ती_कोण?
काल बाबांशी बोलताना कळलं, "अगं भिकु काका गेले. खूप दिवसांपासून आजारी होते. आजाराचं नेमकं निदान होत नव्हतं. मुलगी उर्मिला आपल्या नवर्याबरोबर अमेरिकेत गेली. मुलगा सून त्यांच्याबरोबर रहात होते पण मुलीच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे. सध्याच्या करोनाच्या काळात मुलीला पण इकडे येता आलं नाही. वय पण फार नव्हतं, जेमतेम पंच्याहत्तर असेल."
माझे वयाची नव्वदी पार केलेले बाबा सांगत होते.
ऐकल्यापासून माझ्या डोळ्यासमोर भिकुकाकांच्या बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवू लागले.
सदाशिव काका देसाई गावतलं एक बडं प्रस्थ. भरपूर बागाईत शेती. मोठा चौसोपी वाडा. मागे परसात गाई म्हशींचा गोठा. घरचीच जीवा शिवाची बैल जोडी. वाड्याच्या अंगणात आमराईत लावलेली देखणी बैलगाडी. कित्येकदा आम्ही सुट्टीत गेलो की त्या तिरक्या उभ्या केलेल्या गाडीवरून घसरगुंडी खेळायचो. सदाशिवकाकांना चार मुलं. सर्वात मोठे भिकुकाका. ऊंचेपुरे, गोरे, सरळ नाक, कुरळे केस, डोळे बोलके असल्याने देखणे होते अगदी. कोणालाही पहाताच भुरळ पडेल असे. पदवीधर झाले आणि पंचायत समितीत नोकरीला लागले. त्यांचे दोन भाऊ कमी शिकले आणि घराची शेती पाहू लागले. चौथा भाऊ सहकारी बँकेत लागलेला. दोघेजण गाव सोडून शहरात आलेले. आमची गावातली शेती पण त्यांचे भाऊच बघायचे. त्यामुळे घरी सगळ्यांचंच येणं जाणं असायचं. सुट्टीला आंबे खायला, उसात मधे मधे लावलेले हरबरे, ओल्या शेंगा खायला, गरम गरम बनत असलेला गूळ गुर्हाळात काहिलीशेजारी बसून काठीला गुंडाळून खायला मजा यायची. अवीट गोडीचं लॉलिपॉप होतं ते. सगळ्या सगळ्या आठवणी ताज्या होऊ लागल्या.
भिकु काकांची मुलगी उर्मिला कायम ताई ताई करून माझ्या मागे असायची. उर्मीलाची आठवण आली आणि मला ती घटना एकदम आठवली.
भिकुकाकांचं लग्न उमा काकूशी झालं आणि त्यांनी आमच्या जवळच रहायला घर घेतलं. उमाकाकू पण नावाप्रमाणे नाजुक देखणी होती. विशेषतः तिचा आवाज फार गोड होता. गावाकडची गाणी पण ती फार छान म्हणायची. कायम माझ्या आईकडून नवीन नवीन पदार्थ शिकायची आणि करून आम्हा मुलांना खायला द्यायची. मुलांच्यात अगदी रमून जायची. पण तब्येतीने मात्र जरा नाजुकच होती. लग्न होऊन दीड दोन वर्षं झाली असतील आणि तिला दिवस गेले. सुरुवातीपासूनच तिला ते बाळंतपण त्रासदायक झालं आणि त्यातच ती आणि न जन्मलेलं बाळ सगळ्यांना सोडून गेले. वर्षभर भिकुकाका सैरभैर झाले होते. ना खाण्याची शुद्ध ना कामाची. नेहमी टीपटॉप रहाणारे काका एकदम गबळ्यासारखे राहू लागले. कामात लक्ष देईनासे झाले. हातातली कामं वेळेवर होत नाहीत म्हणून साहेबांची ओरडणी बसू लागली. मात्र संध्याकाळ झाली की न चुकता बाबांना भेटायला यायचे. बर्याचदा शांत बसून असायचे, कधीतरीच मनातलं बोलायचे. एकदिवस त्यांचे वडील सदाशिव काका बाबांना भेटायला आले. त्यांच्या माहितीतली एक मुलगी स्थळ म्हणून घेऊन आले होते. भिकु काकांची समजूत बाबांनी घातली आणि दुसर्यांदा भिकुकाका बोहोल्यावर चढले. लीलाकाकू गोरी असली तरी दिसायला कशीतरीच होती. नाक बसकं होतं, गालावर कपाळावर देवीचे वण उठून दिसत होते. डोळे बारीक होते आणि विशेष म्हणजे आवाज एकदम घोगरा होता. पहिल्या देखण्या उमाकाकुला बघायची आम्हाला सवय झाली होती पण ही लीला काकू काकांशेजारी उभी राहिली की अगदीच विजोड दिसायची. स्वभावाने मात्र खूपच शांत आणि कामसू होती. तब्येतीने दणकट/थोराड असल्याने भराभर कामं करायची. तिचं बोलणं मात्र अगदीच खेडवळ वाटायचं आम्हाला.
लग्नाला जेमतेम दोन महिनेच झाले असतील आणि काका घरी आले. बाबांशी काहीतरी गंभीर बोलत होते. आम्हाला नीटसे ऐकू येत नव्हते आणि आम्हाला त्यात फार रस देखील नव्हता. बाबांनी त्यांना काहीतरी उपाय सांगितला आणि ते निघून गेले. दोन दिवसांनी पुन्हा भिकुकाका आले. परत दोघांची खलबतं सुरू झाली.
ते गेल्यावर बाबा आईशी बोलत असताना कळलं की, रात्री झोपल्यावर लीला काकू झोपेतच बडबड करायची. ती काय बोलली हे तिला सकाळी उठल्यावर कळायचे नाही, लक्षात नसायचं पण ती जेव्हा झोपेत बोलायची तेव्हा तिचा आवाज अगदी उमाकाकू सारखा असतो असं भिकुकाका सांगायचे. कधी ती तिच्या आवडीचं गाणं गुणगुणायची किंवा कधी घरच्यांच्याबद्दल बोलायची. मला सोडून जाऊ नका, मला जवळ घ्या म्हणायची. काका हलवून लीलाकाकुला जागं करायचे तेव्हा ती तिच्या घोगर्या आवाजात बोलायची आणि तिला काहीच माहीत नसायचं. बाबांनाही हा असा अनुभव पहिल्यांदाच ऐकायला मिळत होता. आत्मा असतो किंवा अंगात येणं यावर कधी विश्वास नसल्यामुळे ही घटना खरी असेल असं सुरूवातीला वाटायचं नाही. भिकुच्या मनाचे खेळ आहेत असं बाबा म्हणायचे. पण मग दर दोन तीन दिवसांनी भिकुकाका सांगायचे आणि ते नावंनाव घाबरलेले दिसू लागले.
बाबा एकदिवस त्यांना म्हणाले, "घाबरून जाऊ नका, विचारा तिला, तू तर मला सोडून गेलीस, आता माझं आयुष्य का खराब करते आहेस? का माझ्या आयुष्यात विष कालवते आहेस? तुला माझ्याकडून पाहिजे तरी काय आता? तू म्हणशील ते मी करतो पण असं रोज रात्री माझ्यासमोर येत जाऊ नकोस."
कितीतरी दिवस तर भिकु काका घाबरून काही बोलू शकले नव्हते. पण मग एक दिवस धीर करून ते तिच्याशी बोलले. दुसर्या दिवशी बाबांना जरा खुशीतच येऊन सांगत होते.
"मी बोललो उमाशी, तिने पण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं. पण तिची मागणी मात्र मला पूर्ण करणं जमत नाहीये."
"काय म्हणतेय ती? तिला काय पाहिजे?" बाबा विचारत होते.
"तिला माझी मुलगी म्हणून पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मगच मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणाली."
"इतकंच ना मग काय हरकत आहे?"
"माझं हे दुसरं लग्न माझ्या मनाविरुद्ध झालंय हो, मला लीला आजिबात आवडत नाही. इतके दिवस झाले तरी मी अजून तिला हात देखील लावलेला नाही. कोणत्याच गोष्टीत ती माझ्या अपेक्षेप्रमाणे नाहीये. स्वयंपाक आणि कामं नीटनेटकी करते इतकाच काय तो गुण आहे तिच्याकडे."
त्या काळात म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी सहचर आवडला नाही म्हणून सोडून देण्याचे विचार कोणाच्या मनाला शिवलेले देखील नव्हते. आवडत नाही म्हणून सोडून दिलं असं कधी होत नव्हतं.
बाबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि भिकु काकांची ते समजूत घालू लागले. माझे बाबा एक चांगले समुपदेशक आहेत त्यामुळे गावातले कित्येकजण त्यांच्याकडे अडचणी घेऊन यायचे हे आम्ही लहानपणापासूनच बघत आलेलो आहोत. तसं त्यांनी भिकु काकांना पण व्यवस्थित समजावले. किती पटलं, पटलं की नाही ते कळलं नाही पण वर्षभरातच लीलाकाकूला एक गोड मुलगी झाली. काकांनी हौसेने तिचे नाव उर्मिला ठेवले आणि घरात ते तिला उमा म्हणून हाक मारायचे. उर्मिला अतिशय नाजुक देखणी होती. गोड बोलायची आणि लहानपणापासूनच गोड गायची. तिच्यानंतर काकुला एक मुलगा पण झाला.
मधेच कधीतरी बाबांनी एकदा, 'उमाकाकू पुन्हा बोलायला आली होती का?' असं विचारलं पण होतं. पण काकांनी नकार दिला. उर्मीलाच्या जन्मानंतर तिचा आवाज मी कधीच ऐकला नाही म्हणायचे.
उर्मिला चांगली शिकली. नवरा देखील तिला अगदी मनासारखा मिळाला. ती पण त्याच शहरात असल्यामुळे भिकुकाकांना नेहमीच भेटायला यायची. सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि अचानक उर्मीलाच्या नवर्याला परदेशी जायची संधी मिळाली. काही वर्षं त्यांच्या प्रगतीत, कौतुकात निघून गेली. पण गेली दोन वर्षे उर्मिलाला भारतात यायला जमलं नाही. फोनवर बोलणं व्हायचं पण आता आपल्याला उर्मिला कधीच भेटणार नाही या निराशेच्या गर्तेत भिकुकाका खचून गेले. उर्मीलाचा फोन यायचा तरी त्यात समाधान व्हायचं नाही, त्यांना तिच्या भेटीची ओढ लागली होती.
हे जग सोडून जाताना पण 'उमा उमा' म्हणतच गेले असं लीला काकू सांगत होती.
(पूर्वी घडलेल्या या घटनेचा विचार केला की मला अनेक प्रश्न पडतात, नेमकं काय झालं असेल? काकांच्या मनातलं उमाकाकूवरचं प्रेम सारखी तिची आठवण करून देत असेल की अनिच्छा असली तरी संसारात पुन्हा पडलं पाहिजे हे मनातले विचार त्यांच्या मनात असे वादळ निर्माण करत असेल? खरंच लीला काकू उमाकाकुच्या आवाजात बोलत असेल की काका हे सगळं स्वप्नात पहात असतील? उर्मीलाचा जन्म झाल्यावर समाजाला म्हणायला त्यांचा संसार सुखाचा दिसला की खरंच काका संसारात फारसे रमलेच नाहीत? समाजासाठी मात्र त्यांचा संसार सुखाचा होता हे नक्की.)
राजेश्वरी
२८/०९/२०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा