'तू सध्या काय करतेस?'
'नवीन काय लिहिलं? खूप दिवसांत तू लिहिलेलं काहीच वाचायला मिळालं नाही.
इतकी कुठल्या कामात आहेस?'
प्रत्येकाच्या अशा प्रश्नांना एकच उत्तर देतेय.
'सध्या शिफ्टिंगच्या गडबडीत आहे. घर बदलायचं आहे. दोन-तीन महिन्यांपासून शोधाशोध सुरू होती. आता एक घर पसंत पडलंय. सामानाची बांधाबांध सुरू आहे.'
इतक्या वर्षांपासून सरकारी घरांमध्ये राहिल्यावर बघितलेलं प्रत्येक घर लहान वाटायचं. प्रत्येक सरकारी घरात भली मोठी कपाटं, मोकळी जागा, ऐसपैस गच्ची अशी सवय झाल्यामुळे, बघेल ते घर खूप छोटं वाटायचं. सरकारी घराबरोबर काही फर्निचर पण मिळतं; टेबल, डायनिंग टेबल, सोफा, कॉट आणि बरंच काही.
नुसत्या चार भिंती असलेलं घर बघितलं, तर तर तिथं हे सगळं विकत घ्यायला लागणार होतं; म्हणून शक्यतो थोडंफार फर्निचर असलेल्या घराच्या शोधात होतो.
काही घरं बघितली आणि जाणवलं, प्रत्येक घराची वेगळी रचना आहे.
काही घरांचे प्लॅन अगदीच विचित्र, म्हणजे एक बेडरूम अगदी मुख्य दारातून आत पाऊल टाकले, की लगेच... काही ठिकाणी बाथरूम छोटी, म्हणजे आपण आत जाऊन दरवाजा बंद केल्याशिवाय बेसिन पण वापरता येणार नाही. काही ठिकाणी हॉल प्रशस्त पण तिथून बेडरूमकडे जाणारा मार्ग अगदीच चिंचोळा, एकेठिकाणी तर बंगल्यावर चार मजले चढवलेले आणि सगळ्या खोल्या काचा लावून बंदिस्त केलेल्या, शोकेस तरी आपण कधीतरी उघडू शकतो पण या काचा पूर्ण बंद. काचांच्या जवळ बाहेर बघत बसायला छोटे छोटे दिवाण. खिडक्या म्हणजे एकदम वरच्या बाजूला हवा येण्यासाठी झरोके. इतकं बंदिस्त घर राहायला नको वाटलं.
सरकारी घरांत मोकळंसोकळं राहायची सवय असलेली मी, अशा हवाबंद घरात माझा जीव कोंडला असता.
घर घर की कहानी वेगळी.
अखेर एक घर आम्हाला पसंत पडलं.
हॉल, जेवण्यासाठी वेगळी जागा, तीन बेडरूम, दोन बाल्कनी, दोन बाथरूम आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयींनीयुक्त असलेलं ते दहाव्या मजल्यावरचं घर, बघताक्षणीच आवडलं.
मालकांशी बोलणं झालं, सगळे आर्थिक सोपस्कार करून घरात राहायला जायचं ठरलं.
आता मोठी अडचण अशी आहे, की आमचं कोणतंच फर्निचर त्या घरात ठेवायला जागा शिल्लक नाही.
स्टूल, बॉक्सेस, टीव्ही स्टॅन्ड, सोफा... काही काहीच नेता येणार नाही.
प्रत्येक खोलीत छान उंची फर्निचर आणि कपाटं (wardrobes); सगळं कसं दरवाजाबंद आहे.
आता माझ्या मनात विचार येऊ लागलेत...
भारतभर फिरलो पण बहुतेक सगळीकडे सरकारी घरांची रचना, फर्निचर साधारण सारखं असायचं.
दर दोन तीन वर्षांनी बदली होते म्हणून काचेचं फर्निचर शक्यतो आम्ही घेतलं नाही. शोकेसला काच असली तरी सामान हलवताना ती वेगळी काढलेली, पुन्हा कधी लावली, तर कधी नाही.
शेवटंचं घर बदललं ते करोना काळात.
त्यावेळी ना माणसांना कामाला बोलावायची सोय, ना बाहेर जाऊन सामान आणायची.
मग काय, मोकळी जागा दिसेल त्या जागी घड्याळ, शोभेच्या वस्तू ठेवत गेलो आणि घर सजवलं.
मोठं घर, आजूबाजूला भरपूर झाडी, विविध पक्षी... अशा वातावरणात खिडक्यांना पडदे लावून आत कोंडून राहावं असं वाटलं नाही. गरज वाटली, फक्त तिथंच पडदे लावले. खरंतर डोकावण्यासाठी आजूबाजूला जवळ अशी घरं नव्हतीच. सगळीकडे नुसती झाडी, पण शेवटी सवयीचा भाग; बेडरूम बंदिस्त असावी, म्हणून ते पडदे लावायचे. फर्निचर, कपाटं आणि त्यात ठेवलं जाणारं सामान पटकन समोर दिसेल अशी रचना. काहीही कुठंही ठेवा. कधीतरी गबाळं वाटायचं; मग कोणी घरी येणार असं कळलं, की आवरासावर करायची.
आता अशा घरातून उठून एकदम बंद कपाटं असलेल्या घरात जायची, राहायची चिंता वाटू लागलीय.
जमेल का आपल्याला असं राहणं?
आपल्या स्वभावात आहे का, असं सगळं बंद करून ठेवणं? या नवीन घरात तर शोकेसला पण दुधी काचा आहेत. काहीच दाखवायचं नाही, असं कसं शक्य आहे?
दार उघडा, वस्तू काढा, दार बंद करा. पुन्हा ती ठेवताना तसंच करायचं.
पाहिलेल्या इतर सगळ्या घरांमधली विविधता पाहून वाटू लागलं, अशा घरात राहणाऱ्यांचे, अशी रचना करणाऱ्यांचे स्वभावदेखील असेच असतील का? स्वभावाप्रमाणेच ते आपल्या घराची सजावट करत असतील का?
माझ्यासारखं मन म्हणजे open book, कोणीही कधीही यावं आणि वाचून जावं. सगळं समोर. कोणीही काहीही मदत मागावी, पटकन तयार. त्यासाठी बंद दरवाजे उघडावे लागत नाहीत.
असं बंद कपाटांसारखं राहणं जमेल का कधी?
मनातले विचार एकेका कप्प्यात बंद करून सामोरं जायचं.
चेहरा कसा, दारामागची कप्प्यातली विस्कटलेली घडी दिसू न देणारा. मनातली खळबळ मनात ठेवणारा.
जसं घर, तसं मनाला थोपवू शकतो का आपण? मनातलं आणि घरातलं सगळं झाकून ठेवून काय साध्य होतं?
खूप प्रश्न पडत आहेत.
या घरात राहायला आल्यावर अशा बंद दारांमागच्या कप्प्यांची सावली मनावर तर पडणार नाही ना? आपला पण स्वभाव असाच होईल का?
यापूर्वी प्रत्येकवेळी बदलीच्या ठिकाणी निभावून घ्यायची मला कधी चिंता वाटली नाही, कारण कदाचित सगळीकडे सरकारी घरं ओळखीची असायची.
आता हे घर अनोळखी वाटतंय. मनात चलबिचल सुरू आहे. एकच मागणं आहे, या बंद दरवाजासारखं मला कुठल्या कोषात जायला लावू नकोस, देवा.
घर खूप आवडलं आहे, तिथं जाऊन सामान लावायची स्वप्नं बघतेय मी; आणि स्वतःला न बदलवण्याचा निग्रह पण करत आहे.
दोन तीन महिन्यांत जितकी घरं बघितली, त्यावरून असे विचार मनात डोकावले, इतकंचं.
- राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा