#राजेश्वरी_किशोर
#ललित
#कोळ्याचं_जाळं
“चला, सामान आवरायला घ्या आता. मिळालं आपल्याला दुसरं घर." त्याने ऑफिसमधून घरात शिरल्या शिरल्या तिला ही बातमी एकदम हर्षोत्फुल्ल आवाजात सांगितली..
यावेळी ती शांतच.. खरं तर कितीतरी दिवसांपासून ती या घराची वाट पहात होती.. पण पहिल्यासारखा उत्साह आता वाटत नव्हता. या घरात ती सरावली होती. पुन्हा सामान उचला, सामान उपसा, लावा आणि सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत दुसर्या ठिकाणी जायची तयारी करायची.. कंटाळा आलाय आता..
‘आपलं आयुष्य एका कोळ्यासारखं आहे का?’ तिला वाटू लागले. जसं, संयतपणे कोळी जाळं विणतो, त्यावर आपली उपजीविका सुरू ठेवतो आणि अचानक कोणीतरी ते तोडून टाकतं.. पाऊस वार्यासारख्या नैसर्गिक आपत्तीने त्याला आपलं बस्तान हलवायला लागतं.. किंवा अनाहूतपणे तयार केलेलं जाळं कोणी नाराजीने काढून टाकतं, त्यावेळी कोळ्याला पुन्हा नवीन जाळं विणावं लागतं..
ती विचार करते, एका स्त्रीच्या आयुष्यात अजून वेगळं काय असतं? तिने तरी वेगळं काय केलं?
जन्मल्यानंतर एकेक पाश जोडत जोडत जाळं तयार करत राहिली ती.. त्यात सगळ्याप्रकारचे पाश विणले गेले.. आईवडीलांच्या प्रेमाचे, भावंडांच्या खट्याळ मस्तीचे.. जवळच्यांच्या ममतेचे, अध्यापनातल्या गुरूंचे..
आयुष्याच्या सुरक्षिततेचे, अनुभवाचे.... अगदी भक्कम असं जाळं तयार झालं होतं ते. तीचं स्वतःचं, हक्काचं.. कधीच न तुटणारं... कधीच न उसवणार्या विणेचं..
हे पक्कं जाळं तयार झालं पण स्थिरावण्यापूर्वीच लग्नकरून दुसर्या जागेत गेली ती.. त्यावेळी तिथल्या आधीच पक्कं असलेल्या जाळ्यात आपले पाश गुंतवून अजूनच बळकट करायचा प्रयत्न करत होती.. कदाचित ते पाश एकात एक अडकल्यामुळे, पक्के होण्याऐवजी गुंताच होत गेला.. सावरायचा प्रयत्न करून देखील ते बळकट होऊ शकलं नाही.. एकेक पाश नव्यानं जोडून बघत असताना तुटतच गेले.. आता तिनं ते मान्य केलं की, हे जाळं जोडण्यात वेळ घालवून ऊपयोग नाही.. अलगद बाहेर पडली त्यातून.. चुकीच्या जागी विणलं जाळं तर ते तुटण्याचा संभव जास्त, हे पटलं तिला..
जागा बदलत, जाळं विणणं सुरूच असतं तिचं.. जाईल तिथं आजूबाजूचे पाश गोळा करून छान जाळं आकाराला येतं.. पहिली जागा सोडून दुसर्या जागी जाताना काही पाश बरोबर जातात तर काही तिथेच सोडून द्यावे लागतात.. काही पाश तोडताना अतीव दुःख होतं.. कायम जवळ हवेहवेसे वाटतात ते.. आताशा ती जुने पाश फार बरोबर घेऊन जात नाही.. नवीन पाश जुळवून घेण्याची कला जमली आहे तिला.. कदाचित नवीन पाश तितकेसे घट्ट विणतच नाही ती.. म्हणजे मग तोडताना त्रास होत नाही..
इतकं असलं तरी आपण विणलेलं पहिलं जाळं सुरक्षित आणि भक्कम आहे याची खात्री होती तिला..
कधीही त्या जाळ्यात गेलो तरी ते आपलंच असणार हे मनोमन जाणलं होतं..
पण काही दिवसांपासून तिला जाणवू लागलंय, काहीतरी बिनसलंय.. कुठे, कसं.. काही कळत नाही.. जणू अचानक एखादं वादळ यावं आणि त्या जाळ्याचे पाश तोडून टाकावेत तसं झालंय की काय असं वाटू लागलंय.. त्या जाळ्याला ठिगळ लावून त्याचा भक्कमपणा आता परत येणार नाही हे जाणवतंय तिला.. कितीही प्रयत्न केला तरी तुटलेले पाश दूर दूर जाताना दिसतात..
विचारात पडलीय ती.. येतील का परत जवळ? कसे आणायचे जवळ? का आधीच्या प्रत्येक सोडून आलेल्या पाशाप्रमाणे हे पण पाश आता सोडून द्यावेत?
खूप दिवसांपासून ही घालमेल मनातल्या मनात सुरू आहे..
परिस्थिती मान्य करून पुढे पाऊल टाकलं की मार्ग सापडतो, हे तत्व तिने अनुसरलं असलं तरी कधी नव्हे ते तिला आता त्रास होतोय..
आजकालच्या व्यावहारिक जीवनात अश्या तुटलेल्या पाशांबद्दल दुःख करत बसावं का? सगळं सोडून पुढे जाऊन नवीन जाळं विणण्यातली उर्मि का जागी होत नाहीये? गेलेल्या गोष्टीबद्दल का वाईट वाटतंय?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्नच...
सगळा गुंता तिचा तिलाच सोडवायचा आहे.. एकेक पदर वेगळे करून पुन्हा उसवलेली वीण घट्ट करायचीय तिला.. हातातून काहीच निसटू द्यायचं नाहीये आता..
“हॅलो, कुठे हरवलीस? सांग सगळ्यांना फोन करून, नवीन मोठं घर मिळतेय.. एकदम ऐसपैस.. बोलाव सगळ्यांना.. धम्माल मस्ती करू पूर्वी सारखी..”
उत्तर सापडल्यासारखी समाधानाने उठते ती...
पुन्हा नवीन जाळं विणायला, जुनं जाळं भक्कम करायला..
राजेश्वरी
२३/०९/२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा