सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

मुद्रितशोधन_गरज

 मुद्रितशोधन_गरज

नुकतीच मी एका कार्यक्रमाला गेले होते.
"स्वागतम्... सुस्वागतम्..." निवेदिका सर्वांनाच उद्देशून, हसून स्वागत करत होती.
मला आरती ताईंचे शब्द आठवले.
'स्वागतम् म्हणजे आलेल्यांचं स्वागत करणं. पाहुण्यांना स्वागत, आदरातिथ्य आवडलं तर परत जाताना ते आपल्याला पावती देताना म्हणतील, सुस्वागतम्!' पण आपण असं म्हणताना ऐकत नाही.
आपल्या बोलण्यात असे कित्येक शब्द चुकीच्या अर्थाने रूढ झालेले दिसतात. त्या शब्दाचा मूळ अर्थ उलटच असतो; पण तरीही आपण तो शब्द बोलत, लिहीत जातो.
गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांचा सुळसुळाट वाढला. पूर्वी वर्तमानपत्र, साप्ताहिकं आणि मासिकं इतकीच माध्यमं उपलब्ध होती. या माध्यमांवर आपलं लिखाण प्रसारित होण्यासाठी संपादकांनी लेखनाची निवड करावी लागते. आता त्यांच्या जोडीला आंतरजालावर अनेक माध्यमं उपलब्ध झाली आणि विशेष म्हणजे त्यावर विचार व्यक्त करायला फारसं कोणाचं नियंत्रण असत नाही. मनातलं शब्दांत उतरवायचं आणि ते समाजमाध्यमांवर डकवायचं, हे तंत्र खूप सोपं झालं आणि त्यामुळे प्रत्येकाला लेखन करण्याची खुमखुमी येऊ लागली; तशी ती मलाही आली.
बदलीच्या निमित्ताने दर तीन-चार वर्षांत आमच्या जागा, राज्यं, भाषा बदलत गेल्या. त्या अनुषंगानं पदरात पडलेले भरपूर अनुभव गाठीशी होते.
मला वाटलं, मीही लिहू शकते; मग काय केली सुरुवात.
पहिलं पुस्तक, ‘निकोबारची नवलाई’चं लिखाण पूर्ण झाल्यावर पहिली संहिता मुद्रितशोधन करून हातात आली, ती काळ्या छपाईवर भरपूर लाल रेघोट्या मारून. तेव्हा पहिल्यांदा मुद्रितशोधनाशी माझी ओळख झाली.
दुसऱ्यावेळी ‘आरोही‘ लिहून पूर्ण झालं, तेव्हाही पहिली संहिता हातात आली, ती लाल खुणा होऊनच. मन थोडं खट्टू झालं. आपल्या लेखनात इतक्या चुका का होतात? असा विचार मनात आला.
अलीकडच्या काळात बरीच पुस्तकं माझ्या वाचनात आली, तेव्हा त्यात छपाईच्या, वाक्यरचनेच्या चुका दिसून आल्या.
माझी दोन्ही पुस्तकं योग्यप्रकारे मुद्रितशोधन करून छापलेली आहेत, हे मला जाणवलं. प्रत्येक लेखकानं, संपादकानी छापण्यापूर्वी संहिता पुन्हा पुन्हा नजरेखालून घातली पाहिजे.
आपण लिहिताना बोली भाषा आणि ग्रांथिक किंवा प्रमाण भाषेची सरमिसळ करत लिहिता कामा नये, असं लक्षात आलं.
नेमकं चुकतंय कुठे?
उत्तर मिळण्यासाठी ‘मुद्रितशोधन कार्यशाळा’ करणं गरजेचं वाटलं.
लगेच राजहंसच्या आरती घारे ताईंशी संपर्क साधला. त्याच वेळी आरतीताईंनी कार्यशाळा आयोजित करत असल्याचं सांगितलं.
कार्यशाळेच्या प्रत्येकी तीन तासांच्या चार सत्रांमध्ये शुद्धलेखनाचे नियम, चकवा देणारे शब्द, सुयोग्य वाक्य रचना, मुद्रितशोधन करताना वापरायच्या खुणा इत्यादी बरीच माहिती दिली. शुद्धलेखनाची गरज, महत्त्व आणि प्रचलित नियम यांची उजळणी करून घेतली. काही उतारे अभ्यासायला लावले. 'नेमकं चुकतं कुठं?' याचं उत्तर कार्यशाळा करताना मिळत गेलं.
या सगळया गोष्टी फक्त पुस्तक लिहिण्यासाठी ध्यानात घ्यायच्या नसून, लिहिणाऱ्या प्रत्येकानं भाषेचं सौंदर्य जपण्यासाठी याचा विचार करायला हवा.
माझ्यासारख्या कित्येकांचा शाळेतील दहावीची मराठीची प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर अभ्यासात्मक मराठी वाचन, लेखन यांचा सराव कमी होतो. लेखन आणि वाचन हे फक्त विरंगुळा म्हणून केलं जातं. लेखन करण्यासाठी मुद्रितशोधन माहित असणं खूपच गरजेचं आहे, हे निश्चित.
राजेश्वरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...