सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

अनमोल_संग्रह - धरोहर

 अनमोल_संग्रह

तुडुंब भरलेलं सभागृह...
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सुग्रास साबुदाणा वडा, बटाटा कचोरी, आंबा बर्फी, चहा आणि कॉफी असा भरगच्च नाश्ता करूनच सगळेजण कार्यक्रमासाठी स्थानापन्न झाले...
मला उत्सुकता होती ती म्हणजे, वेबसाईटवर उद्घाटन म्हणजे काय असेल...
कार्यक्रम सुरू झाला, तसा संस्थेच्या कार्याचा प्रचंड आवाका लक्षात येऊ लागला...
धरोहर संस्था, उदयपूर...
ही एक, ना नफा तत्वावर चालणारी संघटित संस्था आहे. या संस्थेत सुरू असलेल्या कार्याबद्दल माहिती फार कमी जणांना असेल. त्यांचं कार्य, त्याचा उपयोग जगभरात व्हावा, यासाठी संस्थेने आपली वेबसाइट सुरू केली. या वेबसाइटच्या उद्घाटनाला जायचा योग मला काल आला.
या कार्यात मोलाचा सहभाग असणार्या डॉ. विनया क्षीरसागरबाईंनी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रह केला.
संस्था मा. संजय सिंघल आणि परिवार चालवत आहेत.
दोन-तीन वर्षांपूर्वी सिंघल सरांना प्राचीन संस्कृत ग्रंथ, हस्तलिखितं जतन करण्याची नितांत गरज असल्याचं जाणवलं. आपलं प्राचीन वैभव, ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोचावं, यासाठी ते सर्व ग्रंथ आजच्या नवीन संगणक प्रणालीत साठवून जगाच्या कानाकोपर्यात पोचवण्याचा संकल्प त्यांनी केला.
हे कार्य फक्त एकजण करू शकत नव्हता.
जे संस्कृत विद्वान आहेत, त्यांना संगणकाचा वापर करणं शिकावं लागलं, जे संगणक प्रशिक्षित आहेत, त्यांना संस्कृत विषय माहिती करून घ्यावा लागला. संशोधन करणाऱ्याला माहिती सहजरीत्या मिळावी, सामान्य व्यक्तीलादेखील हे site वापरता यावं यासाठी ते सोप्यातसोपं कसं होईल याची मांडणी केली आहे.
'धरोहर'मध्ये हस्तलिखितं संगणिकृत करण्याचं कार्य सुरू आहे.
या वेबसाईटमधून ग्रंथांचे सविस्तर आणि वर्णनात्मक कॅटलॉग पाहता येतील.
हस्तलिखितं मिळवायची... त्यांचं स्कॅनिंग करायचं... प्रत्येक पानाची क्रमवारी लावायची... त्याचं लेखन कोणी केलं, कधी केलं, कोणी सांगितलं… त्यात नेमकं काय वाचायला मिळेल... त्याचा विषय कोणता.. किती पानांचं आहे... अशी टिपणी प्रत्येक ग्रंथाबद्दल एकत्रित केली जाते.
आता वेबसाइटवरून ही माहिती संस्कृत अभ्यासकाला जगाच्या कोणत्याही कोपर्यात सहज मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक होते, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोशाध्यक्ष, परम पूज्य गोविंद देव गिरी महाराज.
महाराज संस्कृत साहित्याबद्दल बोलताना म्हणाले...
"८० वर्षांपूर्वी कौटिल्य अर्थशास्त्र प्रकाशात आलं, त्या वेळी जाणवलं, आपल्या देशात किती वर्षांपूर्वी अर्थशास्त्राचा विचार केला गेला होता.
मी जेव्हा विदेशी जाऊ लागलो; विदेशात मी फक्त एकाच कामासाठी जायचो. तिथल्या वाचनालयात असलेल्या साहित्याचं वाचन करायला. तिथल्या कित्येक पुस्तकालयात आपण दिवसभर बसून कितीही, कोणतीही पुस्तकं वाचू शकतो. त्यावर टिपणी काढू शकतो.
वाचत असताना मला जाणवलं, इंग्लिश भाषेत जास्तकरून चार विषयांवर लेखन अधिक झालं...
१. management –
२. self health –
३. leadership –
४. relationship –
वरील पुस्तकं मी वाचत गेलो, तेव्हा लक्षात आलं, या साहित्यात जे लिहिलंय, त्यापेक्षा कितीतरी अधिक विचार आपल्या ग्रंथातून मांडलेले, मी आधीच वाचलेत.
management बद्दल वाचताना जाणवलं, यापेक्षा कितीतरी अधिक व्यवस्थापन महाभारतात लिहिलं गेलंय.
self health बद्दल कितीतरी अधिक आपल्या योगवशिष्ट मध्ये वाचायला मिळतं.
leadership बद्दल चाणक्य आणि रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलं आहे तितकं कुठेच नाही.
relationship बद्दल बोलायचं झालं तर आपलं रामायण सर्वात वरचढ ठरेल."
असे काही दाखले देत महाराजांनी आपल्या प्राचीन ग्रंथसंपदेचं महत्व पटवून दिलं.
अशी ही आपल्याकडची अनमोल संपत्ती वेबसाइटच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचं कौतुकास्पद कार्य सिंघल परिवार करत आहे.
हे पुनरुत्थान करण्याचं कार्य, त्यांचं जतन, संरक्षण करण्याचं कार्य, येणार्या कित्येक पिढ्यांसाठी उपयुक्त होणार आहे.
कित्येक अभ्यासक संस्कृत भाषेकडे पुन्हा परत येत आहेत, विदेशात देखील यावर काम सुरू आहे.
मला वाटतं, भारतात होत असलेलं हे एकमेव काम आहे, जे दूरदृष्टी ठेऊन मोठ्या ध्येयानं केलं जात आहे.
पुढील वीस वर्षात 25,00,000 हस्तलिखितांची विवरणात्मक माहिती उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी अंदाजे दोनशे संस्कृत अभ्यासकांना नियुक्त करून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणं, हा संकल्प आणि ही दूरदृष्टी भारतात 'धरोहर'ने दाखवली आहे.
या कार्यात पुण्यातील वैदिक संशोधन मंडळाचा सहभाग मोठा आहे. त्याचबरोबर इतरही संस्थांकडून हस्तलिखितं येऊ लागली आहेत.
भारतातील हे ज्ञान जगभरात सहज पोचवण्याचं करत असल्याबद्दल धरोहर समुहाचे, सिंघल परिवाराचे, वैदिक संशोधन मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन!
प्रत्येकानं एकदातरी http://www.sangrah.org या ठिकाणी भेट देऊन माहिती घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...