आपल्या मुलांचे पालकत्व सगळेच करतात पण भारतीय सेना देशाचे पालकत्व स्वतःच्या शिरावर उचलते. स्वतःची जबाबदारी समजून अडल्यानडल्यांची काळजी घेतात. त्याची सुरुवात आपल्या ऑफिसपासूनच होते.
आज मला दोन भागात सांगावंसं वाटतं, एकात आमचे पालकत्व कधीतरी कोणीतरी घेतले आणि दुसर्यात आम्ही कोणाचेतरी पालकत्व स्वीकारले, अगदी नकळतपणे, नैतिक जबाबदारी समजून.
सैन्यातील प्रत्येक शाखेत कुटुंब कल्याण संघटन असतात. तसंच प्रत्येक ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालच्या कर्मचार्याचे कौटुंबिक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत असतात. नुसतं कर्तव्य म्हणून नाही तर एक जबाबदारी म्हणून स्वेच्छेने करत असतात. सहाजिकच अधिकार्याची पत्नी कर्मचार्यांच्या कुटुंबाचा हालहवाल नेहमीच जाणून घेत असते.
आमच्या प्रत्येक बदलीच्या ठिकाणी मला तर हा अनुभव वेळोवेळी आला.
सुरुवात झाली ती जामनगरपासून... मुलं लहान होती तोपर्यंत किशोरचे साहेब आणि मॅडम नेहमी घरी येऊन विचारपूस करायचे. त्यांच्याकडून कर्मचार्यांची कौटुंबिक जबाबदारी सांभाळायचे धडे पहिल्यांदा मला मिळाले.
मी पहात आले, ऑफिस बदललं, काम बदललं, अधिकारी बदलले तरीही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी तीच. काही किस्से मी पूर्वी लिहिले आहेतच. निकोबारला गेल्यावरची आठवण, मला कर्नल सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं, "इथे कोणीच फॅमिली आणलेली नाही त्यामुळे खोलीत बसून कंटाळा आला म्हणून एकट्याने अजिबात बाहेर फिरायला जायचं नाही.तसंच ते रोजच्या मेसच्या जेवणाच्या टेबलवर बसल्यावर मुलं नीट जेवली का? काही अडचण आहे का? असं विचारायचे.
बेळगावला तर घरात मुलं, आजारी सासुसासरे असताना माझी होणारी धावपळ, माझा ताण कमी करण्याच्या हेतूने साहेबांनी विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी माझी नेमणूक केली. त्यावेळी मला घरच्या ताणतणावातून बाहेर पडायचा हा मार्गच दाखवला.
पुण्यात तर चाकाच्या खुर्चीत एका मुलीला बसवून कोण फिरत असतं, त्याची माहिती काढून Lt जनरल मॅडम, आरोहीला भेटायला, तिच्या आजारपणाची चौकशी करायला घरी आल्या. आमच्या अडचणी समजून घेतल्या आणि वेळोवेळी मदत करण्याची देखील तयारी दर्शवली. जेव्हा कधी आरोही आजारी असेल तेव्हा मी माझ्या स्वयंपाकीला तुमच्याकडे पाठवेन, दवाखान्यात न्यायला आमची गाडी ड्रायवर देईन, इथपर्यंत बोलणी झाली. अगदी आमची बदली तीन वर्षांपूर्वी दिल्लीला झाली तेव्हा Lt जनरल सरांकडून फोन करवून ती रद्द करायला लावली. इथल्या जवळपास हजार, दीड हजार कर्मचार्यांमधील किशोर एक पण तरीही त्यांचं प्रत्येकाकडे तितकेच लक्ष.
हा सगळा पालकत्वाचाच भाग नाही का? अजून कितीतरी उत्साहवर्धक उदाहरणं देता येतील.
आता आम्ही पूर्ण केलेल्या काही जबाबदार्यांबद्दल...
किशोरला बढती मिळत गेली आणि त्याच्या हाताखालच्या कर्मचार्यांची संख्या वाढत गेली. महिन्यातून एकदा तरी त्यांच्या कुटुंबाला भेटणे, काही अडचणी असतील तेव्हा शक्य असेल तर सोडवणे, मुलांची प्रगती विचारणे, २६ जानेवारी आणि सुट्टीत मुलांसाठी कार्यक्रम आयोजित करणे वगैरे करावे लागायचे.
समुपदेशन तर कित्येकदा करावं लागायचं. सगळ्यांना माहीत होतं, इच्छुकांच्या मदतीसाठी आमच्या घराचं दार सदैव उघडं असतं.
मला त्यातले काही अनुभव सांगावेसे वाटतात.
"मॅडम,
"काम संपवून घरी आला की नवरा फार चिडचिड करतो. रोज भांडण करतो आणि मग दारू पितो."
"मी माहेरी फोन केलेला त्याला आवडत नाही."
"मी मुलाला दूध पाजत असले की तो फार चिडचिड करतो."
"मुलगा अजिबात अभ्यास करत नाही, दिवसरात्र त्याला खेळायचं असतं."
"आमची बदली झाली पण नवरा मला सासरी रहायचा आग्रह करतोय. मला तिथे नाही नवर्याबरोबर जायचंय."
"मॅडम, लवकर घरी येता का? तो मुलाला फार मारतोय."
"मला पुढे शिकायचं आहे, पण तो नाही म्हणतो."
"आंटी, मला अजून शिकायचंय, सांगा ना माझ्या आईला. सारखं लग्नाच्या मागं लागलीय."
एक ना अनेक प्रश्न. माझ्या अडचणी बाजूला सारून कधीकधी जावं लागायचं.
आमच्यासारखे सगळेचजण आपल्या घरापासून, नातेवाईकांपासून दूर आलेले. अडचण आली तर कोणाला सांगणार? आपले साहेब, मॅडम वयाने आणि अनुभवाने मोठे म्हणून साहेबांची मदत घ्यायची.
एकदा तर मला आठवतं, तिचा फोन आला, 'मॅडम, नवरा आत्महत्या करायला रेल्वे रुळाकडे निघालाय, तुम्ही लवकर या."
बापरे! असं खरंचं झालं तर? तो किशोरच्या ऑफिसमधला म्हणजे पहिली चौकशी.... पुढचा विचार करून मी हादरलेच. रात्रीचे आठ वाजले होते, किशोर अजून ऑफिसमध्येच होता. गाडी काढता काढता त्याला फोन केला. त्याची मीटिंग सुरू होती. आरोहीला गाडीत ठेवलं, आमच्या घराशेजारी गेस्ट हाऊस होतं, तिथल्या चौकीदाराला बरोबर येण्यासाठी फोन केला आणि निघाले. त्याची क्वार्टर आमच्या घरापासून एक दीड किलोमीटर अंतरावर, पण पोचेपर्यंत जिवातजीव नव्हता. बायकोने त्याला समजावत, बोलत ठेवलं होतं. शेजारी पाच वर्षांखालील त्याची दोन मुलं बिथरलेली. मला काय करावं, कशी समजूत घालावी काहीच कळत नव्हतं. त्याच्या समोर बसले तेव्हा क्षणभर वाटलं, एक जोराची ठेवून द्यावी. पण.. मला कुठलं जमतंय? शांतपणे विचारत, बोलत बसले. माझं शांतपणे बोलणं त्याला फारसं पटत नव्हतं. थोड्यावेळाने तो काहीच ऐकत नाही असं जाणवलं तेव्हा मात्र माझा आवाज चढू लागला. मी त्याला झापायला सुरुवात केली. खरंतर माझ्या प्रकृतीच्या अगदी विरुद्ध पण आरोहीच्या जेवणाची, इंसुलिनची वेळ टळून गेली होती आणि स्वयंपाक पण करायचा राहिला होता. आणि त्याला कसं शांत करावं कळत नव्हतं. नशीब तो माझ्या समोर उलट बोलत नव्हता. माझा चढलेला आवाज ऐकून आजूबाजूच्या क्वार्टरमधले आले पण माझ्यासमोर तेही चूप. वीस मिनिटे झाली असतील आणि किशोर अजून दोन जणांना घेऊन आला. मग बोलण्याचा ताबा किशोरने घेतला आणि मी बाजूला झाले.
तासभर चर्चा झाल्यावर, 'मी आता भानावर आलो, कधीच आत्महत्या करण्याचा विचार मनात येणार नाही,' असं त्याने कबुल केल्यावर आम्ही निघालो. तरीही रात्रभर मला सारखं तेच आठवत होतं आणि माझ्यात चंडिका कशी अवतरली याचं राहूनराहून किशोरला आश्चर्य वाटत होतं.
दुसर्या दिवशी सकाळी मुलांना शाळेत सोडून दोघंही सॉरी म्हणायला घरी आले. या घटनेला सात आठ वर्षं झाली तरी अजूनही ते आमच्या संपर्कात असतात. एक कुटुंब सावरलं याचं समाधान खूप आहे.
एकजण, "लग्न होऊन सहा वर्षं झाली तरी मूल होत नाही आता बायकोला घटस्फोट देतो आणि दुसरं लग्न करतो म्हणाला." खूप गोड, प्रेमळ बायको. माझी अगदी मैत्रीणच झालेली. त्याचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं. सासू सासर्यांच्या त्रासामुळे ती हळूहळू नैराश्यग्रस्त होऊ लागलेली. दोन तीन वेळा त्याच्याशी बोलून बोलून, त्याला त्याचा निर्णय बदलायला भाग पाडला. नंतर त्यांना दोन मुली झाल्या.
बेळगावला एका चित्रकला स्पर्धेत पहिला आलेल्या चौकीदाराच्या मुलाची हुशारी बघून 'त्याला खूप शिकव' हा माझा सल्ला ऐकून त्या मुलाला दहावीत ९५ टक्के पडले, आता इंजीनीरिंग करतोय, असं ऐकते तेव्हा खूप आनंद होतो.
या सगळ्या कुटुंबाचे आपण पालक आहोत. त्यांची देखभाल आपल्याला करायची आहे, ही भावना आपल्याला जबाबदार बनवतं.
आर्मीत सामील झाल्यावर ज्या जवान, अधिकार्यांना इंजीनीरिंग करायचं असेल ते इथे CME मध्ये शिकायला येतात. बहुतेक सगळे एकेकटे असतात पण अडचण असेल तर परवानगी घेऊन फॅमिली आणू शकतात. मागच्या वर्षी अशीच काही जणांची कुटुंबं आली होती. एक दिवस रात्री बारा वाजता किशोरला फोन आला. 'आमच्या शेजारच्या गेस्टरूम मध्ये काहीतरी गडबड झालीय. त्याची बायको खूप आजारी आहे.' सहाजिकच गाडी मिळवून तिला अॅडमिट करेपर्यंत किशोर घरी यायला रात्री उशीर झाला. शिकायला आलेले अधिकारी कोर्स पूर्ण करून सुखरूप आपआपल्या जागी जाईपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेणे, त्यांच्या अडचणींवर तोडगा काढणे हे पालकत्व नाही तर अजून काय?
सुदृढ पालकत्व म्हणजे जिथे अपेक्षांचे ओझे नाही फक्त निखळ प्रेम,आनंद आणि समाधान!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा