सर्व प्राणिमात्रांची एक विशिष्ट भाषा असते. थोडा अभ्यास केला तर आपल्याला त्यांनी काढलेल्या आवाजामागचं कारण कळू शकतं.
मानवाने मात्र आपली भाषा मोठ्या कौशल्याने विकसित केली आहे.
तुम्हाला माहीत आहे का? भारतात १६०० पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. फक्त महाराष्ट्रात ६० ते ७० भाषा बोलल्या जातात. भाषा ही अभिव्यक्तिचं प्रमुख साधन आहे.
पूर्वी भाषा नव्हती, तेव्हा काय करत असतील लोक? कसा संवाद साधत असतील?
पूर्वापार आदिम जमाती/ भटक्या जमाती फिरत असत, तेव्हा एकमेकांशी संवाद साधायला त्यांनी चित्रं काढणं सुरू केलं. दिसणारा निसर्ग, येणारे आवाज, नवीनच दृष्टीस पडलेल्या गोष्टी, यांची चित्रं त्या कधी दगडावर तर कधी रेतीत रेखाटू लागले. त्यातून एकमेकांशी संवाद साधू लागले. हळूहळू त्याचं रूपांतर भाषेत होऊ लागलं. काम करताना गायलेली गीतं तयार होऊ लागली. त्यात वेगवेगळे आवाज, निसर्गाचा अनुभव चित्रित होऊ लागला. कोसाकोसावर शब्दांचे उच्चार थोड्याफार प्रमाणात बदलू लागले. लिपि, बोली आणि सांकेतिक भाषा यातून संवाद साधले जाऊ लागले.
आजच एक बातमी वाचली सोलापूर जिल्ह्यातील कुडल संगम येथील शिलालेख तब्बल १००० वर्षांपूर्वीचा असावा. म्हणजे मराठी भाषा त्यापूर्वी वापरात आली असावी.
दिवसेंदिवस शिक्षणाने आपले विचार प्रगल्भ होऊ लागले. मातृभाषा आणि प्रमाणभाषा यातला फरक कळू लागला. प्रत्येक बोली भाषेत वापरल्या जाणार्या शब्दांची उकल होऊ लागली.
भारतात अशी काही ठिकाणं आहेत, त्यांची बोली अजूनही आपल्याला कळू शकलेली नाही.
प्रत्येक राज्यात अशा काही आदिवासी जमाती आहेत, की ज्यांच्या भाषा आपल्याला कळत नाहीत.
गंमत म्हणजे या सर्व आदिवासींच्या बोली भाषा एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत. त्याला कारणंही अनेक आहेत. एकतर ते आदिवासी हजारो वर्षांच्या अंतराने वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशातून आले आहेत. काही आदिवासी साऊथ आफ्रिकेतून, काही म्यानमारकडून तर काही इंडोनेशियाकडून आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक आदिवासींची शारीरिक ठेवण, रंग, रूप वेगळं दिसून येतं.
भाषेप्रमाणेच तिथले वातावरण, तिथले आदिवासी, त्यांची संस्कृती, रीतिरिवाज एकमेकांपासून वेगळे दिसून येतात.
पूर्वीच्या काळी म्हणजे,
साधारणपणे इसवी सन पूर्व 20,000 च्या आसपास माणसाच्या आयुष्यात थोड्या फार प्रमाणात स्थैर्यता यायला लागली. दगडी हत्यारांमध्ये झालेले बदल आणि त्यामुळे शिकार करण्यात आलेली सुलभता यामुळे माणसाच्या वैयक्तिक जीवनावर आणि सामाजिक जीवनावर खूप बदल घडून यायला लागले. माणसाला भरपूर मोकळा वेळ मिळायला लागला. मिळालेल्या वेळेचा माणसानं सदुपयोग केला आणि स्वतःला चित्रांच्या माध्यमातून व्यक्त करू लागला. प्राचीन काळी तोंडातून आवाज काढण्याची सवय कुठेतरी माणसाला लागली असावी, त्यानंतर सांकेतिक भाषा आली, नंतर चित्ररूपात तो संवाद करायला लागला. त्याच्या आयुष्यात घडणार्या अनेक घटना त्यानं चित्ररूपात रंगवून किंवा कोरून ठेवल्या आहेत. चित्र रंगवणे हीसुद्धा एक प्रकारची भाषाच होती, असे म्हणायला हरकत नाही. त्या माध्यमातुन तो इतर लोकांशी बोलू शकत होता. ह्यातूनच पुढे कदाचित ‘लिपी’चा म्हणजेच लिहिण्याचा शोध लागला असावा.
प्राचीन काळी नक्की कोणती भाषा बोलली जात होती यावर अजून अभ्यास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याची उत्तरंसुद्धा लवकर मिळतील असे नाही. प्राचीन काळानंतर आलेला कालखंड म्हणजे साधरणपणे आतापासून 6000 वर्षं जुना. धातूचा शोध लागला आणि मग माणसाची मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली, असे दिसून येते. सिंधू संस्कृतीच्या काळातसुद्धा त्यांची अशी वेगळी लिपी होतीच; परंतु त्यांची भाषा काय असावी ह्याबाबत मात्र नक्की पुरावे आपल्याकडे नाहीत.
अजून एक रंजक गोष्ट मला कळली, जेव्हा मी भाषा उगम या विषयावर माहिती शोधू लागले तेव्हा.
फार पूर्वी चीनमधील हुनान प्रांतातील काही खेड्यांमध्ये महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. भाषा हे संपर्काचे सर्वांत मोठे साधन मानले जाते; मात्र हुनान प्रांतातील महिलांनी आपली स्वतःची भाषा आणि तिची लिपी विकसित करून शोधले.
हुनान हा चीनमधील ८० टक्के डोंगराळ भाग असलेला दुर्गम परिसर. येथेच ‘नुशू’ ही जगातील फक्त महिलाच वापरत असलेली भाषा जन्मली. ‘नुशू’ या चिनी शब्दाचा अर्थच ‘महिलांची लिपी’ असा आहे. या भाषेच्या जन्माचे कारण समाजाने त्यांना व्यक्त होण्यास केलेली मनाई हेच होते.
भाषातज्ज्ञांच्या मते, या भाषेचा जन्म साँग काळात ( इ.स.९६० ते १२७९ ) झाला असावा. महिलांना शिक्षण नाकारलेल्या या काळात ही भाषा आईकडून मुलीकडे व एकमेकींच्या मैत्रिणीकडे जात विकसित होत गेली. या अशिक्षित महिला भाषेची लिपी पाहून, ती गिरवत भाषा शिकल्या व ती आजपर्यंत टिकून राहिली. बाहेरच्या जगाला या भाषेची ओळख झाली १९८०मध्ये.
तज्ज्ञांना १९८० मध्ये दोनशे वस्तीच्या पुवेई गावात ही भाषा लिहू शकणाऱ्या तिघी जणी सापडल्या व हे गाव ‘नुशू’चे केंद्रस्थान बनले. चिनी सरकारने २००६ मध्ये या भाषेला सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केले व पुढील वर्षी या गावात भाषेत संग्रहालय उभारले गेले.’’ 'नुशू’ ही बोली भाषा असून, ती डावीकडून उजवीकडे वाचतात. ही भाषा जिआंगयाँग प्रांतातील चार स्थानिक बोलीभाषांच्या संगमातून बनली आहे. तिची लिपी चिनी भाषेच्या लिपीपासून प्रेरणा घेऊन बनली आहे, मात्र ती अधिक लांबलचक, धाग्यासारखे स्ट्रोक्स असलेली व खालच्या बाजूला फराटे ओढलेली दिसते. तिच्या एकंदरीत रूपावरून या भाषेला ‘मॉस्क्युटो रायटिंग’ असेही म्हणतात. मैत्रिणीला भेट दिलेले रुमाल, हेअरबॅंड, हातपंखे आणि कमरेच्या पट्ट्यांवर ‘नुशू’मधील मैत्रीचे संदेश महिला एकमेकींना पाठवत. वृद्ध महिला स्वतःचे आत्मचरित्रात्मक गीत तयार करून आपल्या आयुष्यातील कष्ट किंवा संस्काराचे दोन शब्द पुढील पिढीतील महिलांना सांगत. चीनच्या ग्रामीण संस्कृती महिलांना आपले दुःख, कष्ट, शेतीतील अडचणी सांगण्यास परवानगी नव्हती. ‘नुशू’ने या कठीण काळात महिलांसाठी मैत्रिणी बनवण्याचे व दुःख सांगण्याचे माध्यम म्हणून काम केले.
पुवेई गावात २०००मध्ये ‘नुशू’ शाळा सुरू झाली व झिन हू यांनी विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवायला सुरुवात केली, संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना भाषेची माहिती देण्यास सुरुवात केली व आशिया व युरोप खंडामध्ये या भाषेची माहिती देण्यासाठी दौरेही केले. त्यांच्या मते, ‘‘लोकांना ही भाषा शिकायला आवडते, कारण ही त्यांची एकमेवाद्वितीय अशी संस्कृती आहे.’’ झोऊ शुयोयी यांनी या भाषेवर १९५०च्या दशकात काम केले, मात्र माओंच्या राज्यात त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. मात्र, २००३मध्ये त्यांनी ‘नुशू’चे भाषांतर करून पहिला शब्दकोश तयार केला. आता प्रत्येक उन्हाळ्याच्या सुटीत पुवेईमधील संग्रहालयात ‘नुशू’चे वर्ग चालतात. ही भाषा लिहायला, उच्चारायला अवघड आहे. मात्र, आता ती व्यवहारात आणि पर्यटनाला चालना देण्यासाठीही वापरली जाते आहे. त्याचबरोबर जतन आणि वारसा म्हणूनही तिचे महत्त्व मोठे आहे. चीनमधील महिला सबलीकरणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून ‘नुशू’ आणि तिच्या पुनरूत्थानाकडे संशोधक पाहत आहेत.
भारतात अशा अनेक भाषा बोलल्या जातात; परंतु आता काही भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
चीन प्रमाणे आपणही आपल्या लुप्त होत चाललेल्या भाषांचा अभ्यास केला तर तो नक्कीच रंजक असेल.
भाषेचा उगम, स्वर, व्यंजन आणि त्या सगळ्याचा प्रसार ह्यावर अभ्यास करणारे एक महत्त्वाचे शास्त्र आपल्याकडे सध्या वेगाने प्रसिद्ध होत आहे ते म्हणजे भाषाशास्त्र (Linguistics). या शास्त्रानुसार बर्याच भाषांचा अभ्यास निश्चितच सुरू आहे.
- राजेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा