सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५


प्रतिमा_आणि_प्रतिभा
प्रतिमा पाहिली आणि त्याचवेळी मनात आलं होतं...
दूरवरून संगीताचे स्वर येत असावेत आणि तल्लीन होऊन हे त्रिकुट निद्रेच्या आधीन झाले असावेत.
शांत झोपी जा बाळा, उद्याची चिंता नको करू.. अशा अर्थाचे ते स्वर असावेत.
चिंता करणारा तो भगवंत आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि या भावनेमुळेच हे त्रिकुट निश्चिंत झोपले असावे.
शोध सुरू केला आणि दोन कविता सापडल्या.
एक आहे ती १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई चित्रपटातील.
आशाताईंचा आवाज ओळखू देखील येत नाही.
१. नीज नीज माझ्या बाळा
गायिका : आशा भोसले
गीत : यशवंत
संगीत : वसंत देसाई
चित्रपट : श्यामची आई
नीज नीज माझ्या बाळा
नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
काळजी जगाची सार्या आहे भगवंता !
अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता तो जगाचा बैसे जागत अजून
ज्याने मांडियला सारा विश्वाचा हा खेळ
तोच चालवील त्याला, तोच सांभाळील
झोपली पाखरे रानी, झोपली वासरे
घरोघरी झोपी गेली आईची लेकरे
नको जागू, झोप आता, पुरे झाली चिंता
काळजी जगाची सार्या आहे भगवंता
गाणं ऐकायला खाली लिंक देत आहे.
दूसरा शोध लागला तो, १८९७ साली लिहिल्या गेलेल्या कवि दत्त यांच्या रचनेचा.
ही कविता बालभारतीच्या पुस्तकात होती.
गंमत आली जेव्हा मी त्या कवितेच्या खाली लिहिलेले संदेश वाचले तेव्हा. कित्येकांनी लिहिलंय की, हे गाणं मला झोपवताना माझी आई गायची, बाबा गायचे.
एका संदेशात पुढे होतं, हे गाणं मी माझ्या दोन मुलींना झोपवताना म्हणतो. मला माझ्या आईने ऐकवलं, आईला तिच्या आईने आणि आजीला झोपवण्यासाठी हे गाणं तिचे बंधु गायचे. म्हणजेच त्यांच्या चार पिढ्या ही अंगाई ऐकत झोपी जात आहे. वाचून मला इतकं छान वाटलं.
आपल्या कितीतरी परंपरा आपण पालकांकडून घेत असतो, तशाच चालू ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण पिढी बदलली की अंगाई गीते पण बदलतात. आवड बदलते, कानावर पडणारे स्वर बदलत जातात.
ही सव्वाशे वर्षं जुनी कविता मात्र त्या घराने जपलीय. मला फार उत्सुकता होती, त्या कवितेला जाणून घ्यायची
२. निज नीज माझ्या बाळा
बां नीज गडे नीज गडे लडिवाळा निज नीज माझ्या बाळा ॥ ध्रु ॥
रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।
खडबड हे उंदिर करिती । कण शोधायाते फिरती ।
परी अंती निराश होती । लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। २ ।।
बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
वाहतो फटींतून वारा । सुकवीतो अश्रूधारा ।
तुज नीज म्हण सुकुमारा । हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ॥ ३ ॥
जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
दारिद्य्र चोरिल कोण? । आकाशा पाडिल कोण? ।
दिग्वसना फाडिल कोण? । त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ॥ ४ ॥
तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
तरी सोडुं नको सत्याला । धन अक्षय तेच जिवाला ।
भावें मज दीनदयाळा । मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ॥ ५ ॥
कवी - दत्त (रचना : सन १८९७)
दोन्ही कवितात एक साम्य म्हणजे सगळी चिंता भगवंताला देऊन तू शांत झोप अशी आळवणी केलीय.

झोपी गेलेल्या तिघांपैकी दोघांचे शांत, निश्चिंत चेहरे पाहिले आणि या कविता नक्कीच ते जगत आहेत अशी जाणीव झाली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अनुभव_एका_पावसाचा

  अनुभव_एका_पावसाचा नुकतीच मी श्रीकांत सुनीताच्या घरी काही कारणाने जाऊन आले. गेट उघडलं तर समोर सुनीताला बघून मी म्हटलं, "अगं, किती छान ...