बोर्रा_केव्ह्स_आराकू_व्हॅली
वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई
आजुबाजूच्या पानांनी वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग मंत्रमुग्ध राई
फुलुनिया आली गडे बावरी तनू
दर्यांतुनी आनंदला पाणओघ नाचरा
आसमंत भारितो ग गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग इंद्राचे धनू
वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
सकाळी सकाळी रेडियोवर या सुमधुर गाण्याचे सुर कानावर पडत होते आणि त्या गाण्याबरोबर मी अशाच एका स्वप्नवत जगात सैर करायला निघाले..
निसर्गाची अद्भुत किमया पहायला मिळणारं ठिकाण.. निसर्गाचं असाधारण दर्शन होतं तिथे..
आराकू व्हॅली आणि बोर्रा केव्हस..
विशाखापट्टणम पासून अंदाजे शंभर किलोमीटर उत्तरेकडे..
विशाखापट्टणम पासून रेल्वेने निघालो तर अंदाजे ८५ पूलांवरून आणि ५६ बोगद्यांमधून गाडी बाहेर पडली की आपण त्या अद्भुत दुनियेत उतरतो.. रेल्वेचा प्रवास म्हणजे काहीकाळ तर उजेड आणि अंधाराचा लपंडाव सुरू असल्यासारखा वाटतो कारण वळणावळणांच्या रस्त्यात लहानमोठे बोगदे येत रहातात.. आणि पूलावरून गाडी जातानाचा खडखडाट सुरू असतो तेव्हा आजूबाजूला दर्याखोर्यांचे हिरवेगार चढउतार... अगदीच अवर्णणीय...
पण मला मात्र स्वतःच्या गाडीतून रस्त्याने जायला जास्त आवडायचं..
विशाखापट्टणमला असताना घरातून निघाल्यावर साधारण दोन तास प्रवास केल्यावर अनंतगिरीच्या डोंगररांगात गाडी पोचायची...
तिथे पोचताच आपोआपच आपण उद्गारतो ... आहाहा...
दोन्ही बाजूंनी असलेले कॉफीचे मळे आपलं लक्ष वेधून घेतात.. गाडीला आपसूकच ब्रेक लागतो आणि आपण खाली उतरतो.. या कोनातून, त्या कोनातून तर कधी रस्त्याच्या वळणाबरोबर कॉफीच्या मळ्यात, मळ्याच्या बाहेर फोटो काढायला सुरुवात होते.. कधी चढावर तर कधी उतारावर... गडद हिरव्या रंगाची पानं असलेली कॉफीची रोपं आपल्या चेहर्यावर आणि मनावर सुखद फुंकर घालतात जणू.. जसं कॉफी पिल्यावर तजेला येतो ना? तसं तिथे वळणावळणावर आपल्याला प्रत्यय येतो.. कधी आपण घाट माथ्यावर चढलेलो असतो आणि खालच्या दरीतून दिमाखात जाणारी रेल्वे दृष्टीस पडते.. हिरव्यागार परिसरातून वळण घेत जाणारी गाडी बघायला मजा येते..
साधारण तासभर अश्या घाटातून जात असताना समोरच्या काही डोंगरावर मोठाले अचानक आरसे बसवलेला भास होतो.. सूर्य किरणांमुळे ते एकदम चकाकताना दिसतात.. शंका येते मनात, हे छोटे धबधबे तर नाहीत? मग नंतर कळते की ते आरसे किंवा धबधबे नसून डोंगरातले अभ्रकाचे खडक आहेत .. गंमत आहे ना? हिरव्यागार डोंगरात मध्येच चकाकणारे अभ्रकाचे स्फटिक असलेले खडक. जणू हिरवाईने नटलेल्या धरतीला आपलंच देखणं रुपडं पहायला आरसे तर बसवले नसतील?
पाऊस सुरू असेल तर काही ठिकाणी खळाळणारे पाण्याचे प्रवाह देखील लक्ष वेधून घेतात बरं का. मोकाट सुटलेल्या वासरासारखे इकडून तिकडून उंडारणारे ते झरे नजर वेधून घेतात...
गाडी जसजशी पुढे जाऊ लागते तसतसे आराकू व्हॅलीचा सुंदर नजारा दृष्टीस पडतो.. घाटातला वळणदार रस्ता आणि दोन्ही बाजूंनी केशरी पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेले ताटवे... अगदी बघतच राहावं असेच..
गाडीतून पटकन उतरायचं.. मस्तपैकी मंत्रमुग्ध होऊन.. हात फैलावून.. वाह वा!! म्हणत असतांनाच सहचराने ते दृश्य कॅमेर्यात टिपावे.. मग अजून काय पाहिजे? हो ना..
ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान इथे फिरायची मजा काही औरच.. थोडीशी बोचरी थंडी.. काळाभोर रस्ता.. दोन्ही बाजूंनी हिरव्यागार वनराईवर आलेली केशेरी पिवळी डोलणारी फुलं.. निळेशार आकाश.. आणि या सगळ्याच्या मधोमध आपण उभे.. नजर जाईल तिथपर्यंत असाच नजारा...
wow.. अप्रतिम.. आपण आपसूकच उद्गारणार...
पुढे वाटेत जाता जाता दिसते ते आदिवासी वस्तु संग्रहालय.. हॉटेल.. सुशोभित केलेली पद्मपुरम बाग.. त्या बागेत रहाण्यासाठी लाकडी बांधकाम असलेल्या खोल्या.. काही खोल्या तर मचाण असल्यासारख्या .. आणि आतून सर्व सोयींनी युक्त..
पण.. पण..
सध्या आपल्याला तिथे वेळ घालवायचा नाहीये.. आपल्याला निसर्गाची अजून मुख्य अद्भुत कमाल बघायचीय.. त्यासाठी अजून बारा चौदा किलोमीटर पुढे जावे लागते..
पुढे गेल्यावर गाडीतून समोर कमानीवर अक्षरे दिसतात ती BORRA CAVES...
या गुहांचा शोध १८०८ साली लागला..
आता इथे मात्र आपल्याला चालत फिरावं लागतं.. विशाखापट्टणम अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी म्हणजेच व्हुडाने (VUDA) या गुहांमध्ये फिरण्यासाठी सोयीच्या पायर्या, हात धरायला कठडे केलेले आहेत.. जवळपास तीनशे मीटरच्या आवारात पसरलेल्या या गुहा अंदाजे जमिनीपासून दोनशे मीटर खोल आहेत..
पायर्यांवरून उतरायला सुरुवात करत करतच डोक्यावर लक्ष जाते.. चुन्याच्या निवळीच्या टपकणार्या एकेक थेंबांनी लोखो वर्षांपासून सुरू ठेवलेली कलाकुसर दृष्टीस पडायला सुरुवात होते.. आपण उतरत जातो खाली त्याचवेळी छपरावरच्या जमिनीत होणार्या प्रक्रियांमुळे सगळीकडून एकेक थेंब झिरपत असतो.. कधी आपल्या अंगावर पण येतात..
पायाखाली ओल असल्याने जमीन जरा निसरडीच झालेली असते.. तोल सांभाळून एकेक पाऊल टाकत डोक्यावरची नक्षी बघत उतरत जायचं.. कधी त्यात चुन्याच्या निवळीने तयार झालेले झुंबर दिसेल तर कधी त्यात साधूच्या दाढीचा आकार दिसेल.. आपल्या बरोबर गाईड असेल तर तो आपल्याला शिवपार्वती, बाळ मांडीवर घेतलेली आई, मानवी मेंदूप्रमाणे रचना, मगरीचा आकार दाखवतो.. तर कुठे मंदिर, चर्च, मशरूमचे आकार पहायला मिळतात..
असे विविध आकार बघत आपण खाली खाली जात असतो.. बाहेरून येणारा सूर्यप्रकाश कमी कमी होत जातो.. आता तिथे रंगीत दिव्यांचा झगमाट करून टाकलाय.. ते थोडं कृत्रीम वाटतं पण त्यामुळे तिथले आकार नीट कळतात आपल्याला ..
या गुहांच्या शेवटी जातो तसं अगदी छोट्याश्या भोकातून येणारी सूर्यकिरणं लक्ष वेधून घेतात.. पुढे गोस्थानी नदीचा उगम आहे ती विशाखापट्टणमकडे वहाते..
या गुहांची माहिती कशी झाली ते गाईड सांगतात की, कित्येक वर्षांपूर्वी एक गुराखी गुरं चरायला गेला असताना त्याची एक गाय साठ फुट खड्ड्यात पडते.. गायीला शोधत शोधत तो आत जातो तर गाय आता जीवंत उभी असते, तिथे त्याला चुन्याच्या निवळीने बनलेला शिवलिंगाचा आकार दिसतो.. साक्षात भगवान शंकरांनी आपल्या गायीला वाचवलं असं समजून तिथे पूजा करतो.. तेव्हा पासूनच या गुहांना धार्मिक महत्व दिलं गेलंय.. गुहेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी शिव पार्वती मंदिर बांधलंय.. शिव पूजा करायला देखील लोक इथे येतात..
निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार आहे.. भारतात चुन्याच्या निवळीने तयार झालेल्या सर्वात मोठ्या गुहा या बोर्रा केव्हज आहेत..
या गुहा काय किंवा आराकू व्हॅली काय, बघता बघता आपण अचंबित होतो हे नक्की..
(गुहांच्या तयार होण्याच्या मागची शास्त्रीय माहिती नेटवर उपलब्ध असल्याने मुद्दामच लिहिली नाही.)
राजेश्वरी
११/०८/२०२०





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा