भेट_तुझी_माझी - कुंभारमाशी
गंमत आहे, नाही?
रोज सकाळी मी उठून दार उघडलं, दुधाची पिशवी बाहेर खिळ्याला टांगायला लागले, की दाराबाहेर मांजरीची दोन पिल्लं माझी वाटच बघत बसलेली दिसतात. त्यांना खाऊ घालून कामाला लागते.
तोंड धुवायला बाथरूमचं दार उघडलं, की खिडकीची जाळी आणि बाहेरची अर्धवट उघडलेली काचेची खिडकी दोन्हीच्यामध्ये असलेल्या जागेत मुनिया चिवचिवताना दिसतात. माझी चाहूल लागली की उडतात आणि परत येताना बांबूच्या हिरव्या पालवीच्या पट्ट्या तोंडातून घेऊन येतात. आधीच्या प्रत्येक वर्षांचं केलेलं भेंडोळ असतंच, त्यावरच ते पुढचा मजला बांधतात. आत्तापर्यंत अर्धी खिडकी त्यांनी व्यापून टाकलीय. त्यांचं जोडीनं काम करणं बघायला छान वाटतं. इतकूशी पिल्लं बघायला तर खूपच गोड दिसतात.
स्वयंपाकघरात शिरले, की खिडकीबाहेरच्या केबल वायरला लटकणाऱ्या घरट्यातून सनबर्ड मान वळवून बघतो. त्याची अपेक्षा काहीच नसते, फक्त त्याला तिथं सुरक्षित असण्याचं आश्वासन माझ्या नजरेतून पाहिजे असतं.
गच्चीचं दार उघडलं, की साळुंखी कर्कश्य आवाजात, 'मी आलीय' असं सांगून जाते. तिला दाणे टाकून योगा करायला खोलीत गेले, की खिडकीवर काड्या काड्या जमवून केलेल्या ओबडधोबड घरट्यात होलाचं घुटरघू ऐकायला येतं. कितीदा त्या काड्या त्याच्या वजनाने खाली पडतात आणि कितीदा ते परत काड्या आणून घरटं बनवतं. दर महिन्याला त्यात एकदोन अंडी दिसतातच. लहानपणी ती पिल्लं फार देखणी वाटत नाहीत. काळी पिल्लं आणि त्यांच्या उघडलेल्या चोची, सतत भुकेली दिसतात.
पण झटपट वाढणारी ती पिल्लं बघायला पण मजा येते.
थोड्यावेळानं मोकळ्या हवेत चहा प्यायला बसावं म्हणून बाल्कनीचं दार उघडलं, की एक टपोरी कुंभारमाशी दाराबाहेर वाटच बघत असायची. चार दिवस तिची गंमत बघत होते, स्वतःला थोडी संभाळूनच. घरभर घिरट्या घालत होती. मी मात्र ती बाहेर गेली, की परत दार लावून घेत असे. दोनचार दिवसांनी तिचं प्रत्येक खोलीत डोकावणं थांबलं आणि दार उघडं दिसलं, की ती तडक स्वयंपाकघरात जाऊ लागली. बापरे! आता छोट्याशा स्वयंपाकघरात ती आणि मी एकत्र थांबू शकत नव्हतो. ती बाहेर आल्याशिवाय मला आत जाता येत नव्हतं. कारण मडकं बनत असेल तर सतत गुईईन्ग गुईईन्ग करून कुंभारमाशी आपल्याला घरट्याच्या जवळ जाऊ देत नाही, असं वाचलं होतं. ही आत करते काय आहे? ह्याची माहिती करून घेतली, तर बघून अगदी थक्कं व्हायला झालं. काल धाडस करून मी तिच्या मागं मागं आत गेलेच, तर ती सगळ्या सुर्या ठेवलेल्या स्टँडच्या मागे जाताना दिसली. ती तिथून बाहेर पडल्यावर बघितलं, तर दोन दिवसातंच स्टँडचा आधार घेऊन खालच्या बाजूला छोटंसं मातीचं मडकं बनवणं सुरू होतं. प्रत्येक फेरीला ती चिकण माती आणायची, ती त्या ठिकाणी लिंपायची आणि पुन्हा बाहेर जायची. आता आज उद्या ती ते घर पूर्ण करणार, त्यात अंडी घालणार आणि शिवाय त्यात काही हिरव्या अळ्या पण आणून ठेवणार. जीवंत अळयांना म्हणे ती दंश करते आणि त्या भूल दिल्याप्रमाणे अर्धमेल्या होतात. जर तिला जिवंतच घरात बंद केलं तर ती पळून जाईल, नी मारून ठेवलं तर सडून जाईल; मग पोरंबाळं उपाशी मरतील हे माशीला नीट माहीत आहे म्हणुनच ह्या अळ्यांना पकडल्यावर ती त्यांना स्वत:च्या विषाची नांगी मारते. म्हणजेच “नैसर्गिक भूल” टोचून त्यांना बेशुद्ध करून ठेवते. अशा अळ्या घरात ठेवून ती घर बंद करून टाकते. अंड्यांमधून पिल्लं म्हणजेच अळ्या जन्मल्या, की त्यांची खाण्याची ही तजवीज. अंडी-अळी-कोश-माशी असाच तिचा जीवनक्रम असतो. जोपर्यंत उडणारी कुंभारमाशी तयार होत नाही, तोपर्यंत सगळे मडक्यात बंदिस्त असतात. शेवटी माशी मडकं फोडून बाहेर येते आणि तिथून उडून जाते. इतके दिवस त्या स्टँडला जपणे मला शक्य नव्हते. कित्येकदा सूरी ठेवताना तो स्टँड खाली पडतो. मग ते घर मोडून आतली पिल्लं, अंडी, अर्धमेल्या अळ्या बाहेर आल्या असत्या. खरंतर मला ती सगळी कार्यपद्धती बघायची इच्छा होती पण माझ्या मागे आरोहीपण येत असते, चुकून तिला दंश नको करायला असं वाटून मी तो स्टॅण्ड बाहेर खिडकीत ठेवला.
पावसाची उघडीप वाटली म्हणून संध्याकाळी कॉफीचा कप घेऊन गच्चीत बसले, तर समोरच्या लिंबाच्या झाडावर भारद्वाज जोडी. बाजूला बुलबुल गोड आवाजात शिळ घालत होता. कदाचित त्याच्या घरट्यात असलेल्या अंड्यांवर भारद्वाजची नजर गेली असावी. मागून कोकीळ लिंबोण्या गट्टम करायला आलाच. त्याची लिंबोणी तोडायची, तोंडात धरून मान वर करून गिळायची गंमत बघत बसायला नेहमीच मजा येते.
ते बघत असतानाच समोरच्या कुंड्यांजवळ काहीतरी वळवळताना दिसलं. थोड्यावेळापूर्वी तर तिथे मी उभी होते, आता हे कुठून आलं कळेना. नक्कीच फांदीवर बसलेल्या भारद्वाजच्या तोंडातून पडलेला दिसतोय. चांगलं वितभर लांबीचं पिल्लू इंचभर मान वर करून बघत, वळवळत होतं. पण गच्चीच्या गुळगुळीत फरशीवर त्याला फार पुढे जाता येत नव्हतं. कुंचा आणि सुपडीत पकडून त्याला खाली बागेत फेकून दिलं. म्हटलं, 'शोध बाबा तुझं बिळ नाहीतर पुन्हा कोणाच्यातरी तोंडात जाशील.'
मग एकटीच सहजच शांतपणे विचार करत बसले होते.
खूप दिवसात कोणाला भेटले नाही, कोणाशी बोलले नाही.
पण कंटाळा मनात फेर धरत असतानाच या सगळ्या सजीवांनी, त्यांच्या भेटीच्या विचारांनी तो कंटाळा पार पळवून लावला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा