#राजेश्वरी_किशोर
#टीव्हीची आठवण
#ललित
"हॅलो, राजेश्वरी, अल्पना बोलतेय."
"नमस्कार डॉक्टरीण बाई. बोला. आज कशी काय या मैत्रिणीची आठवण झाली?"
"आज तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. अग, मुलीचं, अभयाचं लग्न ठरलं."
"अरे वा. दोघींचे मनापासून अभिनंदन. कुठला मुलगा?"
"मुलगा पुण्यातलाच. इंजीनियर आहे. सिंबायोसिस जवळ त्यांचं घर आहे. साखरपुडा आम्ही केला आता लग्न ते करणार आहेत. हॉटेल श्रेयस मध्ये."
"वा. मस्तच.."
"ऐक, लग्न सात जानेवारीला आहे. आपली पन्नास माणसं असणार आहेत आणि त्यात तू आहेस. नक्की लग्नाला यायचं आहेस."
"नक्की येईन. खूप छान वाटलं अभयाचं लग्न ठरल्याचं ऐकून. भेटू लवकरच."
फोन बंद केला तसा किशोर म्हणाला, "ही तीच ना ग अभया, जीनी आपल्या टीव्हीवर प्रेम केलं होतं?"
"आठवला तुला तो प्रसंग?"
"मग काय? असा कसा विसरू आपण तो? आठ दिवस पण झाले नव्हते नवीन टीव्ही घेऊन."
चोवीस, पंचवीस वर्षांपूर्वीचा तो प्रसंग झर्रकन माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. आम्ही आमच्या बजेटपेक्षा जरा जास्तच किमतीचा ओनिडा टीव्ही घेतला होता. बाकीच्या मानाने नैसर्गिक रंगात चित्र दाखवणारा म्हणून सोनी आणि ओनिडा टीव्ही त्यावेळी सर्वोत्तम होते. घरी टीव्ही आणून आठच दिवस झाले होते. त्यादिवशी रविवार होता म्हणून सकाळी सात वाजल्यापासून नवीन टीव्हीवर सगळे कार्यक्रम बघत कामं सुरू होती. त्यावेळी फोन प्रकार इतका प्रचलित नसल्याने कोणीही कधीही कुणाच्याही घरी जात असत. तसे अल्पना, तिचे आईवडील आणि तीन साडेतीन वर्षांची अभया असे चौघं जण सकाळी दहा वाजताच घरी हजर झाले. अभया छान फ्रिलचा फ्रॉक घालून पायातले छुम छूम वाजवत तुरुतुरु घरभर फिरत, बागडत होती. छान गोडगोड बोलत होती..
अल्पना आली म्हणजे दिवसभर असणार हे गृहीत धरून मी सगळा स्वयंपाक केला. किशोरने जेवणात गोड काहीतरी असावं म्हणून श्रीखंड आणलं. आजी आजोबा आणि अभयाचं जेवण झाल्यावर ते तिघं बाहेर टीव्ही बघत बसले आणि आम्ही तिघं आत जेवायला. टीव्हीवर काहीतरी बघून अभया आत आम्हाला सांगायला यायची आणि जाताना तळहातावर एक चमचा श्रीखंड घेऊन जायची. मी अल्पनाला कितीतरी वेळा म्हणलं की तिला वाटीत श्रीखंड घालून देते ती बाहेर बसून चमच्याने खाईल. पण अल्पनाला वाटलं, 'उगाच कशाला भांडी घासायला वाढवायची, खाऊ दे तशीच तिला.' मग मीही गप्प बसले. हो, कारण भांडी मलाच घासायची होती ना.
आमचं जेवण सुरू असेपर्यंत अभया कमीत कमी दहा पंधरा वेळा तरी तळहातावर श्रीखंड घेऊन चाटत चाटत गेली. आमच्या बरेच दिवसांच्या गप्पा सुरू होत्या. अखेर जेवण झाल्यावर सगळेजण मस्तपैकी सतरंजी टाकून गप्पा मारत आडवे पडलो. संध्याकाळी चहा पिऊन मगच अल्पना आणि कंपनीने टाटा बाय बाय केलं..
दिवसभराचं काम आणि गप्पा यात मी थकून गेले होते. रात्री निवांतपणे टीव्ही बघत जेवण करू म्हणून मी टीव्ही लावला.. आणि काय? बापरे! चित्र बघून मी ओरडलेच.. नैसर्गिक रंगात दिसणारे चित्र जावून स्क्रीनला पांढर्या रंगाचे फटकारे ओढले असल्यासारखे दिसत होते आणि त्याच्या मागे थोडं थोडं चित्र दिसत होते..
"किशोर असा काय दिसतोय टीव्ही? याला काय झालं?"
"मला काय माहीत? याला पांढरा रंग कोणी लावला?"
लांबून काहीच कळत नाही म्हणून टीव्ही बंद करून आम्ही जवळ बघायला गेलो.
सहा सात वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे टीव्ही दुरुस्त करणारी मी असा चित्राचा दोष प्रथमच पहात होते.
जवळ गेल्यावर टिव्हीला येणारा आंबट गोड वास आम्हाला बरच काही सांगून गेला..
अभयाने दुपारी टीव्ही वरील कार्यक्रम चालू असताना त्यातल्या प्रत्येक पात्राला रंगपंचमीचा रंग म्हणून तळहातावरचं श्रीखंड लावलं होतं..
तिच्या बालमनाने तिचा विरंगुळा शोधला होता.. आजी आजोबांचं दूरदर्शनवरील कार्यक्रम मनोरंजन करत होते आणि त्यामुळे आम्हा मैत्रिणींना मनसोक्त गप्पा मारायला मोकळा वेळ मिळाला होता..
नंतरचा तब्बल तासभर तरी आम्ही नवीन टिव्हीला पुसून पुसून कुरवाळत साफ करण्यात घालवला, अगदी स्पीकरच्या जाळीत अडकलेले श्रीखंड देखील टाचणीने टोकरून टोकरून हळुवारपणे साफ करावं लागलं होतं.....
आज अभयाच्या लग्नाचा फोन आल्यावर तो नवीन टीव्ही आठवला...
राजेश्वरी
22/11/2020
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा