गावातल्या लोकांनी तुडुंब भरलेला मंडप...
हातात अक्षता...
दारात वाजंत्री बँड वाजवण्याच्या तयारीत...
आंतरपाट धरलेले भटजी...
एकाचवेळी दोन भावांचा विवाह होणार होता.
मोठा भाऊ शहाजी, पदवीधर, सरकारी नोकरीत आणि लहान भाऊ मालोजी शेती, व्यवसाय सांभाळणारा...
"मुलांचे मामा, मुलांना घेऊन या!"
मंडपाच्या एका बाजूच्या वरपक्षाच्या खोलीतून मामा दोन हाताला दोघा भावांना धरून आणत होते. कोट, टोपी, मंडोळ्या बांधून नवरदेव मंडपात हजर झाले.
शहाजी उजव्या बाजूच्या पाटावर जाऊन उभा राहिला.
धोतर, झब्बा, टोपी घातलेला मालोजी डाव्या बाजूच्या पाटावर उभा राहिला.
दोघंही ताडमाड उंच. भटजींना आंतरपाट त्यांच्या उंचीच्यामानाने वर धरावा लागत होता.
मे महिन्याचे दिवस...
सगळ्यांना घामाच्या धारा लागलेल्या... मोगर्याच्या सुगंधी गजर्यांचा वास थोडा कमी होऊन मंडपात घामाचा दर्प पसरू लागलेला....
घड्याळाचा काटा दुपारचे बारा वाजून गेले हे दाखवत होता...
"मुलींचे मामा, मुलींना लवकर घेऊन या." भटजींचे हात आता आंतरपाट उंचावर पकडून अवघडून गेले होते…
अखेर हिरवी, लाल जरीच्या साड्या नेसून जिजा आणि रमा दोन मामांच्या कडेवर बसून मंडपात अवतरल्या...
डोक्यावर घुंघटवजा पदर व पदराखालून लोंबणारे मंडोळ्यांचे फक्त गोंडे गालाजवळ डुलताना दिसत होते.
वीस, एकवीस वर्षांच्या त्या नवर्यांना उचलून मामांना धाप लागली होती...
जिजा रमा, दोघी जुळ्या बहिणी...
रमा कॉलेजच्या दुसर्या वर्गात शिकत होती, ती शहाजीसाठी पसंत केली होती आणि जिजा आठवी पास पण घरच्या कामात तरबेज, म्हणून मालोजीसाठी...
नवरदेवांनी आपल्या सहचारिणी न बघताच आपल्या वडलांच्या इच्छेला मान देऊन लग्नाला होकार दिला होता.
"स्वस्ति श्री गणनायकम् गजमुखम्, मोरेश्वरम्.....
............
कुर्यात सदा मंगलम्, शुभ मंगल सावधान !!"
अक्षतांचा पाऊस सुरू असतानाच, मुलीच्या मावशीने हेल काढत दुसरं मंगलाष्टक गायला सुरुवात केली.
नवरा नवरी भरगच्च फुलांचे हार हातात घेऊन उभे…
मुलींच्या डोईवरच्या पदरामधून घामाचे थेंब टपकायला सुरुवात झालेली...
अखेर मुलाकडच्या, मुलीकडच्या मंगलाष्टका संपल्या आणि गुरुजींनी अंतरपाट बाजूला करून, हुश्श केलं.
"करवलीने नवरा नवरीला ओवाळून कलशातील पाणी त्यांच्या डोळ्यांना लावा, मग नवरा नवरी एकमेकांना हार घालतील."
करवलीला डोळे दाखवायला रमा आणि जिजा घुंघट वर करू लागल्या मात्र....
आणि समोर उभ्या असलेल्या गर्दीत एकच कल्लोळ झाला…
शहाजीच्या समोर रमा ऐवजी जिजा उभी होती
आणि मालोजीच्या समोर रमा...
नवरा नवरीला काय गोंधळ झाला ते कळत नव्हतं...
मुलींची आई लग्न बघायचं नाही, म्हणून आत बसलेली...
"वधूने वराला हार घा..." म्हणेपर्यंत...
"अहो, थांबा थांबा.... हा रमाचा नवरा आहे, जिजाचा तो तिकडच्या पाटावरचा..."
सगळेजण मामावर तुटून पडले...
मामा तलवारीला लिंबू लावून मागे उभे...
अखेर भटजींनी कशीबशी मध्यस्ती करून मुलींना जागा बदलायला लावली आणि आपआपल्या नवर्यांच्या गळ्यात माळा पडल्या...
(काल 'लापता लेडीज' चित्रपट पाहून आल्यावर हा माझ्या लहानपणी घडलेला किस्सा आठवला.)
राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा