भावपूर्ण श्रद्धांजली ...
काही आदरणीय व्यक्ति जाताना चुटपुट लावून जातात.. तसेच हे सुधीर देव सर..
मी त्यांना भेटू शकले नाही पण गेल्या सहा महिन्यात माझ्या कित्येक सकाळची सुरुवात त्यांच्या छानश्या पोस्टनी व्हायची. कधी एखादा video असायचा, कधी गाण्याची लिंक असायची तर कधी एखादा आवडलेला लेख.. गेल्या काही दिवसात सरांचा मेसेज आला नाही पण अशी शंका देखील आली नाही. २८ ऑगस्टला मेसेज आला 'मी आता हैदराबादला असेन. तरीही सर मला कित्येक छान मेसेज पाठवत असायचे. अगदी शेवटची एक लिंक पाठवली, अमोल पालेकरांनी किशोरीताईंवर केलेली दोन तासांची अप्रतिम फिल्म..
आणि काल अचानक स्वाती ताईंकडून बातमी कळली, ‘सरांचं निधन झालं.'
ध्यानीमनी नसताना हा धक्का होता मला.
मला एकदम सरांचा पहिला मेसेज आठवला..
‘नमस्कार, मी सुधीर देव..
माग्रस चा सुत्रधार.
काल तुमचं पुस्तक घेऊन आलो.' असं म्हणून हातात माझं पुस्तक घेतलेला फोटो..
तोपर्यंत ‘माग्रस’ काय आहे मला याची माहितीही नव्हती. मग मी ‘माग्रस' बद्दल आंतरजालावर माहिती घेतली..
२४ ऑगस्ट १९६८ साली ‘माझा ग्रंथ संग्रह' ही वाचक चळवळ त्यांनी सुरू केली. ‘वाचन कमी होत आहे, ही ओरड योग्य नाही. साहित्य दर्जेदार असेल तर ते निश्चितपणे वाचले जाते. ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.' असं त्यांचं मत होतं. ‘माग्रस' च्या माध्यमातून त्यांनी ते कार्य केलं.. माग्रसच्या माध्यमातून सदस्यांची मासिक भेट, वार्षिक मेळावा घेतला जाई. तब्बल पन्नास वर्षं त्यांची ही चळवळ सुरू होती.. बरेच मान्यवर लेखकही त्यांचे सभासद होते. स्वतः सुधीर देव सर एक कवी आणि चोखंदळ वाचक होते. माग्रस च्या माध्यमातून काही कवींचे कविता संग्रह देखील त्यांनी प्रकाशित केले होते.
तंत्रज्ञान विकसित नसताना देखील नागपुरमधील सर्व लेखकांना, वाचनप्रेमींना एकत्र बांधण्याचे कार्य श्री सुधीर देव यांनी केले. ‘माग्रस’ चे यश केवळ त्यांच्यामुळेच आहे.
अशा या वाचक, लेखकप्रेमींच्या महामेरूला भावपूर्ण श्रद्धांजली!
राजेश्वरी
२४/१०/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा