#राजेश्वरी किशोर
#मला उमगलेली संतवचने
कट्ट्यावर खूप छान छान, अभ्यासपूर्ण लेख आलेत. सगळ्यांचे उत्साह बघून मला पण काहीतरी लिहावे असं वाटू लागलं. विचार सुरू झाले पण काही केल्या कोणताच संत आजपर्यंत माझ्या आयुष्यात डोकावलेला आढळला नाही. 'संत वचने' म्हणजे तरी काय असतं? थोरामोठ्यांनी आपल्या वाणीने सांगितलेले सुविचार, जे पदोपदी आपल्याला आचरणात आणावेत असं त्यांना वाटत असतं. जेणेकरून समाजात बोकाळत चाललेली असुरक्षितता, गुंडगिरी, स्वार्थीपणा कमी होईल आणि सगळीकडे सुखसमाधान नांदेल.
माझ्या मनात नेहमीच शंका उत्पन्न होते, किती जण असा स्वामी, संत, गुरूंची वाणी ऐकून लक्षात घेऊन आचरणात आणत असतील? किती प्रयत्न केला तरी मूळ स्वभाव बदलू शकतो का? त्यासाठी मनापासून साधनेची गरज असते. एखादा मनात उतरवलेला विचार आपोआप आचरणात येतो.
मी वर्तमानात अशा कितीतरी 'तिला' बदलताना बघितलंय. संतांमुळे नाही पण काही साध्या साध्या शिकवणींमुळे.
मनातलं शब्दात उतरवता येईल का माहीत नाही पण प्रयत्न करते.
१. आपल्या आजारी, दिव्यांग मुलाला घेऊन आशा दवाखान्यात आपला नंबर कधी येतो त्याची वाट बघत बसली होती. आजाराने त्रासलेला मुलगा तिला स्वस्थ बसू देत नव्हता. थोडयाचवेळात आशाचा संयम संपला आणि तिने मुलाला एक जोराचा फटका दिला. अचानक बसलेल्या फटक्याने मुलगा दचकून एकदम शांत झाला पण आजूबाजूला बसलेले पेशंट तिच्याकडे बघू लागले. ती पण वैतागलेली होती. 'कधी सुधारणार पोरगं काय माहीत? माझ्याच नशिबी हे का आलं?' अशी काहीशी ती बडबड करू लागली. इतक्यात समोरून एक सुशिक्षित, वयस्कर बाई आल्या. दोन तीनच वाक्यं त्यांनी आशाला सांगितली आणि तिच्या आचार विचारांना बदलायला ती वाक्य पुरेशी पडली. "अग त्या अधू मुलाला मारून तुला काय मिळणार? तो असं का करतो त्याचा विचार कर. त्याला जन्म देताना नकळत तू कुठेतरी कमी पडलीस म्हणून तो असा झाला. तू त्याची सामान्य मुलाप्रमाणे पोटात पूर्ण वाढ करू शकली नाहीस ही गोष्ट पक्की मनात ठेव आणि यापुढे त्याला वाढवताना त्याची प्रगती कशी होईल हा विचार कर." क्षणात आशाच्या मनात वीज चमकल्यासारखी झाली आणि आशाला स्वतःची चूक समजली. पुन्हा त्या बाळाला कधीही फटके न मारता प्रेम आणि प्रेमच मिळालं.
२. पुष्पा आणि तिच्या नवर्याची सतत भांडणं होत असत. वयाची साठी जवळ आली, दोघेही उच्चशिक्षित पण क्षुल्लक कारणांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वहायचे. पुष्पाच्या शेजारणीला हे त्यांचं रोजचं भांडण ऐकवत नसे. ती पुष्पापेक्षा वयाने बरीच लहान होती पण समजूतदारपणा कमालीचा होता. एकदिवस पुष्पाचा मूड बघून बोललीच, "तुम्ही नवर्याला शिव्या देऊन नवरा सुधारतो का? नाहीना. पण त्यामुळे तुमचं तोंड खराब होतंय. तुम्ही बोलणार्या समोरच्या प्रत्येकाशी तसंच बोलू लागलाय. त्यामुळे तुमच्या जवळची माणसं दूर जाऊ लागलीत. त्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा. शांत रहा आणि त्याला काय करायचं ते तो करतोच पण तुमच्या चिडण्यामुळे तो जास्तच तुम्हाला त्रास देतो. पुष्पाताई थोडा विचार करून बघा. मनातले वाईट विचार, जिभेवरचे वाईट शब्द झटकून टाका आणि मग बघा तुमचं आयुष्यच बदलेल." काय आश्चर्य, थोड्याच दिवसात दोघेही समाधानाने आपापल्या मार्गाने जात राहिले. दुरावलेली माणसं पुष्पाच्या जवळ येऊ लागली. पुष्पाची कामवाली शेजारणीला दुवा देऊ लागली.
३. मंगला नोकरीत वरच्या पोस्टवर काम करत होती. पण अति संशयी. हाताखालचे लोक तिला मुद्दाम त्रास देतात, नीट काम करत नाहीत म्हणून त्रासलेली असायची. शेजारणीच्या मुलाने छोटंसं कुत्र्याचं पिल्लू पाळलं तर हिला त्याचा पण राग आला. शेजारीण संध्याकाळी गप्पा मारायला आली की ही आजिबात सरळ बोलायची नाही. मग ते पिल्लू येताजाता तिचा रस्ता अडवायचं. त्याला बाजूला करायला शेजारीण किंवा तिचा मुलगा यायचा आणि अगदी प्रेमाने पिल्लाशी बोलायचे. मंगला ते बघून मनातून हळू हळू विरघळू लागली. शेजारीण सांगायची, "या प्राण्यांच्या अंगावरून हात फिरवला, त्यांच्याशी बोलताना त्याने शेपूट हलवताना बघितलं की आपल्याला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसतं. एकदा तरी हा अनुभव घेऊन पहा, कळेल तुम्हाला." मंगला थोड्याच दिवसात त्या पिल्लावर प्रेम करायला लागली आणि मनातलं नैराश्य पार पळून गेलं. पिल्लाशी तिचं वागणं प्रेमाचं झालंच पण इतरांवर रागावणं पण कमी झालं.
४. एकदा स्वाती खूप नाराज होती, अस्वस्थ होती. अकारण फोनवरून तिची नणंद तिला बोलबोल बोलली होती. अतिच झाल्यावर स्वाती देखील बोलली. अगदी साध्या कारणावरून दोघींच्यात तणाव निर्माण झाला. तिला काय करावं ते कळेना. संतापाने, निराशेने तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. योगायोगाने त्याच वेळी तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला. बोलता बोलता स्वाती मनातलं सगळं सांगून गेली, "स्वाती, समोरचा माणूस जेव्हा चिडतो ना तेव्हा समजायचं की, एखादी परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली आहे. माणसाला राग येतो, जेव्हा परिस्थिती आटोक्यात येत नाही तेव्हा. तो राग तुझ्यावर निघाला इतकंच, असं समज. बघ असा विचार करून. तुझं तुलाच शांत वाटेल आणि वेळ जाऊदे थोडा, सगळं पुन्हा सुरळीत होईल." सहाजिकच दोन दिवसांनी माफीचा फोन स्वातीला आला आणि मनातले किल्मिश दूर झाले. तेव्हापासून स्वातीचे फारसे कोणाशी भांडण झाले नाही.
५. अलका निराश झाली होती. प्रत्येकवेळी सासरचे लोक आले की तिने सजवलेल्या घरातले आवडलेल्या वस्तु घेऊन जायचे आणि फार निराश व्हायची अलका. कोणाला कशाला नाही म्हणणे तिला जमत नव्हते पण नंतर तिला फार मनःस्ताप होत असे. एकदा तिने ही खंत तिच्या ताईला सांगितली, "अलका, त्यांना सांग, जे काय पाहिजे, आवडले ते घेऊन जा. फक्त माझा गुणी नवरा माझ्याजवळ ठेवा म्हणजे झालं. अग, या गोष्टी पुन्हा कधीही तू घेऊ शकतेस पण त्यांच्या वाकड्यात जाऊन नवरा गमावू नकोस." एखादं वादळ/कोसळता पाऊस शांत होतो तसं वाटलं अलकाला. पुन्हा कधीच त्यांच्या मागणीचा तिला त्रास झाला नाही.
किती साध्या साध्या गोष्टी असतात ना? विचार करण्याचा मार्ग बदलला की सगळी परिस्थिती बदलू शकते. मला नेहमीच वाटतं, मनात ताणतणाव असताना आपण योग्य विचार करू शकत नाही पण तेच जर दुसर्या समजूतदार व्यक्तिला आपलं संकट सांगितलं तर नक्कीच मार्ग निघू शकतो. आयुष्य सुकर होऊ शकते.
त्यावेळी आपलं आयुष्य सुकर करणार्या या घटना कायमच्या मनावर कोरल्या जातात.
मी आजिबात म्हणत नाही ही संत वाचने आहेत, पण अशा कित्येक लोकांचे बिघडलेले संसार सुधारताना बघितलेत.
संत तरी काय सांगतात? जनामनात आनंद, सुख नांदावं हीच त्यांची मनोकामना असायची ना?
कोणी संत बनू नका पण समोरच्याची अडचण समजून घेता आली पाहिजे. त्यातून त्याला बाहेर काढता येईल का ते पहायला जमलं पाहिजे असं वाटतं.
मग सांगा ही छोटी छोटी, साधी साधी वाक्ये आणि सामान्यांचे अनुभवाचे बोल कुठल्या संत वचनांपेक्षा गौण कशी मानायची ?
राजेश्वरी
२९/०४/२०२१
