काम संपलं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे ती हातात पर्स घेऊन बाहेर पडली. दीड किलोमीटरवर घर होतं. रोज चालतच जायची तिची सवय. जाताजाता नेहमीच्या बाकावर बसून सूर्यास्त बघितल्याशिवाय तिला घरी जायचं भान राहायचं नाही. दिवसभरात आलेल्या लोकांशी संवाद साधून तिचा जीव अगदी मेटाकुटीला यायचा. याच मनःस्थितीत तिला घरी जाणं कधी पटलं नाही.
कमीअधिक प्रमाणात रोज तेच चित्र…
गगनाच्या आकाशी रंगाला हळूहळू वेसण घालणारे पिवळा... केशरी... लाल रंग...
हलकेच येणारी वार्याची झुळूक…
किनार्यावर येऊन शांतावणार्या लाटा...
समोर अथांग सागर...
निसर्गाचे हे खेळ बघता बघता, मनातला कल्लोळ कधी दूर होत जातो, ते तिला कळतच नाही. काम करून कितीही कंटाळा आला असला, तरी समोरचं हे चित्र तिला भारावून टाकायचं.
कित्येकदा तिच्या मनात यायचं, काय किमया असेल ना निसर्गाची? शीणवलेल्या मनाला ताजंतवानं करण्याची शक्ती फक्त या वातावरणात आहे.
ती बाकावर बसलेली असताना, कित्येकदा तिला तिच्याकडे समुपदेशनाला आलेल्या व्यक्ती फिरताना, बसलेल्या दिसतात. त्यांच्याकडे पाहिलं, की तिला त्यांची सुरुवातीची चुळबुळ, अस्वस्थता किंवा गतीमंदता आठवते. तिच्या प्रत्येक भेटीच्यावेळी ती त्यांना रोज थोडावेळ तरी समुद्रकिनारी जाऊन बसण्याचा, फिरण्याचा सल्ला देते. तिचा पूर्ण विश्वास त्या रचेयत्यावर आहे. तिच्यापेक्षा तोच त्यांना बरं व्हायला मदत करणार, असं तिचं मन तिला सांगत असतं.
तिच्या विचारांना पुष्टी देणारा एक संशोधन लेख तिला वाचायला मिळाला.
लेख असा होता...
(इंग्लंडच्या कॉर्नवॉल प्रदेशात ‘मानसिक आरोग्य आणि समुद्र’ या विषयावर अभ्यास केला गेला. त्याला नावही तसंच साजेसं ठेवलं - 'नील आरोग्य.'
हजारो व्यक्तींकडून माहिती घेतली गेली. त्याचं सर्वेक्षण केलं. निरीक्षणातून काही निष्कर्ष समोर आले.
आकाशाची निळाई आणि सागराची अथांगता मानवाच्या मनावरचा ताण कमी करते.
कित्येक लोकांनी त्यांचं आनंददायी ठिकाण म्हणून समुद्रकिनारी प्रदेशांचा उल्लेख केला.
मॅथ्यू व्हाइट या पर्यावरण मानसशास्त्रज्ञाने याची तीन शास्त्रीय कारणे दिली. ती म्हणजे,
१. किनारी प्रदेशात सूर्यप्रकाश जास्त असतो आणि प्रदूषण कमी असते.
२. पाण्याजवळ राहणारे अधिक चपळ असतात.
३. पाण्यात एखाद्या व्यक्तीमध्ये मानसिक चैतन्य आणि उत्साह निर्माण करण्याचा गुणधर्म असतो.
शास्त्रज्ञ जो. टी. म्हणतात, ‘‘समुद्र तुम्हाला निसर्गाशी तद्रूप कसे व्हावे हे शिकवतो. समुद्राच्या पाण्यात असताना त्याची गाज, खारटपणा, अफाट शक्ती याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागते, त्यामुळे तुम्ही जमिनीवरच्या समस्या विसरून जाता.")
तिला आठवतात तिच्या त्या सहली, त्या ठिकाणची वास्तव्य....
पोरबंदर, जामनगर, विशाखापट्टणम, अंदमान-निकोबार, ओरिसा, केरळ, चेन्नई, कोकण अशा अनेक ठिकाणी समुद्रकिनारी ती राहिली, भटकली, हुंदडली आणि प्रसन्न झाली.
या प्रत्येक ठिकाणच्या लोकांची मानसिकता सकारात्मक, समाधानी असल्याचा तिला प्रत्यय यायचा.
सागरकिनारी ध्यानस्थ बसलो, की आपण जास्त सकारात्मक होतो, असं म्हणण्यापेक्षा तिला वाटतं, 'सागरकिनारी अविरतपणे येणार्या लाटांकडे बघताना, आपण आपोआप त्यात तल्लीन होऊन जातो, भान हरपून पुन्हापुन्हा प्रत्येक लाट डोळ्यात साठवताना, आपल्या श्वसनाचा वेगही लाटेच्या वेगाशी एकरूप होऊन जातो. ते भारावलेपण मेंदूला शांतावून टाकण्यात यशस्वी होतं. नीळा रंग, लाटांची गाज चित्तवृत्ती आटोक्यात आणायला, शांत करायला हातभार लावतात.'
समुद्रस्नानाबरोबर सूर्योपासना होऊन शरीराला ‘ड’ जीवनसत्व मिळतं, त्वचा निरोगी होते.
एखादा नैराश्यग्रस्त तिच्याकडे आला, की पहिल्या भेटीत सूर्योपासना, समुद्रोपासना आणि मोकळं होणं, याबद्दल भरभरून बोलावं असं तिला वाटतं. समोरच्याच्या डोक्यात किती शिरेल ते माहीत नसतंच, पण तिचा प्रयत्न मात्र सुरू असतो.
तिला खात्री आहे, एक ना एक दिवस समुद्रावरचं भारावलेपण प्रत्येकाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपेल.
सूर्यबिंब अस्ताला गेलेलं दिसलं आणि आपसूकच तिचे पाय घराकडे वळले.
-राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा