आठवणीतली दिवाळी
दिवाळी सण आला
हर्षाचा तेजाचा
आनंद दीपाचा
दिवाळी सण आला
लक्ष्मी पूजेचा
भक्ति प्रीतीचा
दिवाळी सण आला
दर वर्षी दिवाळी येते.
नुसतेच दिवे लावून उजेड न येता कर्म आणि चिंतनातल्या पावित्र्याचं तेज घेऊन येते..
माझी दिवाळी साजरी
करण्याबद्दलची मानसिकता माझ्या वयाबरोबर बदलत जातेय. तिचा आवाका वाढत जातोय.
दिवाळी म्हणजे आश्विन महिन्याचा संधिकाल जाऊन कार्तिक महिन्याचा उदय, गुलाबी थंडीची चाहूल लागणारा काळ..
लहानपणापासून मी दिवाळी
समजत आलेय ती सहजीवनात आनंद लुटण्याचा सण असंच.. आम्ही सगळी भावंडं, सखेसोबती मिळून किल्ला बनवणे, फटाके फोडणे, नवीन कपडे घालून मंदिरात जाणे आणि त्याचबरोबर आईने केलेले फराळाचे जिन्नस फस्त
करणे हे आमचे दिवाळीचे समीकरण असायचे. त्याचबरोबर अजून एक शिकवण होती ती म्हणजे, आप्तस्वकियांबरोबरच जवळ रहाणार्या मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांना फराळाचे डबे पोचवणे..
जसं वय वाढत गेलं तशी
दिवाळी साजरी करण्याची कल्पना बदलत गेली. सकाळी उठून फटाके फोडून प्रदूषण
वाढवण्यापेक्षा पहाटे उठून एखाद्या गड, किल्ल्यावर जाणे आवडू लागले. तसंच चार दिवस मैत्रिणींबरोबर पर्यटन आवडू लागलं.
लग्न झाल्यावर त्यात खूपच
बदल होत गेले.
नवर्याची दर दोन, तीन वर्षांनी भारतभर बदलीची नोकरी असल्याने, विविध प्रांतातली दिवाळी अनुभवता आली. मला जाणवलं ते
म्हणजे, प्रत्येक प्रांतात, राज्यात इतर कोणतेही सण वेगळे असले तरी दिवाळी हा सण
सगळीकडे साजरा केला जातोच. फक्त तो महाराष्ट्रासारखा पाच पाच दिवस न साजरा करता एक
लक्ष्मीपूजन आणि दुसरं भाऊबीज हे दोन दिवस तरी साजरे होतातच.
पुण्यातून आम्ही जामनगरला
गेलो त्या वर्षीची दिवाळी मला अजून आठवते, घरी फराळाचं केलं पण खायला कोणीच कोणाकडे जात नव्हतं. मग मीच सुरुवात करून
ऑफिसमधल्या सहकार्यांना सहकुटुंब बोलावलं. मस्त गप्पा मारत खादाडी झाली. ते पाहून
मग सकाळ संध्याकाळ सगळ्यांचे एकमेकांकडे बोलावणे सुरू झाले आणि आठवडाभर घरची चूल
बंद राहिली..
पोरबंदरला असताना आम्ही
गावात रहात होतो. गुजराती लोक बहुतेक सगळे व्यावसायिक त्यामुळे, त्यांचं लक्ष्मीपूजन त्यांच्या दुकानात जोरात साजरं
केलं जायचं. मुहूर्तावर पूजा पूर्ण झाली की बाजारपेठ फटाक्यांचा आवाज आणि धूराने
भरून जायची..
महाराष्ट्र सोडलं तर इतर
कोणत्याच राज्यात दिवाळीला एक दिवसांपेक्षा
जास्त सुट्टी नसते. जोडून रविवार आला तर पर्वणीच असायची.
बेळगावला एका दिवाळीत
आम्ही एक पूर्ण दिवस वृद्धाश्रमात साजरा केलं. त्यांना फराळ घेऊन गेलो. त्यांच्याबरोबर जेवलो. त्यांच्याशी गप्पा मारल्या.
