सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

बुरखा_हिजाब_घुंघट

 बुरखा_हिजाब_घुंघट

"राजेश्वरी, ओळखलंस का ग?"
"अग, तू शबानादीदी ना? तुला का नाही ओळखणार मी?"
"अग, मला नाही ग, हिला ओळखलंस का?"
'नखशिखांत'ची व्याख्या अशा कित्येक 'ती'ला बघून बनवली असावी असं तिला बघून वाटलं मला. ना डोक्याचा एक केस, ना हाताचं एक नख की पायाचं नख दिसत होतं. कसं काय ओळखणार होते मी तिला? माझ्याइतकीच उंच होती ती. डोळ्यांवर फक्त बारीक जाळीदार पट्टी, बाकी उद्घाटन करण्यासाठी एखाद्या पुतळ्याला कापडाने झाकावं तसं तिला काळ्या बुरख्याने लपेटलं होतं.
"शबानादीदी, तिला चेहरा दाखवायला सांग ना."
"इथे रस्त्यात? नाही ग बाई, घरचे ओरडतील तिला. तुला बघायचं का तिला? मग चल घरी, खोलीत जाऊन बुरखा काढून दाखवेल ती."
"आत्ता नको ग, जरा गडबडीत आहे. पण ही कोण ते सांग ना."
"अग, ही आपली मोना. नुकतीच दहावीची परीक्षा दिली. खूप हुशार आहे. पुढे शिकवणार आहे तिला."
"मोना? आणि ही? किती मोठी, उंच झाली ग.? पण इतक्या लहानपणापासून तिला असं बुरख्याआड का लपवताय?"
"इलाज नाही ग."
माझ्या डोळ्यासमोर ती लहान सहा आठ महिन्यांची मोना आली. शबानादीदी बाळंतपणाला म्हणून माहेरी आली ती परत गेलीच नाही. नवरा दारू पिऊन खूप मारायचा. बागवानांच्या घरातली एकमेव पदवीधर. आयुर्वेदिक औषधाचं दुकान चालवायची, अजूनही चालवते. तिच्या आजोबांना ज्ञानेश्वरी तोंडपाठ. दुकानात कधीही जा, दादा एक तरी ओवी ऐकवायचेच. कधी कुणाच्यात भेदभाव करायचे नाहीत. आठ मुलं होती त्यांना, त्यात शबानादीदी सर्वात मोठी. दारात मांडव टाकून तिचं लग्न केलं होतं. सगळ्या गल्लीत त्यादिवशी कोणाच्याच घरी चूल पेटली नाही. आम्ही पण त्या लग्नात उत्साहाने सामील झालो होतो. त्यावेळी बागवानांच्या एकाही बाईच्या अंगावर बुरखा नव्हता.
मोनाला जन्मल्यापासून आम्ही पहात आलो. ती जरा बसायला लागली आणि मग मात्र आम्ही बहिणी नेहमी तिला घरी घेऊन यायचो. उजळ रंगावर खुलून दिसायचे काळेभोर टपोरे डोळे... गोबरे गोबरे गाल... त्यावर हसताना पडणारी खळी… ती खळी बघायला मिळावी म्हणून तिला सारखं हसवायचं... तिला नेहमी झगमगीत घोळदार फ्रिलचे फ्रॉक घालायचे, त्यामुळे तिला बसवलं की त्याचा घोळ तिच्याभोवती रिंगण घालायचा. ती मधे फतकल मारून बसायची आणि भोवतीने आम्ही भावंडं... त्यावेळी मर्फीच्या जाहिरातीतला मुलगा फार प्रसिद्ध होता पण त्याच्यापेक्षा कितीतरी सुंदर मोना दिसायची.
ती शाळेत जायला लागली आणि माझी नोकरी सुरू झाली. मग ती कधीतरीच दृष्टीस पडायची. तेच टपोरे डोळे, डोळ्यात काळाभोर सुरमा की काजळ, तीच गालावरची खळी. लाजायची फक्त, पण बोलायची नाही. मग माझं लग्न झालं आणि मोनाची आठवण मागे पडली.
अचानक त्या दिवशी शबानादीदीने हाक मारली. त्या बुरख्यात लपेटलेल्या मूर्तीला कशीकाय ओळखणार होते मी?
फार वाईट वाटलं होतं तसं तिला बघून. दहा वर्षांत जग बदललं पण आमची गल्ली तीच होती. मग असा गोशा का? का तिला असं झाकून ठेवलं असेल? दादा निवर्तले आणि कारभार मुलांच्या हाती गेला. जातीत भेदभाव सुरू झाला. मुलांनी दाढी वाढवली, अंगात पठाणाचा वेश आणि डोक्यावर पांढरी टोपी आली. आता त्यांना समोर बघितलं तरी दहशत वाटते. दिवाळी, ईद सलोख्याने साजरे होणारे सण आता स्वतःपुरते राहिले. दादांच्या दुकानात ऐकू येणार्या ज्ञानेश्वरीच्या बोलांची जागा आता उर्दूमिश्रित हिंदीने घेतली.
परिस्थिती बदलली. फक्त मोनाच्या अंगावर बुरखा चढवला गेला नव्हता तर प्रत्येकाच्या मनावर बुरखा चढला होता. मोकळे विचार गोशात ढकलले होते. याला कारण काय ते कळत नाही पण मला मात्र पूर्वीसारखं तिच्या घरी जाऊन, स्वयंपाकघरात फरशीवर बसून चहा पिण्याची हिंमत झाली नाही. ते घर आता परकं वाटू लागलंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...