बुधवार, २ डिसेंबर, २०२०

माझा_विषय_माझे_काम_२

 माझा_विषय_माझे_काम_१  



मध्यंतरी बागेत नारळाचं रोप लावायला खड्डा खणणं सुरू होतं. बाकीच्या रोपांच्या मानाने नारळाला जरा मोठा खड्डा लागतो. जस जसं उकरणं सुरू होतं तस तसं दिसत होतं की, ठराविक अंतराने मातीचा रंग वेगळा येतोय. कधी तो तपकिरी तर कधी काळा बाहेर निघत होता. सरकारी घर जर खालच्या मजल्यावर असेल आणि घराभोवती बाग करायला जागा असेल तेव्हा रहायला येणारा प्रत्येक जण बाग फुलवताना हमखास आधी त्यावर गाडाभर माती आणून टाकतो. का तर पहिल्या मातीचा कस चांगला नाही म्हणून. मग नवीन मातीत छान रोपं लावून बाग फुलते.  छोट्या रोपट्यांचं ठीक आहे, नवीन मातीत ती लगेच रुजतील, फुलतील. पण मोठे वृक्ष फळण्या फुलण्यासाठी मुळं खोलवर आत जावी लागतात. त्यांना त्या भागातील मूळ मातीच खतपाणी देते.. 

आपल्या आयुष्याचं देखील असंचं असतं ना? वय वाढत जाईल तशा जबाबदार्‍या वाढत जातात, येणारे अनुभव समृद्ध करत जातात. बरे अनुभव आपली ऊंची  वाढवतात तर वाईट अनुभव आपल्याला खडतर परिस्थितीत उभे रहाताना जास्त बळकटी देतात..  

पण हे वय वाढत असताना आपलं शिक्षण आपले संस्कार नेहमीच पाठीशी असतात. अलीकडे मला लिखाण करत असताना बर्‍याचदा माझी मीच वेगळी गवसत जातेय असं वाटतं. कधीकधी बरेच वेळा जाणवतं ते म्हणजे माझा संयम इतरांपेक्षा थोडा जास्तच आहे. त्याच्यामागचे कारण काय असेल असा विचार नेहमीच माझ्या मनात येत असतो. मग लहानपणापासूनची बरीच कारणं सापडतात.. 

आज हे लिहीत असताना असंच एक कारण सापडलं... 


बारावीचा निकाल लागला आणि पुढे काय करायचे हे विचार मनात येऊ लागले. काही अडचणींमुळे बाहेर शिकायला जाणे शक्य नव्हतं. मग राहता राहिलं आमचं सायन्स कॉलेज, कराड. त्यावेळी गावातल्या कॉलेजच्या अॅडमिशनसाठी आई वडील बरोबर कधी येत नसत. सगळेच निर्णय आपले आपणच घ्यायची मुभा होती. आम्ही मैत्रिणी मिळून अॅडमिशन घ्यायला गेलो. फोर्म तिथेच ऑफिसमध्ये घेतला आणि भरायला लागलो. गणित आवडीचा विषय असल्याने जीवशास्त्र सोडून इतर विषय लिहून फॉर्म देत असतानाच क्लार्कने सांगितलं यावर्षीपासून शिवाजी विद्यापीठात, सायन्स कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन पदवी अभ्यास सुरू होतोय. त्याचा सिल्याबस इंजीनीरिंगचा असणार आहे..  इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स चा ओ की ठो माहीत नसताना देखील सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आणि मनात दाबून ठेवलं गेलेलं इंजीनियर होण्याचं स्वप्न किंचितसं पुरं होईल म्हणून फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय लिहिला. 

कॉलेज सुरू झालं. हळूहळू या वेगळ्या विषयामध्ये आम्हाला आवड निर्माण झाली. आम्ही फक्त बारा जण या विषयाला प्रवेश घेतलेले होतो. त्यात फक्त तीन मुली. लहानपणापासून मुलींची शाळा असल्याने मुलांशी बोलणं कमीच व्हायचं. पण छोटं गाव असल्याने बरीच मुलं माहितीतली होती. 

प्रॅक्टिकल सुरू झाली आणि आमचा खरा कस लागायला सुरुवात झाली. आत्तापर्यंत सेल जोडून, वायर जोडून छोटा दिवा लागणं म्हणजे साधारण सर्किट असं माहीत होतं. नवीन नवीत प्रोजेक्ट करायला सुरुवात झाली आणि PCB करण्याची गरज भासू लागली. कराडमध्ये त्यावेळी सहजासहजी इलेक्ट्रॉनिक्सचं सामान मिळत नव्हतं. आमचे सर एकदम उत्साही त्यांनी आम्हाला PCB करण्यापासून सुरुवात करायची सवय लावली. 

तोपर्यंत आम्ही कोणताच PCB हाताळलेला नव्हता. 


PCB बनवण्याइतकं किचकट काम कोणतंच नसेल. पण मी रमून जायचे त्यात.. 

आधी कागदावर सर्किट डायग्राम काढायची, तिला लहानात लहान/कमी जागेत कशी बसवता येईल ते आखून घ्यायचं. मगच त्या आकाराचा बोर्ड घ्यायचा. 

PCB करण्यासाठी तांब्याच्या पातळ पत्र्याचा मुलामा चढवलेला बोर्ड आपल्याला पाहिजे त्या आकारात कापून घ्यायचा. दुकानातून आणलेल्या बोर्डवर असलेला तांब्याच्या पत्रा आधी स्वच्छ धुवून मग त्यावरचे दिसणारे, न दिसणारे डाग एका द्रावणाने भिजवलेल्या कापसाने साफ करावे लागत. तो पत्रा एकदम तेजाळला पाहिजे, पुन्हा त्यावर कोणतेही डाग किंवा बोटांचे ठसे उमटले जाणात नाहीत याची काळजी घेऊन त्यावर पेन किंवा पेन्सिलने सर्किट आखून घ्यायचं. नंतर मार्कर पेन बाजारात आली पण तोपर्यंत त्यावर आखणे जरा कठीणच जायचं कारणं चुकून जरी बोट लागलं की आखलेली रेष पुसून गेलेली असायची. मग त्या सर्किटवर जिथे जिथे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनेंट बसवायचे असतील तिथे किंचितसा गोल ठिपका द्यायचा. सगळी आकृती मनासारखी जमली की, त्या ठिपक्यांना ड्रिल मशीनने भोकं पाडायची. त्यासाठी सर्वात लहान आकाराचं ड्रिल बीट वापरायला लागायचं. 


आम्हा मुलींचे हात आधीच नाजुक, त्यात त्या ड्रिलमशीनचे वजन, ते वापराची कधी सवय नाही, आणि ड्रिल बीट आमच्यापेक्षा नाजूक.. अजून डोळ्यासमोर येतात ते प्रोजेक्ट. एकीने बोर्ड टेबलवर धरायचा आधी टाचणीने किंचित ठोका मारून खूण करून घ्यायची मग दुसरीने अलगद त्यावर ड्रिल करून भोकं करायची. बोर्डला काटकोनात उभं ड्रिल धरलं तरच नीट भोक पडायचं. हात जरा जरी हलला आणि कोन बदलला तर हमखास ड्रिल बीट तुटलेच म्हणून समजा. ते तुटताना नुसतंचं नाही तुटायचं तर त्या बोर्डवर आपली निशाणी सोडून तुटायचं. बोर्ड खराब झाला की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात. नंतर नंतर अनुभवाने आम्ही लीड पेन्सिलची लीडची डबी कशी असते तशी डबी भरून ड्रिलबीट जवळ बाळगू लागलो.  सवयीने आम्हाला ड्रिल करणं जमू लागलं. 


बहुतेकवेळा मुलींच्या पर्समध्ये मेकअपचे सामान, कंगवा असतो पण आमच्या पर्समध्ये, बोर्ड साफ करायचे द्रावण असलेली बाटली, कापूस, टाचणी, ड्रिल बीट असलेली डबी, ऑइल पेंटचा छोटा डबा, छोटा ब्रश, कॉम्पोनन्ट पकडायचा चिमटा आणि बरंच काही असायचं.. 


पाहिजे तिथे भोकं पाडून तयार झालेला बोर्ड पुन्हा एकदा घासून पुसून उजळवायचा. मग त्यावर परत एकदा सर्किटची आकृती काढायची. त्या आकृतीवर झीरोच्या ब्रशने एकसारख्या जाडीच्या रेषांनी गिरवून आकृती काढायची. यावेळी हात उलटा फिरता कामा नये, पेंट लावताना त्यात सूक्ष्म बुडबुडे देखील तयार व्हायला नकोत. रंग पातळ नको की घट्ट होऊ लागलेला नको. रेषा सरळ झाल्या पाहिजेत. खूपच कौशल्यपूर्ण रीतीने काढलेली आकृती पूर्ण वाळेपर्यंत 3,4 तास तरी बोर्ड बाजूला सुरक्षित ठेवायला लागायचा. बहुतेकवेळा त्याची पुढची पायरी दुसर्‍या दिवशी केली जायची. असा हा पुर्णपणे सुकलेला बोर्ड एका मोठ्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या सपाट तळ असलेल्या भांड्यात तांब्याचा पृष्ठभाग वर करून ठेवायचा. तो बोर्ड बुडेपर्यंत त्यात इचिंगचे म्हणजेच कोरण्याचे मिश्रण घालायचे. परत त्याला हात न लावता 4, 5 तास ठेवायचे. त्यापेक्षा जास्त नाही की कमी नाही. म्हणजे रंग लावलेल्या भागावर तांबे तसेच राहील आणि इतर भागावरचे तांबे मिश्रणात विरघळून जाईल. अति काळजी घेऊन केलेला या बोर्डच्या रंग लावताना जर बुडबुडे जमले असतील तर तिथेही इचिंग होऊन बोर्ड खराब होणार मग सगळी प्रक्रिया पुन्हा पहिल्यापासून करायची.. असे तीन वर्षात कितीतरी बोर्ड आणि त्यानंतर त्यावर कॉम्पोनेंट जोडून प्रोजेक्ट आम्ही केले. कॉम्पोनेंट जोडण्यापूर्वी त्यांच्या बारीक तारा पाहिजे तेवढ्या लांबीच्या कापून त्याची टोकं जिथे सोल्डरिंग करणार ती घासून साफ करून मगच जोडणी करायची. सोल्डरिंग करतानाही खूपच काळजी घ्यावी लागायची. सोल्डरिंग आयर्न जर कमी वॉट ची असेल तर लवकर मेटल वितळणार नाही पण त्या ऐवजी जोडणी केला जाणारा कॉम्पोनेंट जास्त गरम होणार, आतून खराब होणार आणि पूर्ण प्रोजेक्ट झाल्यावर का काम करत नाही त्याचा शोध घेऊ लागलो की त्याचा खराब पार्ट सापडणार. त्यासाठी पार्ट जोडतानाच त्याला चिमट्याने व्यवस्थित पकडला तर त्याची जास्तीची उष्णता त्या  चिमट्यात जाते, म्हणजेच चिमटा हीटसिंकचं महत्वाचं काम करतो. 


स्वच्छ आणि कौशल्यापूर्ण जोडणी पूर्ण झाल्यावर प्रोजेक्ट पूर्ण झाला की एका गोंडस अपत्त्याला जन्म दिल्याचा भास व्हायचा. मग ती अगदी छोटी चिवचिव करणारी घराच्या दारात लावली जाणारी बेल असेल, गजराचं डिजिटल घड्याळ किंवा छोटासा खिशातला रेडियो असो.. प्र्त्येकवेळी तितकाच आनंद. तयार झालेल्या प्रोजेक्ट साठी मग प्लायवूड किंवा अॅक्रेलिक शिट कापून गरम करून त्याचा बॉक्स बनवायचा.. 


आमची पहिलीच बॅच असल्याने आमच्या सरांनी देखील आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली. त्याचा उपयोग नंतरच्या प्रत्येक वर्षाच्या विद्यार्थ्यांना झाला.  खूप उत्साहाने आम्ही सगळेजण काम करायचो. 


माझ्यासाठी हे शिक्षण नंतरच्या नोकरीत देखील उपयोगी पडलं. रेडियो-टीव्ही-टेप पासून घरातल्या कित्येक इलेक्ट्रॉनिक वस्तु मी सहजरीत्या दुरुस्त करू लागले. त्याचं प्रशिक्षण मुलांना देऊ लागले. 

त्यावेळी नवीन कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक टायपिंग मशीन माझ्या एका मैत्रिणीकडे घेतलं होतं. त्यात काही बिघाड झाला की पुण्याला घेऊन जायला लागायचं किंवा पुण्याहून मेकॅनिक बोलवायला लागायचा. एकदिवस मी बघते म्हणाले आणि ते दुरुस्त केलं. 


सगळ्या बाह्य उपकरणांपेक्षा मला त्यांच्या मागे जाऊन, उघडून दुरुस्त करण्यात समाधान मिळायचं. त्यावेळी घरात असलेला टीव्ही मी फक्त दुसर्‍याचा दुरुस्त केलेल्या टीव्हीच्या चित्राशी तुलना करण्या पुरताच बघायचे. 


आता सगळंच बदललं.. उपकरणं पण आणि माझं आयुष्य पण ,माझे विषय पण आणि माझे काम पण...  

 

त्यावेळी रुजवलेली संयमाची पाळंमुळं आता खोलवर रुजल्यामुळेच येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन खंबीरपणे उभी राहू शकते..    




राजेश्वरी 

३०/११/२०२०                 





#माझा_विषय_माझे_काम_२ 

 



लग्न झाल्यावर देखील माझं इलेक्ट्रॉनिक्स प्रेम मला गप्प बसू देत नव्हतं. कराड सोडून पुण्यात आल्यावर आजूबाजूच्या ओळखी होईपर्यंत ते जरा रेंगाळलं होतं इतकंच. माहितीतल्या घरातला एखादा टेप रेकॉर्डर, टीव्ही बिघडला तर तिकडे जाऊन दुरुस्त करून यायचे. जवळच्या एक दोन मुलींना इलेक्ट्रॉनिक्स शिकवत होते. बाळाची चाहूल लागली तरी काम सुरूच होतं. अगदी बाळ पोटात असेपर्यंत…

 मला आठवतो तो एक दिवस, एकांच्या घरी मी रंगीत टीव्ही उघडून बसले होते पण तो टीव्ही कमी उंचीवर ठेवल्यामुळे मला खाली वाकावं लागत होतं. मी वाकायला लागले की बाळ पोटात जोरात लाथा मारायला लागायचं आणि मी ताठ व्हायचे. काही केल्या मला टीव्हीत डोकं घालता येत नव्हतं.. अखेर टीव्हीला हव्या त्या उंचीवर ठेवलं आणि मी सहजपणे त्याला सरळ करू शकले. त्यावेळी मोबदला न घेतल्यामुळे त्यांनी मला एक बाल संगोपनावर असलेलं 'माय बेबी' नावाचं सुंदर पुस्तक दिलं. ते पुस्तक, माझ्या हातातली माझी हत्यारं दूर करायला भारी पडलं.. 

   

सुरळीत चाललेलं आयुष्य..  अचानक एक दिवस असं काही वळण घेतं की, आपण परत उलट फिरू की नाही असा संभ्रम पडतो.. मागे पडलेला भूतकाळ सोडावासा वाटत नाही आणि नव्याने जन्मलेला वर्तमानकाळ मागे वळू देत नाही. माझ्या आयुष्यात असंच एक वळण आलं. यापूर्वी कधीही न पाहिलेलं, न अनुभवलेलं.. पुढे जाण्याचा मार्ग कसा आहे ते माहीत नसलेलं. त्या मार्गाने पुढे जाणं तर भागच आहे. वाटेत येणारे खाच खळगे किती खोल आहेत याचा अंदाज नसल्याने कधी तोंडावर आपटवणारे, कधी पाय मुरगळवणारे किंवा कधी नुसतेच ठेच लागणारे.. 


पूर्वी शिक्षण घेऊन त्याचा वापर केला होता, 

आता अनुभव घेत शिक्षण घ्यायचं होतं. या अनुभवातून मी काय शिकले, असं माझं मीच मला विचारते कधी कधी.. 

उत्तर येतं,

हो, खूप काही शिकलीस की...   

माणसं वाचायला शिकले.

जवळचे दूरचे ओळखायला शिकले. 

कोणाकडून काहीच अपेक्षा ठेवू नये, हे शिकले. 

मार्गात अडचण आली तर बाहेर पडायला शिकले. 

माणसांच्या वागणुकी मागंचं कारण शोधायला शिकले.

आरोहीच्या जन्मानंतर हे शिक्षण सुरू झालं... 

 

आपल्या पंचेंद्रियातील एक ज्ञानेंद्रिय काम करत नसेल, तर त्याची ती काम करण्याची शक्ति दूसरा अवयव जास्त सशक्त करत असावी. म्हणजे जर डोळे काम करत नसतील तर कान, नाक आणि स्पर्श जास्तच तल्लखपणे काम करतात. कानाने ऐकू येत नसेल तर नजर तीक्ष्ण असते. 

काहीवेळा मेंदुतून येणार्‍या लहरी कोणत्याच इंद्रियाला पुरेश्या पोचत नाहीत त्यावेळी त्या व्यक्तिला दुसर्‍याने सांभाळण्याची गरज असते. 


घरात एखादं दुर्बल मूल जन्माला येतं किंवा काही दिवसांनंतर आपलं मूल विशेषत्व घेऊन जन्मलंय असं कळतं, त्यावेळी मुलापेक्षा जास्त सगळं घर दुर्बल, असहाय्य होऊन जातं. आईने नऊ महीने बाळ पोटात वाढवताना पाहिलेली सगळी स्वप्न क्षणात विरून जातात. आपल्याच मुलाच्या वयाचं दुसर्‍याचं मूल वाढताना बघितलं की मन तीळ तीळ तुटताना जाणवतं. मुलाने आपल्याला आई म्हणून हाक मारावी, आपण मारलेली हाक ऐकून आपल्याकडे रांगत/धावत यावं. प्रेमाने आपल्या कुशीत येऊन आपल्या गालावरून त्याचे मऊमऊ कोवळे हात फिरवावेत.. किती आणि कोणती स्वप्नं आईने बघितली असतात.. मुलाचं सामान्य वर्तन/वाढ नसणे आणि त्याची प्रगति कशी करावी याची चिंता आईला सतावत असते. बाळंतपणाचा ओलावा अजून संपलेला नसतानाच हा आघात होणं, अतिशय त्रासदायक असतं सावरणं. यावेळी कोणाची तरी साथ असावी. समजुतीची, मायेची, आधाराची तिला अत्यंत गरज असते. तिची ही घालमेल कित्येकदा नाही ओळखत कोणी, ना घराचे ना दारचे.. 'मूल असं कसं जन्मलं ग' म्हणत तिच्यासमोर डोळ्याला पदर लावायचा किंवा तिला त्रास होईल असे कित्येक उपाय, अनुभवाचे बोल म्हणून सुचवायचे. अशावेळी एखादी आई मनातला राग संताप मुलावर काढायला लागते, त्याला कोसत रहाते. त्या कोवळ्या जीवाचा काय बरं दोष? त्यातच जर दुसरं सामान्य मूल घरात असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्तच.. त्या विचाराने आई धास्तावलेली असते.. 

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या आईने लवकरात लवकर आपल्या मुलाचे दोष स्वीकारले पाहिजेत. संकटाचा स्वीकार केला ना की त्याची तीव्रता एकदम कमी होऊन जाते. त्यानंतरच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग/उपाय सापडतो. 

खूप कमी पालक मी पाहिलेत की जे मोकळेपणाने आपल्या मुलाबद्दल बोलतात. त्यांचा कल त्याचं व्यंग लपवण्याकडेच जास्त असतो. 

मी नेहमी बघत आलेय की, बुद्धीने चांगली असलेली पण शारीरिक व्यंग असलेली मुलं खूप तापट असतात आणि ज्यांची मुलं बुद्धीने कमजोर असतात त्यांचे पालक तापट असतात. खरं तर तापटपणा येतो जेव्हा आपण एखाद्या अडचणीत अडकलो असू आणि त्यातून बाहेर पडता येत नाही तेव्हा. मुळात कोणीच तापट नसतं. असहाय्य परिस्थिती त्याला तशी बनवते. तापटपणा वाढवायला कित्येकदा आजूबाजूचं वातावरण, समोरची व्यक्ती कारणीभूत ठरते. 

उदाहरण द्यायचं तर एखाद्या अंध मुलाला आपण सहजपणे म्हणून जातो, 'अरे वा, किती सुंदर इंद्रधंनुष्य दिसतंय. पण तू बघू शकत नाहीस ना. Badluck..' अरे त्या ऐवजी त्याचं छानसं वर्णन केलं तर तोही तुमच्या डोळ्यांनी बघू शकेल ना. अगदी नकळतपणे समोरचा बोलून जातो पण काय चुकलं ते त्याला देखील कळत नाही.     

काहींचा बुद्ध्यांक चांगला असतो पण शारीरिक दुर्बलतेमुळे बाहेरच्या जगात वावर नसल्यामुळे अनुभव कमी मिळतात.. त्यांना तू कसा पळू शकत नाहीस हे जाणवून द्यायची गरज नसते.. साध्या साध्या गोष्टी असतात पण त्या मुलाला व्यंग जाणवू न देता वागता/वागवता आलं पाहिजे. 

घरच्यांनी नाकारलेल्या मुलाच्या आईला समजून घेता आलं पाहिजे. 

इतक्या वर्षांपासून जेव्हा जेव्हा अशा पालकांना, मुलांना भेटते आणि त्यावेळी त्यांच्या वागण्यात काही खटकतं तेव्हा तेव्हा मी त्यांना समज देते. अगदी मवाळपणे.

मान्य आहे मी मनोचिकित्सा/सायकॉलजी शिकलेली नाही. इच्छा असून देखील शिकता आलं नाही पण समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामागं जायला शिकलेय. अनुभवांनी.. 

समोरच्याच्या दुर्बलतेची कीव करू नये, त्यांना हिणवू नये तर त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यासाठी ती वाट सुकर कशी होईल हे बघता आलं पाहिजे हे कळलंय मला..

आरोहीला शाळेत घेऊन जायचे तेव्हा काही लहान मुलांच्या पालकांशी मी बोलायचे, त्यांना समजावायचे.. कधीतरी एखादी आई येऊन सांगायची, "मॅडम, तुम्ही सांगितल्यापासून याचे वडील याच्याशी आता चांगले वागतात, त्याला मारत नाहीत. त्याच्यावर प्रेम करतात."

खरं सांगू, हे ऐकल्यावर त्या मुलाची मारातून सुटका झाल्याचा आनंद माझ्यासाठी फार मोठा असतो.. त्यावेळी मला माझ्या सुटलेल्या विषयाबद्दल कधीच खंत वाटत नाही.. 


(खूप मोठा विषय आहे. गेल्या पंचवीस वर्षातले खूप अनुभव आहेत)  




राजेश्वरी 

०२/१२/२०२०  

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...