उरल्या_त्या_आठवणी
खूप दिवसांपासून माईंचा फोन आला नव्हता, की मी केला नव्हता. मागच्या वर्षी योगदिनाचे फोटो पाठवले होते; यावेळी तेही नाही आले. वाटलं, पावसाळ्यापूर्वीची कामं सुरू असतील. शेतावर जात असतील त्यामुळे गडबडीत असतील.
शेतावरच्या आंब्याला मोहोर आल्यापासून त्याचे फोटो कौतुकानं त्या पाठवायच्या. त्यांच्या आमराईतले ते मोहोर आलेले फोटो, छोट्या छोट्या कैर्यांचे फोटो पाहून मन हरकून जात होतं. खूपदा मनात यायचं, जवळ असते तर कितीदा तरी डबे घेऊन पिकनिक केली असती.
दादा आणि माई शेतात केळी, पपई, आंबे आणि बरंच काही लागवड करून थांबत नाहीत तर, त्यावर मायेने प्रेमाची पखरण करतात. वेळोवेळी खत, सेंद्रिय खत, पाणी मिळतं की नाही ते बघतात. इतकंच नाही तर, बारा क्षारांचा अभ्यास करून त्यातले क्षार पाण्यात घालून ते पाणी रोपारोपाला घालतात.
मागच्याच महिन्यात मुलीला बेंगलोरला कैर्या पाठवते, तशा मलाही पाठवणार म्हणत होत्या. बाजारात जाऊन कैरी आणून खाण्यापेक्षा घरच्या कैरीची चव न्यारीच असते ना? 'कैर्या काढून घरी आणल्या की सांगा,' असं मी त्यांना फोनवर बोलले आणि नंतर फोनच झाला नाही. कैर्यांनी लगडलेल्या बागेचे फोटो मात्र पाहायला मिळाले.
वादळी पावसात पण टिकून राहिलेले हिरवेगार फळ पाहूनच मन प्रसन्न होत होतं.
साठ झाडांपैकी चाळीस झाडांना भरपूर कैर्या होत्या.
दोन दिवसांपूर्वी फोन झाला तेव्हा विचारलं, 'पिकले का आंबे?' मनात येत होतं, सांगावं, वाट बघतोय आम्ही. पण बोलले नाही.
"कुठले आंबे आणि काय? एक दिवस पहाटे साडेपाच, सहाला शेत करणार्याचा फोन आला, 'रात्रीत सगळे आंबे गायब झाले. छोट्या छोट्या कैर्या पण ओरबाडून नेल्या चोरट्यांनी.' "
त्यांचे शब्द ऐकूनच मी सुन्न झाले. ऐकून मला इतका त्रास झाला, तर त्यांना काय वाटलं असेल? पंधरा दिवस तर दादा शेताकडे पण फिरकले नाहीत.
वर्षभर निगा राखायची, खतपाणी करायचं, मशागत करायची; निष्पन्न काय तर चोरट्यांनी येऊन एका रात्रीत सफाचट करायचं?
कसली ही मानसिकता?
शेतकर्याने घेतलेल्या श्रमाचा विचार एकदाही मनाला शिवाला नसेल का चोरट्यांच्या?
चोरीच्या फळाचे असे कितीसे पैसे मिळाले असतील?
हे काम एकट्याचं नक्कीच नव्हतं. घरी खायला, लोणचं घालायला वापरले तरी लोणच्याची प्रत्येक फोड खाताना चोरी आठवत नसेल का त्यांना?
निसर्गाच्या कोपामुळे दरवर्षी शेतकरी भरडला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त या चोरट्यांमुळे खचून जातो.
यावर्षी निसर्गाने दिली साथ तर चोरट्यांनी मारला हात....
ही मानसिकता कशी कमी होईल???

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा