सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

नोकरीसाठी_केलेली_मुशाफिरी IUCAA..

 नोकरीसाठी_केलेली_मुशाफिरी

पदवी मिळाली आणि नोकरीसाठी मुशाफिरी सुरू केली. अर्थात पुढील शिक्षणासाठी प्रयत्न सुरू होते, पण मी बाहेर राहून शिकू शकेन, अशी घरची परिस्थिती नव्हती. मग पर्याय एकच, बाहेर राहून नोकरी करायची.
पेपरमध्ये रोज शोधाशोध सुरू झाली.
पूर्वी जे पान सोडून इतर पेपर वाचला जायचा, तेच पान आधी बघायला सुरुवात झाली.
पुण्यात काही ठिकाणी अर्ज केले.
एक ठिकाण मात्र असं सापडलं, की तिथे नोकरी करत करत शिकता पण येईल.
संस्था नवीन उभी राहत होती. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स पदवीधर घेणार होते. लगेच अर्ज केला. थोड्याच दिवसांत परीक्षेला बोलावणं आलं.
परीक्षेचं ठिकाण होतं पुणे विद्यापीठात. मला तर तिथली काहीच माहिती नव्हती पण माझी एक बहीण तिथे शिकत होती. तिच्या बरोबर गेले. भरपूर शोधाशोध केल्यावर परीक्षा स्थळ सापडलं.
भलामोठा परिसर, आजूबाजूला सगळं बांधकामाचं साहित्य पसरलं होतं. सरळ रस्ता नव्हता. पाणी प्यायला देखील लांब दुसर्या इमारतीत जावं लागलं.
शंभर दीडशे मुलं मुली दिसत होती. कित्येकजण एकमेकांना ओळखत असल्यानं जागोजागी टोळकी गप्पा मारत उभी होती. मी आणि बहीण एका बाजूला शांत उभ्या होतो. थोडयाच वेळात परीक्षेसाठी दोन तीन वर्गांत विभागून बसायची सूचना दिली.
एक तासाचा पेपर, खूप सोप्पा वाटला. जेवणाची सुट्टी झाल्यावर निकाल लावणार होते. घरूनच काकूनी आम्हाला डबा दिला होता, तो एका कट्ट्यावर बसून खाल्ला आणि गप्पा मारत बसलो. तासाभरात निकालाचा कागद वर्गाबाहेर नोटीसबोर्डवर चिकटवला.
पहिल्या तीस जणांना तोंडी परीक्षेसाठी थांबवणार होते. अर्थात माझं नाव दिसलं आणि मनातल्यामनात स्वप्नरंजन सुरू झालं.
अर्ध्या तासात तोंडी परीक्षा सुरू झाली. त्यात सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे प्रश्न विचारले. त्यातून पाच जणांना निवडलं. माझं त्यातही नाव आलं. त्यावेळी तर मला खात्रीच पटली, आपल्याला इथे काम मिळणारच.
त्या पाचमधून तीनजण निवडणार होते. त्यावेळी मात्र सगळ्यांना घरची परिस्थिती आणि इतर प्रश्न विचारले. तिथे मात्र मुलगी आणि पुण्यात स्थायिक नाही, घर नाही, या कारणास्तव नाव काढून टाकलं.
पस्तीस वर्षांपूर्वीचा तो काळ. काका, आत्याचं घर होतं, राहू शकत होते, पण मी कराडची आहे, इतकं ऐकून नोकरी नाकारली गेली.
आता काळ बदलला, मुलींना एकटीला राहायला अडचण येत नाही.
पण त्यावेळी ती नोकरी मिळाली असती तर मी कुठे असते....
ते ठिकाण म्हणजे मा. जयंत नारळीकर सरांचं IUCAA..
१९८७ साली मी पदवीधर झाले आणि १९८८ साली IUCAAची स्थापना झाली.
काही सल मनात राहतात हेच खरं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...