सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

अवचित पाहुणा

 पाहुणा

पूर्वी सकाळी सात वाजता किशोर डबा घेऊन कामाला जायचा.
त्याचा डबा करून दिला, की दिवसभर मी आणि आरोही दोघीच असायचो. मी आरामात वर्तमानपत्र वाचून मग घरातली कामं करायला लागायचे. सकाळी सातला किशोर गेला, की एकदम रात्री साडे आठ, नऊलाच घरी यायचा.
नेहमीप्रमाणे एक दिवस दुपारी, माझं आणि आरोहीचं जेवण वगैरे आवरून, मी आडवी पडले; तितक्यात बेल वाजली. आत्ता यावेळी कोण आलं असेल, असा विचार करून दार उघडलं; समोर एक 22-25 वर्षांचा मुलगा उभा होता. खेडूत वाटत होता; मळके कपडे, अंगाने बारीक, दोन-चार दिवसांत जेवला नसेल, असा भाव...
"कोण पाहिजे?" मी विचारलं, तर त्यानं हातातला कागद माझ्या समोर धरला. कागदावर नाव, किशोर पाटील आणि आमच्याच घरचा पत्ता लिहिलेला होता. कागदावरचं अक्षर ओळखीचं वाटलं, म्हणून मी कागद हातात घेऊन बघितला, तर ते अक्षर नणंदेचं होतं.
"ताईंनं धाडी." पहिल्यांदा त्याचा आवाज ऐकला, तो पण गुजरावू भाषेत.
"अं?" माझ्या डोक्यात प्रकाश पडायला जरा वेळ लागला.
म्हणजे तिनी आमच्याकडे पाठवलं होतं याला.
कशासाठी, काय, ते काहीच तो सांगायला तयार नव्हता. हातात सामान काहीच नाही.
बरं, तो माझ्याशी नीट बोलतही नव्हता. काहीही विचारलं, तर गप्पच बसायचा. माझं लग्न झाल्यापासून मला कळून चुकलं होतं, की सासरची पुरुष मंडळी माझ्याशी फार तुटक, कमी बोलतात.
“किशोर घरी नाहीये, रात्री येईल.” असं सांगितलं, तर सरळ माझ्या बाजूने आत येऊन कॉटवर मांडा ठोकून बसला. आता हा जर आपल्याशी बोलत नाही, तर दिवसभर काय विचारायचं आणि तो काय सांगणार?
मला काहीच कळत नव्हतं.
खूप प्रकारे बोलायचा मी प्रयत्न केला.
आधी पाणी प्यायला दिलं, तर एका घोटात ग्लास रिकामा केला आणि
"आणखी थोडु पानी देवो." म्हणाला.
भुकेला होता, हे सरळ सरळ दिसत होतं.
"तुमचं नाव काय? तुम्ही काय करता?" सगळे प्रकार विचारून झाले, तर
"ताईंनं धाडी, ताईंनं धाडेल सं; किशोरभाऊनं भेटनू सं, भाऊनं भेटनू सं." असं काहीसं म्हणत होता.
त्यावेळी घरात फोनचीपण सोय नव्हती. किशोर सकाळी सातच्या बसनं गेला, की रात्री आठ, नऊला घरी येणार. तोपर्यंत याला घरात ठेवणं मला अवघड वाटत होतं, पण इलाज नव्हता.
"जेवलात का?" विचारलं, तर नाही म्हणून मान हलवली.
त्याला जेवायला काय द्यायचं? कारण किशोर रात्रीच येणार म्हणून आमच्या दोघींपुरता केलेला स्वयंपाक बऱ्यापैकी संपला होता. फक्त एक दोन पोळ्या शिल्लक होत्या. परत पोळ्या केल्या आणि सासरची मंडळी माझ्यापेक्षा जास्तच तिखट खायची, त्याच्यामुळे जरा तिखट कोबीची भाजी केली.
त्याला सांगितलं, “हात पाय धुऊन घ्या”.
“काही गरज नईसं, चांगला सतसं.”
हा बाबा रात्रीचा प्रवास करून आलाय आणि हात पाय स्वच्छ कसे? बोलून काहीच फरक पडला नाही.
बाहेरच्या खोलीत एक कॉट ठेवलेली होती, त्या कॉटवर तो बसला होता. नुसते हात पॅन्टला पुसले आणि जेवायला सुरूवात केली. दोन, तीन, चार... पोळ्या खातच राहिला आणि मी वाढतच राहिले.
भाजी तिखट लालबूंद केली, तरी त्याला ती आळणीच वाटत होती.
"मिरची सं का?"
विचारलं म्हणून दाण्याची चटणी दिली, तर ती पण अगदी कोशिंबिरीसारखी भरपूर घेऊन खाल्ली; अगदी डब्यातली संपेपर्यंत.
अखेर म्हटलं, “पोळ्या संपल्या, आता रात्री करेन.”
प्यायच्या पाण्यानं त्यानं पटकन माझ्यासमोर ताटात हात धुतला आणि तोंडावरनं, ओठांवरून हात फिरवला.
“थोडावेळ आराम करा, संध्याकाळी किशोर येईल.” लगेच पसरला तिथंच.
आरोही लहान आणि नवीन परका माणूस घरात, मी कुठली झोपते? काहीतरी करायचं म्हणून वाचलेले वर्तमानपत्र घेऊन आतल्या खोलीत जाऊन वाचत बसले. थोड्यावेळानं हा बाबा उठला आणि बाल्कनीत जायला लागला. मला शंका आली,
“काय करताय?”
करंगळी वर करून दाखवली…
“अहो, इथे नाही..., खाली राहणारे मारतील की वर येऊन."
त्याला “बाथरूम आहे, संडास आहे, तिथे जा.” म्हणत होते, तर
"असू देवो. चालसं नं."
मला शेवटी आवाज चढवावा लागला.
“इथे करायची नाही, तिकडे आत जावा संडासात.”
त्याला दार उघडून दिलं. या बाबाला संडास आणि बाथरूम मधला फरक पण कळत नव्हता. तो एका खेड्यातून आला होता.
“काय शिकला?”
"दहावीमां शाळा सोडी दिधी.”
वेळ गेला, तसा बोलायला लागला.
“मारू लगीन व्हयेल सं, पोरगो सं, दोन वरीसनो.”
‘किशोर भाऊ तुला नोकरी देईल,’ सांगून त्याला आमच्याकडे पाठवलं होतं.
“आता पुनामान कोनतूबी काम देवो, दुसरी कोणती बी चालीन मनं. वॉचमननी नोकरी तरी देवो."
“अरे बाबा, वॉचमनच्या नोकरीला पण इथे हिंदी, इंग्लिश लिहा-वाचायला आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. पुण्यात वॉचमनची नोकरी अशी नाही मिळणार.”
“दुसरी कोणती बी चालीन मग.”
“तुझं लग्न झालंय, तुला मुलगा आहे, तर तूम्ही तिघांच्या राहण्यासाठी खर्च येईल.”
“कुठे राहशील?”
“हाई घर सं नं भाऊनु, यानच रहीसं.”
आली का पंचाईत. आता हा बाबा जर असाच नुसता कॉटवर बसून राहणार असेल, तर कसं चालेल? घर तीन खोल्यांचं. दिवसभरात कोणी ना कोणी येणार, नातेवाईक येणार आणि त्यांच्यासमोर हा असा अस्वच्छ राहणार…
मनात आलं, ‘आता हा बाबा जर आपल्या घरात राहिला, आरोही आहे, घरात मी अनोळखी माणसाबरोबर राहायचं? किशोर १४ तास घराबाहेर.’
मला काही समजेना. रात्री लवकर किशोर यावा, अशी प्रार्थना करत होते. घरात फोन नाही म्हणून खाली जाऊन बूथवरून ऑफिसमधे फोन करून किशोरला सांगावं, तरी पंचाईत. आरोहीला एकटीला याच्या ताब्यात देऊन कसं जायचं?
बरं नणंदेनी पाठवलं, तिने तरी आधी कळवायचं ना, 'मी याला पत्ता दिला आहे, तो तुमच्याकडे येईल.' तो पण प्रकार काही नाही. किशोर रात्री साडेआठ वाजता आला. आल्यावर त्याला म्हटलं,
“बघ कोण आले आहेत?”
तो मलाच विचारायला लागला, “हा कोण आहे?”
आजपर्यंत त्या माणसाला तो कधी भेटला नव्हता. त्याला किशोरनी दहा प्रश्न विचारले,
“तू कुठून आला?,.... ”
जळगाव जिल्ह्यातल्या एका छोट्या खेड्याचं नाव सांगितलं; म्हणजे किशोरच्या मामाच्या गावाकडचा कोणीतरी होता.
“बरं, तिथून तुला आमचं घर कसं, कुणी सांगितलं?”
“ताईंनं सांगेल होतू.”
“पण कशासाठी आलास?”
तर म्हणे,
“मनं यान नोकरी देसुत म्हणून आये. मन वावरनू काम नई आवडतू.”
“शिकलाय किती?”
“दहावीपर्यंत शायामा गयथो.”
दहावीपर्यंत शाळेत गेलो, म्हणजे दहावीपर्यंत नापास करत नाहीत म्हणून दहावीपर्यंत पोहोचला.
“पण तुला लिहिता वाचता येतं का?”
“जास्त नही.”
“तुला हिंदी इंग्लिश येतं का?”
“नही.”
“मग कशी नोकरी लावणार इथं?”
“इथे शिकलेल्या माणसाला नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाला कसं काय नोकरीला कोणी ठेवून घेईल बरं ?”
“इथे दोन चार हजार रुपये पगार मिळाला, तर तुझं तुझ्या बायकोचं मुलाचं भागेल कसं?”
“हय ना आपलू घर, रईस यानचं.”
मग किशोरनं सांगितलं, “आमची कधी पण पाच सहा महिन्यात बदली होऊ शकते. इथे तू राहू शकत नाहीस. मग ते घर बदली झाल्यावर आम्ही भाड्याने देऊ.”
“तुला इतर काही काम येतं का? म्हणजे सुतारकाम, शिलाईकाम, बांधकामाचं किंवा इलेक्ट्रिकल्सचं?”
"नही"
काहीच येत नाही, काही माहिती नाही, घरात गावाकडे वीज पण नाही. बांधकाम म्हणजे तिथल्याच माती, चिपाडाची आणि दगडाने बांधलेली घरं.
याचं करायचं काय? प्रश्न पडला.
हा बाबा नंतर दोन दिवस राहिला. मी किशोरला म्हटलं,
“ना हा माझ्याशी धड बोलत, ना काही मनातलं सांगत. हा ना आंघोळीला ना बाथरूमला त्या बाथरूममध्ये जाऊ शकत, ना बेसीनवर हात धुत. या माणसाला घरात कसं काय ठेवून घ्यायचं? मला त्याच्याबरोबर असं राहणं अवघड वाटतं, तू काहीतरी निर्णय घे बाबा."
शेवटी किशोरनी त्याला दुसऱ्या दिवशी रात्रीच्या गाडीचं तिकीट काढून दिलं आणि स्टेशनवर सोडून आला.
त्याला सांगितलं, “काही कळलं, तर तुझ्या घरी पत्र पाठवतो, मग तू नोकरीला ये.”
त्यानंतर मात्र त्या माणसाला आम्ही कधीही भेटलो नाही.
आमचे ते दिवसही असे नव्हते, की त्याला नागरी सुविधांची ओळख करून द्यावी, पुणे दाखवावं. आरोहीच्या सततच्या आजारपणात इतर कोणती जबाबदारी अंगावर घ्यायची ती वेळ नव्हती.
असे दोन तीनवेळा अवचित पाहुणे आमच्याकडे पाठवले गेले पण हा दोन दिवसाचा पाहुणा कायमचा लक्षात राहून गेला.
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...