काही काही फोटो किती बोलके असतात ना?
त्या दिवशी गंमतच झाली. अर्थात मला ती नंतर, फोटो पाहिल्यावर सांगितली गेली.
पौड रोडवर मोरे विद्यालयाच्या प्रांगणात नव्यानेच उद्घाटन झालेल्या 'स्नेहधाम विरंगुळा केंद्रा'त मी बोलत होते. विषय अगदी प्रेमाचा म्हणजे निकोबार....
स्क्रीनवर दिसणार्या एकेक निकोबारच्या फोटोंबरोबर आमच्या आठवणीत मी गुंतून गेले होते, तल्लीन होऊन बोलत होते. शेजारी बसलेली आरोही मधेमधे माझा हात ओढून तिची पाण्याची बाटली मागायची, एक घोट पिऊन लगेच परत ठेवायला द्यायची. कधी पराठ्याचा तर कधी चुरमुरे भडंग असलेला डबा मागायची. सतत तिचं असं एकापाठोपाठ एक सुरू होतं. थोड्यावेळाने मी तिला मोबाइल सुरू करून दिला. वाटलं, फोटो काढत, बघत बसेल. मग तिची गाडी यू ट्यूबकडे वळली. आता 'आवाज वाढवून दे,' म्हणून मागं लागली. माझ्या आवाजात अडथळा येऊ नये, इतका आवाज वाढवून दिला. हे सगळं सुरू असताना समोर बसलेल्या प्रेक्षकांसाठी बेटावंरचे फोटो, माहिती बरोबरीनं बोलणं सुरू होतं. आधीच 'जेष्ठ नागरिक एक तासापेक्षा जास्तवेळ बसणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला एक तास वेळ देऊ' असं सांगण्यात आलं होतं. मला तर बोलायला लागले, की दोन तास पण कमी पडतात, असं वाटतं. लवकर आटोपतं घ्यायचं, हे मनावर बिंबवलं असल्याने, मी माझ्याच नादात होते.
अखेर ७०, ७५ मिनिटांनी मी आवरतं घेतलं.
घरी आल्यावर किशोरनी काढलेले फोटो बघताना, माझ्या शेजारी बसलेली आरोही फोनवर कोणाशी तरी बोलतेय, असं दिसत होतं. मला कळेना, कोणाचा फोन आला, आणि तिने उचलला की काय? म्हणून मी कॉल यादी बघू लागले.
किशोर आठवून आठवून हसत होता...
मजा अशी की...
आम्ही बसलो होतो त्याच्या शेजारीच शाळेचं कार्यालय होतं. खूप वेळ तिथल्या लँड लाइन फोनची रिंग वाजत होती. अखेर आरोहीनं हातातला फोन कानाला लावला आणि, "आईचा प्रोग्राम सुरू आहे. आरोही तिथे शांत बसायचं. ओरडायचं नाही. मग मावशीकडे जायचं." असे बाबांचे बोल (ती शांत बसावी म्हणून सांगून ठेवलेले) बोलत होती आणि समोरून किशोर मनातल्या मनात हसत फोटो काढत होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा