असायचा.
त्या आठवड्यात माझा रिपोर्ट positive आल्यामुळे माझी रवानगी वेगळ्या खोलीत झाली होती. तसं तर बहुतेक सगळेच जण positive होतो पण माझा अधिकृत दाखला आला होता.
त्या दिवशी रात्री शेवटी तवा मी माझ्या खोलीत ठेवला. ताट वाढून आणून माझ्या खोलीत बसून जेवले आणि गोळ्या घेऊन दिवा बंद केला. डास इकडून तिकडे जायला नकोत म्हणून खोलीचं दार बंद केलं. डोक्यावरचा पंखा रात्रंदिवस फिरून फिरून दमला होता. त्याचा वारा डासांना दूर घालवू शकत नव्हता. घरच्या दारावर quarantine चा फलक लागल्यामुळे पुढचे १९ दिवस तरी कोणी दुरुस्तीला येणार नव्हतं.
माझं दुखणारं गरम अंग कोणत्याच उपायांनी शांतावत नव्हतं पण झोपायला पाहिजे म्हणून डोळे मिटले मी. विझू विझू लागलेला तवा डोक्याशी असलेल्या टेबलाखाली सरकवला आणि मी डोक्यावरुन पांघरुण घेऊन झोपेची आराधना करू लागले. तास दीड तास गेला असेल, मला खोलीत तड तड तड तड आवाज येतोय असं जाणवलं. हा कसला आवाज येतोय म्हणून डोळे उघडले. रोजची सवयीची खोली नसल्याने दिव्याचे बटण कोणत्या बाजूला आहे ते लक्षात येईना. जवळ असलेल्या मोबाईलची बॅटरी लावली आणि दिव्याचं बटण शोधायला लागले. सगळीकडे धूसर धूसर दिसत होतं. मी घाबरले. आता हे काय नवीन? करोनामुळे चव आणि वास जातो माहीत होतं, मात्र दृष्टी पण? उठून कसाबसा लाइट लावला आणि खोली बघून मी हादरलेच. पूर्ण खोली धूराने व्यापून गेली होती. तव्यात विझू लागलेली धग आत्ता पेटतेय की काय अशी परिस्थिती होती. बंद खोलीत कोंडलेला तो धूर मला कसा कळला नाही याचं आश्चर्य वाटू लागलं. जवळच असलेल्या बाटलीतलं पाणी तव्यावर ओतून बाटली रिकामी केली. मास्क लावला आणि किशोरला उठवायला दुसर्या खोलीत गेले. त्याने माझ्या खोलीत पाय ठेवताच त्याला ठसका लागला. त्याने नाकातोंडावर हात धरला आणि आधी मला बाहेर जायला सांगितले. एरवी उदबत्तीचा देखील धूर सहन न होणारी मी आणि या धुराचा थांगपत्ताही मला न लागावा याचं नवलच वाटू लागलं. सगळ्या बंद केलेल्या खिडक्या उघडल्या, धूर बाहेर जायला पंख्याचा तर उपयोग होतच नव्हता. किशोरने तवा उचलून बाहेर गच्चीवर नेऊन आपटलाच. त्याला आधीपासूनच तो प्रकार आवडत नव्हता, रिस्की आहे म्हणायचा. पण मला ते coil लावण्यापेक्षा हे कमी घातक आहे असं वाटायचं. मग आलापने रूम फ्रेशनर स्प्रे सगळीकडे मारला आणि मी थोडावेळ मन शांत करायला बाहेरच्या खोलीत जावून बसले. खोलवर श्वास घेऊन देखील मला कसलाच वास येत नव्हता. काहीच सुचत नव्हतं. दिवसभर तर भाजीचा आणि इतर वास आले की नाही याचा विचार मनात आणत गेले. कळायला काहीच मार्ग नव्हता. नाक आणि आजूबाजूला सगळं बधिर झाल्याचं जाणवत होतं. दात काढताना इंजेक्शन दिल्यावर कसं बधिर होतं ना तसं वाटत होतं नाकाभोवती. RTPCR रिपोर्ट आल्यावर ऑक्सीजन ९९ आहे, ताप आणि थोडी अंगदुखी इतक्या थोडक्यात निभावलं असं वाटत असतानाच हा प्रसंग ओढवला होता. झालेल्या प्रकारापेक्षा अघटित घडू शकणार्या प्रसंगाच्या विचाराने मन धास्तावलं.
तेव्हापासून कोणी positive आहे असं सांगितलं की वासाची काळजी घ्या असं मी आपसूकच सुचवते.
राजेश्वरी
२७/०९/२०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...