मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

ग्रंथवेध मुलाखत

 

ग्रंथवेध मुलाखत 



१. पुस्तक लिहिण्यामागची तुमची प्रेरणा कोणती?


खरं सांगायचं तर मी एक गृहिणी आहे. किशोरच्या दर तीन वर्षांनी भारतभर होणार्‍या बदल्यांमुळे मी स्वतःचं वेगळं असं काही करू शकेन हा विचार कधी मनात आला नव्हता. चार वर्षांपूर्वी आम्ही बदली होऊन पुण्यात आलो. त्याचवेळी मी 'माझा मराठीचा बोल' या फेसबूक समूहात सामील झाले. या समूहाचा, 'मराठी आणि फक्त स्वलिखित साहित्य' हा प्रमुख उद्देश असल्याने माझ्या लिखाणाला इथेच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. मी माझे इतर राज्यांमधील अनुभव लिहीत असताना निकोबारचे काही अनुभव लिहिले. अनेकांना ते विलक्षण वाटल्याने याबद्दल आणखी विस्तृत लिहिण्याची मागणी आली. पुस्तकाचा पाया त्याचवेळी रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. मला स्वतःला त्यात खूप आनंद मिळत गेला. त्यासाठी मी निकोबार बेटांची माहिती मिळवत गेले. भारतात असूनही कित्येक भारतीयांना अनभिज्ञ असलेली ही बेटं, यांची ओळख आपण करून दिलीच पाहिजे असं वाटू लागलं.  एकीकडे आमचा कार निकोबार प्रवास लिहीत होतेच. माहिती मिळवताना असं लक्षात आलं की मराठीत निकोबार बेटांवर एकही पुस्तक नाहीये. मला खरं तर खूप आश्चर्य वाटलं. त्याचवेळी माझा विचार पक्का झाला की, पुस्तक लिहायचं. इंग्लिशमध्ये माहिती घेत असताना डॉक्टर तिलक रंजन बेरा सरांची पुस्तकं वाचनात आली. त्यांचे संशोधन आणि प्रवास यांची त्यांनी घातलेली सांगड मला खूप आवडली. काहीवेळा त्यांच्याशी बोलून माहिती घेतली. सरांचं मोलाचं सहकार्य आणि भक्कम पाठिंबा, प्रोत्साहन मिळाल्यामुळेच मी ही 'निकोबारची नवलाई' सर्वांसमोर ठेवू शकले. म्हणजेच डॉ. बेरा आणि आमच्या समूहाचे सदस्य यांची प्रेरणा लिखाणासाठी मोलाची ठरली.      





२. लिहिण्याची काही रूपरेषा आखली होती का??


पुस्तक लिहिण्याची अशी रूपरेषा सुरूवातीला आखली नव्हती. सुरूवातीला फक्त आमचं प्रवासवर्णन लिहीत गेले. ते लिहून झाल्यावर माझ्या काकांना ते वाचायला दिलं. ते स्वतः इतिहास भूगोलाचे जाणकार असल्याने त्यांनी मला बाकीच्या गोष्टींची माहिती, म्हणजेच तिथला इतिहास, वातावरण, संस्कृती याची माहिती घेऊन लिहायला सुचवले. तब्बल वर्षभर मी ती माहिती मिळवत गेले, लिहीत गेले. आधी एकेक लेख लिहीत गेले. जोडणी नंतर करू असा विचार केला. जे काही लिहिन ते वाचून वाचकांना तिकडे गेल्यासारखं वाटलं पाहिजे असा विचार मनात होता. सुरूवातीला सगळं लिखाण विस्कळीत वाटत होतं. नंतर किशोर, माझी बहीण आणि मेव्हणे यांच्याशी चर्चा करून आणि त्यांच्या सहकार्यामुळे पुस्तकाला नेटकेपणा आला. 




३. पुस्तक सलग लिहिलं, का थोड्या थोड्या अंतराने लिहिलं?


पुस्तक सलग नाही लिहू शकले. सलग लिहिला होता तो आमचा निकोबार प्रवास. अंदमान निकोबार बेटांना प्रचंड मोठा इतिहास आहे. त्यावर अनेक राज्यकर्ते येऊन गेले. सगळीकडे तो इतिहास काही प्रमाणात तर मिळत होताच पण मला तो जसाच्या तसा मांडायचा नव्हता. त्यातल्या काही रंजक घटना मला माझ्या भाषेत मांडायच्या होत्या. अर्थात त्याची सत्यता पडताळूनच. मिळेल तिथून पुस्तके मिळवून, मराठी शब्दकोशातून, शोध निबंध वाचून माहिती मिळवत गेले. फार कमी माहिती उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा एकदा अंदमानला जाऊन, पंधरा दिवस राहून माहिती मिळवली. त्यामुळे लिखाणात मधे मधे काही दिवसांचा खंड पडत होता. पण एक परिपूर्ण, अभ्यासपूर्ण पुस्तक तयार करण्यासाठी वेळ लागणं सहाजिकच होतं.    




४.लिहिताना काही अडचणी आल्या का??


पुस्तक लिहिताना भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. मी एका पुर्णपणे माझ्यावर अवलंबून असलेल्या दिव्यांग मुलीची, आरोहीची आई आहे. तिची शारीरिक कमजोरी कधी आजारपणात बदलेल हे सांगू शकत नाही. चोवीसतास जवळ असणारी आई तिला सोडून दुसर्‍या खोलीत लिहीत बसलेली सुरूवातीला तिला सहन झाली नाही. कधी चिडचिड, कधी रडून ती तिची नाराजी दर्शवायची. मग मला लिखाण बंद करावे लागायचे. पण नंतर तिला समजावले आणि ते तिला समजले. या पुस्तकाचे लिखाण करताना तिची इतर आजारपणं होतीच शिवाय दोन मोठी आजारपणं पण झाली ज्यामुळे मी काही दिवस/ काही आठवडे चोवीस तास तिच्या दिमतीत अडकले. त्याचवेळी सासुबाईंचे आजारपण आणि नंतर त्यांचे निधन झाले. मग पंधरा वीस दिवस त्यांच्या उत्तर कार्यासाठी जमलेल्या जवळच्या नातेवाईकांमुळे, भेटायला येणार्‍या जाणार्‍यांमुळे लिखाणाला खीळ पडला. नंतरही थोडे दिवस कदाचित एक दोन महीने मी लिहू शकले नाही. अशा मनःस्थितीत ते लिखाण करणं योग्य वाटत नव्हतं. कित्येकदा आलेल्या अडचणी पाहून तर असं मनात येत होतं की, माझं आणि किशोरचं हे पुस्तकाचं स्वप्न फक्त स्वप्नच रहातंय की काय. 



५. त्या तुम्ही कशा सोडवल्या?


अडचणी येत गेल्या तसे मार्गही निघत गेले. काही अडचणी सोडवण्यासारख्या नसतातच. जे काही  घडत असतं ते बघण्यावाचून पर्याय नसतो. माझा स्वतःचा अनुभवाने तयार झालेला स्वभाव हा की, 'जे घडते ते आपल्या चांगल्यासाठीच असते.' त्यामुळे अडचणी आल्या तरी मी शांत असायचे. पुस्तक लिखाण थोडे लांबले पण त्या दरम्यान आमची अंदमान सहल झाली त्यानंतर एकेक करून मला सगळ्या त्सुनामी योद्ध्यांच्या मुलाखती घेता आल्या. विंग कमांडर भांडारकर सर आणि कमांडंट मिलिंद पाटील सर या दोघांचे सहकार्य कौतुकास्पद होते कारण नेमके त्याचवेळी आरोहीच्या आजारपणामुळे मी तिला सोडून त्यांच्याकडे मुलाखत घ्यायला जाऊ शकत नव्हते. माझी अडचण समजून घेऊन दोघेही आपआपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आमच्या घरी अनुभव कथन करायला आले. मेघनाची मुलाखत मात्र मी प्रत्यक्ष न भेटता फोनवर बोलून घेतली. या सर्वांचे सहकार्य माझ्या अडचणीच्या काळात मला फार मोलाचे वाटते. या सगळ्यांच्यामुळेच 'निकोबारची नवलाई' हे एक परिपूर्ण पुस्तक लिहू शकले. 




६. पुस्तकातील व्यक्तिरेखा तुमच्या माहितीच्या होत्या का? की केवळ ऐकून तुम्हांला त्यांच्याबद्दल लिहावंसं वाटलं आणि मग तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटला.?


माझ्या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा यापूर्वी  माझ्या माहितीच्या नव्हत्या. त्यातल्या प्रत्येकाला मी प्रत्यक्ष भेटून, त्यांच्याशी बोलून मगच त्यांच्याबद्दल लिहिले. जे लिहिले ते आधी त्यांना वाचायला दिले आणि मगच त्याचा समावेश पुस्तकात केला. जे अमराठी होते त्यांना इंग्लिश रूपांतर करून पाठवले. काही व्यक्तिरेखा मला योगायोगाने भेटल्या असं म्हणावं लागेल. सुरूवातीला मी निकोबार प्रवास आणि इतिहास लिहीत असताना सारखं वाटत होतं की, जर अजून माहिती घ्यायला आपल्याला पुन्हा अंदमानला जाता आले तर? निकोबारला तर आता मी जाऊ शकत नव्हते. मग मनातली इच्छा पूर्ण झाली अंदमान सहलीने. किशोर आणि त्याचे मित्र कुटुंबाने अंदमान सहलीची कल्पना उचलून धरली. त्यात मोलाची साथ दिली ती पोर्ट ब्लेयरला रहात असणारे मित्र श्रीधर यांनी. आरोहीला बरीच पथ्य असल्यामुळे तिला बाहेरचे खाणे देता येत नाही. त्यांच्या घरात तिची जेवणाची व्यवस्था होत असल्याने मी आरोहीला घेऊन पुन्हा तिथे राहू शकले. एका बेटावर फिरत असताना योगायोगाने एका बागेत यादव मॅडमची गाठ पडली. पूर्वीच्या निकोबार बेटांची माहिती यादव सरांकडून मिळाली. मग त्यांच्याकडून EHL सोसायटी बद्दल कळले. तिथे लुकास सर भेटले. त्यांनी त्सुनामी पूर्वीचे आणि नंतरचे निकोबार असे खूप सखोल बदल निदर्शनास आणून दिले. अनुराधाताई पण रॉस बेटावर भेटल्या. कॅप्टन नंदा पण बोटीवर असलेल्या दोनशेच्या वर लोकांमधून आपणहून आमच्याशी बोलायला आले हा पण एक योगायोग नाही का?  

अंदमान ट्रीप नंतर परत पुण्यात आल्यावर किशोरला ऑफिसमध्ये जोशीसर भेटले. त्यांच्याकडून माहिती घेऊन विंग कमांडर भांडारकर सर भेटले. सरांनी मेघनाची भेट घडवून आणली. अशी त्सुनामीची माळ गुंफत असताना डॉक्टर बोरसे सरांनी कमांडंट मिलिंद पाटील सरांची भेट घडवून आणली. या सगळ्यांनीच माझ्या लिखाणासाठी आपला अमूल्य वेळ देऊन अनुभव कथन केले. खरंतर हे थरारक अनुभव आणि त्यांच्या आठवणी काढल्यावर किती अस्वस्थ व्हायला होत असेल ते मला लिहिताना क्षणोक्षणी जाणवत होतं. कारण मी देखील ते अनुभव लिहिताना थांबून थांबून, मन शांत करून लिहीत होते.

या पुस्तकातली कोणतीच व्यक्तिरेखा केवळ ऐकीव माहितीवर लिहिलेली नाही.  



७. पुरस्कार मिळाल्यावर तुमच्या भावना काय आहेत?


हा पुरस्कार मला खरंतर अगदीच अनपेक्षित असा होता. माझ्यासारखी गृहिणी, वीस वर्षं महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे मराठी वाचन कमी, लेखन नाही. कित्येकदा तर घरचे सोडून मराठी बोलायला कोणी मिळायचे नाही. अशा परिस्थितीतून पुण्यात येते, मनातलं शब्दबद्ध करायला सुरुवात करते, एकदम पुस्तक लिहिण्याची झेप घेते आणि त्या पुस्तकाला पुरस्कार मिळतो, हे सगळं माझ्यासाठी एक सुंदर स्वप्न आहे जे आता सत्यात उतरलंय. फार भारावून गेले मी.  

निकोबार बेटांची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावी अशी माझी पहिल्यापासून प्रामाणिक इच्छा होती. त्यासाठी मी शाळा शाळांमध्ये जाऊन दृकश्राव्य कार्यक्रम करायचे ठरवले होते. पण सध्याच्या बंदिस्त जगण्यामुळे त्यावर निर्बंध आले. माझा हा उद्देश एखादा पुरस्कार जरा जास्त लवकर करेल. आश्चर्य म्हणजे ज्यादिवशी पुरस्कार जाहीर केला त्या दिवशीच मला आभासी दृकश्राव्य कार्यक्रम करण्यासाठी विचारणा केली गेली. एक कार्यक्रम ०८ जुलैला अतिशय उत्तमप्रकारे पार पडला आणि दूसरा २२ जुलैला आहे. 

पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते वाचून अनेक अनोळखी वाचकांचे फोन येतात. पुस्तकाबद्दल भरभरून बोलतात ते ऐकून मी केलेल्या श्रमाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. महाराष्ट्रातून नाही तर भारताबाहेरून पण मंडळी कळवतात. नुकताच बहारीनवरुन सुंदर अभिप्राय आला. 

विशेष म्हणजे साहित्यातले दिग्गज जेव्हा आवर्जून फोन करून कळवतात तेव्हा मला एखाद्या पुरस्काराइतकीच मोठी गोष्ट वाटते. विशेषतः विणाताई गवाणकर यांनी फोनवरून लिखाणाचं कौतुक केलं, पुढील लिखाणाला प्रोत्साहन दिलं. तसंच विणाताई देव भरभरून पुस्तकाबद्दल बोलल्या. विशेष उल्लेख करावा अशी व्यक्ति म्हणजे, विज्ञानाधिष्ठित निसर्गलेखन करणारे, गड किल्यांवर भ्रमंती करून त्यावर सत्तरहून अधिक पुस्तके लिहिणारे प्रसिद्ध व्याख्याते, वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक, प्र. के. घाणेकर सर खास मला घरी येऊन भेटून दोन तास पुस्तकाबद्दल बोलत राहिले. या सगळ्यांची माझ्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप मला मिळालेल्या पुरस्काराइतकीच मोलाची वाटते मला. 




८. भविष्यात आणखी काही लेखन करण्याचा तुमचा मानस आहे का???


अर्थातच. लेखन सुरू आहेच आणि आता पुस्तकाला पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी जास्त वाढल्याची जाणीव होतेय. माझं लेखन सध्यातरी माझे अनुभव, मला भेटलेल्या विशेष व्यक्ति आणि मी पाहिलेली पर्यटन स्थळे यावर असते. मला एक पुस्तक, 'सामान्य गृहिणीला आलेले असामान्य अनुभव' असं लिहायचं आहे कारण प्रत्येक राज्यात असे कितीतरी अनुभव आम्हाला आलेत ते इतर एकाजागी स्थायिक असलेल्या लोकांना येत नाहीत.  

सध्या मी आणि माझी मुलगी आरोही, आम्हा दोघींचा जीवन प्रवास लिहित आहे. खाचखळग्यांचा आमचा प्रवास आम्हीच सुखकर करून कशा समाधानी आहोत हे मला काही नैराश्यग्रस्त विशेष मुलांच्या पालकांना सांगावं असं वाटतं. तसंच सामान्य मुलांचे पालक देखील कित्येकदा मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात त्यांच्यासाठी पण हे पुस्तक डोळ्यात अंजन घालणारं असणार आहे.  समाजाची दिव्यांगांकडे बघण्याची दृष्टी बदलावी म्हणूनच मी आरोहीची कहाणी लिहीत आहे. ‘निकोबारची नवलाई' प्रमाणेच वाचकांना आमची ही कहाणी नक्कीच आवडेल अशी आशा करते. 




राजेश्वरी किशोर  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...