अगदी फटाके फुटल्यासारखे काहीजण आमच्याशी आठवणी बोलत राहीले. त्यांच्या चेहर्यावरचा
आनंद पाहून खूप समाधान वाटलं. नजर आमच्यावर पण मनात त्यांची मुलं आहेत हे त्यांच्या नजरेत जाणवत होतं, ते माझ्या मुलांना बघून ते
त्यांच्या नातवंडांच्या आठवणीत रमले. त्यादिवशी जाणवलं, कुठेच नाही मिळत हे समाधान..
विशाखापट्टणमला किंवा
दक्षिणेत एकूणच सगळीकडे धार्मिक प्रस्थ जरा जास्तच आहे. अजूनही तिथे पूर्वापार
चालत आल्याप्रमाणे लक्ष्मीपूजन करतात.. आपल्याकडे भाऊबीज झाली की मुख्य दिवाळी
संपते. मग तुळशी विवाह असतो. तिथे अजून एक पद्धत कळली, कार्तिक पंचमीला तिथे नाग पंचमी मानतात आणि नवरा
बायको जोडीने नागाची पूजा करायला मंदिरात जातात. ऑफिसला सुट्टी नसेल तरीही मुद्दाम
रजा काढून जातात..
कार निकोबारला आम्ही एक
दिवाळी साजरी केली. त्सुनामी नंतरची दिवाळी, आजूबाजूला लाटांनी केलेल्या विध्वंसाच्या खुणा आणि सगळ्यांच्या चेहर्यावरचे
सुन्नपण मला बघावत नव्हते. मेसमधील स्वयंपाक्याला मदतीला घेऊन वीस एक जणांसाठी
पुरणपोळया केल्या. त्यानंतर प्रत्येकाच्या घरच्या दिवाळीच्या, मुलांच्या आठवणी निघाल्या. आम्ही सोडून कोणीच मराठी
नसल्याने पुरण पोळी सगळ्यांनीच आवडीनं खाल्ली. त्सुनामीनंतरच्या पुनर्वसन कार्यात
त्या दिवसाने सगळ्यांनाच अजून उभारी आली असावी असं मला जाणवलं.
नशिराबाद आणि बेळगावची
दिवाळी अजून एका दृष्टीने महत्वाची वाटते ती म्हणजे, दिवाळीचा एक दिवस आम्ही विशेष मुलांच्याबरोबर साजरा करायचो. त्यांना हाताशी
धरून, पणत्या लावणे, फटाके उडवणे, नाच गाणी करणे आणि शेवटी फराळ करून प्रत्येकाला छोटीशी भेट देणे.. त्यावेळी
त्यांच्या चेहर्यावरचा निर्भेळ आनंद अवर्णणीय असायचा. त्यात काही मुलं अंध होती
तर काही मुक बधिर. अंध मुलं सांगायची आम्ही दिवाळी ऐकतो आणि त्याचा गंध हुंगतो तर
मुकबधिर मुलांना विचारलं 'कसं वाटलं?' तर ते हातांनी मस्त दाखवायचे आणि उद्या मारून आनंद
व्यक्त करायचे..
हे सगळं साजरेपण, नाही त्या नवीन कपड्यात, नाही त्या घरच्या दारात फटाक्यांच्या माळा लावून..
या सगळ्यांचं हास्य ऐकलं, बघितलं की हजारो
फटाक्यांच्या माळा उडवल्याचा भास होतो मला..
दिवाळी साजरी करणे म्हणजे
उपेक्षितांना नात्याची ऊब देणे..
कालच्यापेक्षा आजचा दिवस उजळून निघणार आहे, हा आशावाद देणे.
दिवाळी म्हणजे कालची काजळी झाडून आजची ज्योत उदयाकडे नेणे.
ही अपूर्वाई तेजाची, मांगल्याची, पुन्हा नव्याने जुळवलेल्या संवादाची आहे.
म्हणूनच मला असं वाटतं की, कितीही व्यग्र असलं तरी दिवाळीसाठी प्रत्येकानं आपुलकीच्या नात्यासाठी थोडा वेळ काढा.
हा दीपोत्सव म्हणतो, बाहेर प्रकाशाचा झगमगाट जरूर करा, पण मनाचं तळघरही नक्षत्रांच्या लखलखाटाने उजळून टाका.
तेज केवळ तनाचं नको, तर सहिष्णूतेतून आलेल्या पावित्र्याचं हवं.
हा सण अमावस्येतून कर्तृत्वाच्या पौर्णिमेकडे घेऊन जातो.
दिवाळी सण नेहमीच साजरा
करा पण सत्कार्य करून मिळणार्या समाधानाने...
राजेश्वरी किशोर
२८/१०/२०२०
#माझी बालपणीची दिवाळी..
"नमस्कार मंडळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!"
"कसे आहात सगळे?"
"आम्ही मजेत. तुम्ही?"
"कशी साजरी करताय दिवाळी?"
"ए काय काय करताय?"
"कुठलं काय? काहीच मजा नाही या वर्षी."
"राहून राहून लहानपणीची आपली दिवाळी आठवते."
"त्यावेळची मजा काही औरच असायची. "
"हो ना. त्याची सर आताच्या दिवाळीला कुठे येणार."
"पण आता या तंत्रज्ञानामुळे आपण असं भेटू तरी शकतोय."
"भेटू नाही ग, बघू शकतोय."
"खरं आहे. लांब राहून एकमेकांना बघण्यावर समाधान मानायचं."
अश्या आणि इतर बर्याच गप्पा सुरू होत्या कितीतरी वेळ. पण माझं मन मात्र गुंतलं ते बालपणीच्या दिवाळीत..
त्यावेळची दिवाळी फक्त दोन चार दिवसांची नसायची तर ती महिनाभर आधीपासून सुरू
व्हायची..
सहामाही परीक्षेचं वेळापत्रक मिळालं की तिथूनच दिवाळीचे वेध लागायला सुरुवात
व्हायची. मुख्य औघड पेपर झाले की दिवाळीचे मनसुबे तयार व्हायचे..
आमच्या वाड्यात आम्ही धरून पाच बिर्हाडं रहायची. सगळ्यांची मुलं मिळून आम्ही दिवाळीची चर्चा सुरू करायचो.. दुपारी पेपर
संपवून आलो की मागच्या जिन्यात मैफिल जमायची.. रांगोळी, मेंदी, पणत्या, आकाशकंदील, फटाके, किल्ला आणि नवीन कपडे.. या सर्वांवर चर्चा
सुरू असायची आणि घरातून आई भाजत असलेल्या भाजणीचा खमंग वास दरवाळायचा.. आत्ता उठून चकली, कडबोळे तोंडात
टाकावेत असं वाटायचं.. बाकी फराळ करायला आईला मदत करावी लागायचीच.. वर सल्ले पण ऐकावे लागायचे.. जसं..
लाडू वळताना हमखास बाबा तो कसा दोन्ही तळहातावर घेऊन गोल गोल फिरवायचा म्हणजे
त्याला तकाकी येईल ते दाखवणार.. चकली पाडताना सोर्या किती उंचीवर धरायचा, चकली मधोमध गोल केली की तिचा आकार गोल कसा येईल, कडबोळे वळताना पीठ कसं मळून घेतलं की आत
जाळी पडते ते दर वर्षी ऐकायला लागायचं.
बाबांनी चिवडा करणं म्हणजे एक सोहळा असायचा.. सकाळी उठून बाबा माळ्यावरून मोठं पितळी
पातेलं आणि झारा खाली आणणार. मग तो चिंच-मीठ लावून घासून ऊन द्यायला अंगणात ठेवणार. घरच्या खोबर्याचे पातळ काप करून ठेवणार, जोडीला शेंगदाणे, भाजकी डाळ, कढीलिंबाची पानं, हिरव्या मिरच्या
चिरून वाळवलेल्या, पिठीसाखर, धणे जिरे पूड, आणि इतर साहित्य वेगवेगळं मांडून ठेवणार. आधीच स्वच्छ करून नवीन वाती घातलेला
स्टोव्ह मधोमध पेटवणार. पातेलं तापलं की तेल टाकून बाबा एका हातात झारा आणि एक हात स्वच्छ
हातपुसण्याचं फडकं पातेलं धरायला घेणार.. आम्हाला एकेक पदार्थ तेलात टाकायला सांगणार. मनाजोगतं सगळं
तळून झालं की त्यात साफ केलेले पोहे ओंजळीतून पसरवत पसरवत घालायला सांगणार. एकही पोहा खाली न
पडू देण्यासाठी शिकस्त करावी लागायची. नाहीतर ओरडा बसलाच म्हणून समजा. तयार झालेला चिवडा चव घ्यायला मात्र सगळी बच्चेकंपनी पाहिजे. त्यांना आवडला
चिवडा की मग झालं.
तयार झालेला सगळा फराळ देवघरात मांडायची पण एक पद्धत असायची. विटा ठेवून
त्याभोवती मुंग्या येऊ नयेत म्हणून डीडीटी पावडरची रांगोळी काढायची. त्यावर एक फळी
ठेवून मग त्यावर सगळे फराळाचे डबे ठेवायचे. असा हा सगळा फराळ झाला तरी एक पदार्थ
मात्र हमखास लक्ष्मी पूजनालाच व्हायचा. तो म्हणजे अनारसे...
अनारसे करायला दहा बारा दिवस आधिपासून त्याचे सोपस्कार करायचे.. तांदूळ चांगले
धूऊन मग भिजत टाकायचे. भिजलेले तांदूळ थोडावेळ कापडावर पसरायला पांढरं शुभ्र धोतरच लागायचं. इतरवेळी ते कोणी
नेसणार नाही पण वर्षातून एकदा ते असं बाहेर निघणार. अर्धवट सुकलेले तांदूळ मग कोपर्यात असलेल्या
उखळात कुटले जायचे. हे उखळ स्वयंपाकघरात कोपर्यात जमिनीत फरशीच्या जागी पुरलेलं होतं. तांदूळ कुटायला
मात्र आमचे सगळ्यांचे हात लागायचे. अनारसे खायचे तर तांदूळ पीठ करा नाहीतर खायला मिळणार नाहीत असं सांगितल्यावर
गप्प बसून हात दुखेपर्यंत कुटत राहायचं.. नंतर उखळ जाऊन खलबत्ता आला मग मिक्सर.. मिक्सरमुळे
सगळ्यांचच काम हलकं झालं.. चाळलेलं पीठ आई परातीत घेऊन त्यात लगेच बारीक चिरलेला गूळ मळायची. तांदळातला ओलावा
असेपर्यंत गूळ मिसळला तर गोळा तयार होणार, ओलावा जास्त असेल तर गोळा पातळ होणार. हे गणित नीट जमलं
तरच अनारसे मस्त जाळीदार होणार.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी जेवण झालं की एकीकडे आईबरोबर अनारसे थापायला
बसायचं.
तेही
थापताना एकाच बाजूला खसखस लागली पाहिजे. गरम तुपात अनारसे अलगद सोडताना वरच्या बाजूला कशी खसखस आली पाहिजे, तो तळताना कसं त्यावर तूप
उडवायचं हे सगळं शिकायला लागायचं. ते झालं की दुसरीकडे बाबांची लगेच पूजेची तयारी सुरू व्हायची..
सतरंजी पसरून त्यावर गालीचा घालायचा. एका कडेला गादीची घट्ट गुंडाळी करायची. त्यावर लाल मखमली बेडशीट लपेटायचा. त्या गुंडाळीला मग
लक्ष्मी देवीचा फोटो मधोमध टेकवून ठेवायचा. फोटोपुढे तीन चांदीची ताटं, त्यांच्या दोन्ही बाजूला स्वच्छ चकचकीत मोठ्या समया. ताटांमध्ये दागिने, नाणी, नोटा, चांदीचे बाउल मांडलं जायचं.. त्या दिवशी
आम्हाला जुनी शुद्ध चांदीची दहा रुपयाची नाणी हातात घेऊन बघायला मिळायची. नव्या एक, दोन, दहा रुपयांच्या
नोटांची बंडलं पण या पूजेसाठी वेगळी ठेवलेली असायची.. घरातले, आईचे दागिने या निमित्ताने मला पूजा
झाल्यावर थोड्यावेळासाठी घालून बघायला मिळायचे. किती आनंद व्हायचा ते घालून बघताना.. तर या लक्ष्मीच्या पूजेत समोर पाच प्रकारची फळं, भाताच्या लाहया, बत्तासे, दूध आणि ताजे ताजे
अनारसे नैवेद्याला असायचे.. पंचांगात मुहूर्त बघून बाबा दोन्ही भावांकडून पूजा करून घ्यायचे. मनोभावे सगळ्यांनी
झेंडूची फुलं, बत्तासे, लाहया, हळदी-कुंकू वाहून आरती केली की सगळ्यांना प्रसाद द्यायचा.
पण या प्रसाद घेण्यात आम्हाला आजिबात रस नसायचा. आम्ही धावायचो ते फटाके फोडायला. बाबा जेव्हा
पूजेची तयारी सुरू करायचे तेव्हाच भाऊ फटाक्यांचे वाटे करायचे.. वाड्यात
प्रत्येकाच्या घरात एकाचवेळी पूजा सुरू व्हायची आणि वाड्याच्या बाहेर एकत्र फटाके
फोडायचे. लवंगी तोट्याच्या माळा, फुलझडी, भुई चक्र, सुदर्शनचक्र, झाडं किंवा अनार, फूलबाज्या असे आणि अनेक फटाके एकापाठोपाठ एक असे तासभर तरी उडवत राहायचो.. नुसता सगळीकडे
उजेड,
धूर आणि
आवाजाचे साम्राज्य असायचं. आमचा वाडा मुख्य बाजार पेठेपासुन जवळच असल्याने सगळ्या दुकानदारांची आतषबाजी
बघायला मिळायची.. बाण कुठेही कसाही उडतो त्यामुळे बाबा घरी कधी बाण आणायचे नाहीत. त्यामुळे बाटलीत
बाण उभा ठेवून पेटवणे बघायला आम्हाला नेहमीच उत्सुकता असायची...
दिवाळीच्या प्रत्येक दिवशी पहाटे उठून, सुटली बॉम्ब लावून वाडा दणाणून सोडायचा. मग एकेकाला माझी
मोठी काकू सुगंधी तेल लावून द्यायची. खरं तर सकाळी गुलाबी थंडी सुरू झालेली असायची आणि काकुची थोडीशी खरखरीत बोटं
तेल लावताना अंगावर फरायची तो स्पर्श मला अजूनही आठवतो.. धार्मिक दृष्ट्या दिवाळीचा, पूजेचा अर्थ मोठी
मंडळी सांगण्याचा प्रयत्न कारचे पण आम्हाला मात्र फराळ खाणं, नवीन कपडे घालून
मिरवणे,
किल्ला
बांधून त्यावर नाचणी, मोहरी व इतर धान्य पेरून उगवयाला पाणी शिंपडत राहायचं, मावळे, शिवाजी महाराज यांना विराजमान करायचं आणि
राहिलेल्या वेळात वेगवेगळे खेळ खेळणं हेच माहीत होतं..
कधीच न विसरता येणारी अशी टी दिवाळी असायची..
लेख लिहिल्यावर जाणवलं की, अजून खूप आठवणी लिहायच्या राहिल्यात..
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
राजेश्वरी
१७/१०/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा