भेट_बकुळीची
वाड्याच्या दिंडी दरवाजातून, भला मोठा उंबरठा ओलांडून आत शिरतांना,
घरात जाण्यापूर्वीच त्याचं दर्शन होतं...
नजर खालपासून वरपर्यंत जाते, आणि त्याचं अस्तित्व माहेरी पोचल्याचं समाधान देऊन जातं...
वातावरणातील त्याची दरवळ,, श्वासाबरोबर आलेला त्याचा मंद सुवास,,, हवाहवासा वाटणारा गारवा, मनाला मोहून टाकतो..
तसंच झालं माझ्या या कराड भेटीत.. खूप दिवसांनी त्याला भेटले.. त्याला निरखत राहिले.. इतकी वर्षं झाली तरी काहीच फरक पडला नाही त्याच्यात.. ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय झालं तरी देखील अजूनही तसाच उभा आहे तो.. सदाहरित, फळाफुलांनी लगडलेला.. माझा आवडता ‘बकुळीचा वृक्ष’..
यावेळी, तो जरा जास्तच फुलला होता, असं सगळ्यांनी सांगितलं.
हो,, कारण घरी फोन केला की, बाकीच्यांच्या तब्येतीबरोबर त्याची पण आठवण निघतेच की..
रोज सकाळी फुलांचा सडा पायघड्या घालायचा म्हणे.. त्यामुळेच यावेळी मला मात्र तो फळलेला भेटला.. त्याची ती हिरवी, केशरी-लाल फळं म्हणजेच बकोळ्या पहायला, खायला मिळाल्या..
वाड्यात गेल्यावर त्याच्याखालून इकडून तिकडे जातांना प्रत्येकवेळी जुन्या, शाळेतल्या आठवणी जाग्या होत गेल्या…
लांबसडक काळ्याभोर केसांच्या,, काळ्या रिबिनीची फुलं घालून वर बांधलेल्या दोन वेण्या,, आणि त्यावर तितकेच लांब बकुळीचे चार पदरी गजरे घालून मी शाळेत जायचे. कधी कधी मैत्रिणींना देखील गजरे करून न्यायचे किंवा माझ्याच डोक्यातले गजरे काढून, त्याचे तुकडे करून मैत्रिणींना वाटायचे. बाकीच्यांच्या डोक्यातले गजरे पाहून मलाही आनंद व्हायचा. समोर कंटाळवाणा तास सुरू असायचा आणि आम्ही मात्र कानामागून गजरा नाकाजवळ घेऊन हुंगत असायचो...
कधी शिक्षकदिनाला, बाकीच्या मुली गुलाबाची फुले द्यायच्या,, तर मी मात्र बकुळीचा गजरा करून द्यायचे. बाई एकदम खुश...
गर्ल्स गाईडची वर्षातून एकदा ‘खरी कमाई’ करून दाखवायची असायची, त्यावेळी हमखास बकुळीला बहर आलेला असायचा आणि त्याचे गजरे पाच पैशाला एक असे विकून माझी खरी कमाई पुरी व्हायची...
त्याकाळात माझी/माझ्या बहीणींची ओळख म्हणजे, ‘बकुळीचं झाड असलेल्या वाड्यात रहाणारी’ अशीच असायची..
कधी कोणी खोकल्यावर उपाय करायला/काढा करायला फुले वेचून घेऊन जायचं तर कोणाला दंतमंजन करायला बकुळीची साल लागायची.. . आमच्याकडे राजा रविवर्माने काढलेल्या सरस्वती आणि प्रसिद्ध राम लक्ष्मण सीता यांच्या पेंटिंगच्या भव्य फ्रेम कित्येक वर्षांपासून भिंतीवर विराजमान आहेत. दरवर्षी बकुळीचा बहर आला, की रविवारी दोन्ही फ्रेमना बकुळीचे मोठे चौपदरी हार करून घालायचं मोठं काम आम्हा बच्चेकंपनीला करायचं असायचं. बहर संपला आणि कोणी खोकल्यासाठी फुले मागायला आलं तर बाबा त्यांना ते हार काढून द्यायचे...
एक प्राथमिक शिक्षक, तर दर वर्षी येऊन बकुळीची छोटी छोटी रोपटी घेऊन जायचे. त्यांच्या गावात त्यांनी बर्याच ठिकाणी, ती रोपं लावून परिसर हिरवा गार केलाय..
घरी गेलं की, मला त्याच्याकडे बघतांना या सगळ्या आठवणी येत रहातात. सुट्टीच्या दिवसातले आमचे ते दुपारचे सगळे खेळ, उद्योग या झाडाने पाहिलेत. तब्बल तीन पिढ्या क्रिकेट खेळतांना विविध बॉलचे किती फटके याने खाल्लेत त्याची गणतीच नाही..
लपाछपी खेळतांना राज्य घ्यायला याच झाडामागे जायचं आणि डू;ए बंद करून १०,२०,३०... म्हणायचे...
कडाक्याच्या थंडीत आईने वाडा झाडून पेटवलेल्या शेकोटीची ऊब घेत बसणं आठवलं की, आठवतात, ती त्याची करकरीत पाने जळतांना होणारी त्यांची तडतड आणि पापड भाजतांना पापडाला जसे फोड येतात ना, तसे याच्या पानांवर येणारे फोड... अर्धवट जळणारे पान मग अलगद बाहेर काढून त्याला येणारे फोड बघत बसायला गंमत यायची.
आणि आमचा सर्वात आवडीचा खेळ म्हणजे याच्या हिरव्यागार पानांच्या पिपाण्या बनवायच्या... पान हातात घ्यायचे, त्याचा शेंडा थोडासा खुडायचा, आणि मग त्याची विडीप्रमाणे बारीक गुंडाळी करायची, तोंडात घालायचे टोक थोडेसे दाबून चपटे करायचं, आणि मनापासून फुंकायचं. प्याँss प्याँss प्याँss आवाज करून एकमेकांना बोलवायचं. मग आमची स्पर्धाच लागायची जणू, कोणाची पिपाणी जोरात वाजते याची. कोणाची अगदीच फुसकी निघायची, तर कोणाची जोरदार, कर्कश्य वाजणारी. सगळी गुंडाळण्याची आणि फुंकण्याची कमाल असायची. अतिरेक झाला की मग मोठ्यांची ओरडणी पण खायला लागायची कारण त्यांची झोपमोड आम्ही केलेली असायची ना. या पिपाण्यांच्या पुढे, जत्रेतली पिपाणी आम्हाला आजिबात आवडत नसे...
प्रत्येक रंगपंचमीला, वाड्याच्या हौदात केलेल्या रंगाने तर, हा बकुळ आमच्या बरोबर चिंब भिजायचा.. होळी मात्र त्याला त्रास होऊ नये म्हणून त्याच्यापासून लांबच असायची...
बकुळीच्या बियांचा एक बैठा खेळ, लहानमोठे आम्हा सगळ्यांना तासंतास एकत्र खिळवून ठेवायचा. तो म्हणजे, बकुळीच्या बिया एकत्र जमा करून त्याचा ढीग करायचा. एकाने फुंकर मारून तो ढीग पसरवायचा आणि बाकीच्या बियांना धक्का न लावता एकेक बी अलगद बाजूला काढायची... जो जास्त बिया काढेल तो विजयी.
आत्ता कळते की, या खेळामुळे एकाग्रता वाढायला किती मदत झाली असेल ते.
बकुळीचं एक मात्र आश्चर्य वाटायचं... शेजारच्या रामफळाच्या, चाफ्याच्या झाडाची सगळी पाने गळून गेली तरी याची पाने जितकी गळणार तितकीच आधी झाडावर भरलेली असणार. याला आम्ही कधीच निष्पर्ण झालेले बघितले नाही..
याचा कधीकधी राग देखील यायचा कारण याच्या सावलीमुळे आमच्या आवडीची गुलाबाची किंवा इतर कोणतीच फुलझाडे आमच्या वाड्यात तग धरत नसत. जास्वंदी मात्र पुरेपूर बहरायची.
बकुळीच्या खोडावर मनीप्लांटने मात्र कित्येक वर्षे आपली उपजीविका केली होती. आणि त्याची पाने तर किती मोठी, अगदी अळूच्या पानांइतकी. पण नंतर त्याला काढून टाकावे लागले...
मुलांना झाडावर चढण्याचा व्यायाम करायला हमखास बकुळीचे झाड आवडायचं. वर चढून फांद्यांच्या बेचक्यात बसून झाडावरच्या बकोळया तोडून आम्हाला दाखवत खायला त्यांना भलतीच मजा यायची. मग उतरतांना काही बकोळया आमच्यासाठी पण घेऊन यायचे.
बकुळीची फुलं वेचतांना काहीवेळा त्यात मुंग्या शिरलेल्या असायच्या, आणि झाडावर मधमाश्या असायच्या. त्याचं कारण माहीत नव्हतं.. एकदा फुलांमध्ये साखरेचे 2,3 कण असतात याचा आमच्यातल्या एकाला शोध लागला. मग काय सकाळी उठून फूल खाली पडले की, लग्गेच फाडायचे आणि आतली साखर जिभेने चाटायची हा आम्हाला छंदच लागला होता.
दिवसातला जास्तीतजास्त काळ आम्ही या झाडाच्या सानिध्यात घालवलाय. परीक्षेच्याकाळात तर याने आमचा अभ्यास/वाचन देखील सहन केलंय. एप्रिलमध्ये परीक्षेच्या काळात झाडाखाली मांडी ठोकून अभ्यास करत बसलं की पंख्याची देखील उणीव भासायची नाही...
काय सांगू आणि काय नको असं झालयं अगदी...
खूप दिवसांनी जावून आले की अश्या सगळ्या आठवणी मनात फेर धरून नाचायला लागतात,
बकुळीची आठवण येते आणि वसंत बापट यांचं गाणं कानात गुंजत रहातं ...
या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी झूला झुले
इथेच माझी बाळपाऊले दंवात भिजली बालपणी
दूरदेशीच्या युवराजाने इथेच मजला फूल दिले
तिने आसवे पुसली माझी, हृधयामधला गंध दिला
चांदण्यातले सोनकवडसे माझ्यासाठी अंथरले
बकुळी माझी सखी जिवाची जन्मांतरीचे प्रेम जुने
तिला पाहता खुलते मी अन मला पाहता तीही खुले
खरंच, किती साम्य आहे ना हे गाणं आणि माझं बालपण यात...
धन्यवाद
राजेश्वरी
०६/०२/२०२०





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा