रविवार, २७ मार्च, २०२२

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण 

 पाचोळा - कुसुमाग्रज

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी
---------- --------------

एकदा ‘पाचोळा’ कविता वाचताना ओळखीची आहे, कधीतरी वाचलीय, ऐकलीय असं जाणवलं. कुठे ते कळत नव्हतं. आंतरजालावर शोध घेतला आणि आर्त स्वरातलं लताबाईंचं गाण ऐकायला मिळालं. गाणं ऐकता ऐकताच मनात भिनत जातं.
खरं तर, कविता सुरूवातीला वाचताना लयबद्ध, वास्तव निसर्ग असलेली वाटली. पुन्हा पुन्हा वाचत राहिले, पुन्हा पुन्हा ऐकत राहिले. खोलवर असलेला आर्त सुर वेगळाच काहीतरी संदेश देत होता.
काही कविता, वाचणार्याच्या मनातल्या त्यावेळी भावना असतील, तसे अर्थ सांगत जातात. माझ्याही मनात वेगवेगळे अर्थ येऊ लागले.
कधी आठवणींना मी पाचोळा समजले तर कधी मनातल्या इच्छांना...
पण प्रत्येकवेळा, 'नाही, असा नाही या कवितेचा अर्थ.' असं वाटायचं.
मग मीच माझ्या मनाला बजावलं, 'तू काढत असलेला अर्थ अगदीच निरर्थक आहे. या कवितेत लपलेला अर्थ वेगळाच आहे.'
खूप प्रयत्न केला पण आकलनापलीकडचं वाटत होतं सगळं. लताच्या आवाजातल्या शेवटच्या दोन ओळीतली वाढत जाणारी आर्तता ऐकली आणि त्या कवितेचा संबंध जगण्याशी लावला.
एकीकडे विचार आणि एकीकडे कामं सुरू होती..
अचानक, 'आई गेली' असा एका मित्राचा मेसेज आला.. आणि सोबत नातवाने आजीच्या आठवणी लिहिलेला लेख...
आजीची माया, आजीची शिकवण, आजीचे लाड आणि शेवटी आजीचे परावलंबित्व...
लेख वाचता वाचताच माझ्या मनात तुलना कवितेशी होत गेली....
वृक्ष म्हणजे आपल्या आजूबाजूचा समाज असं समजलं, तर समाजातली वृद्ध वयस्कर माणसं म्हणजे गळून पडलेली पिकली पानं म्हणजेच पाचोळा आहे.
तर पालवी म्हणजे तरुणपिढी. तारुण्यातली उभारी, मनातला ओलावा, मनाचा खंबीरपणा, तारुण्यातला जोश...
पण हे सगळं दिवसागणिक कमी होत जातं. त्यावेळी पानगळ सुरू होते.
त्या समाजातली पिकली पानं गळून पडलीत म्हणजे वृद्ध, म्हातारी लोकं, असहाय, एकाकी, जीवनातला रस गेल्याने वैराग्य आलेली. आजूबाजूच्या जगात घडणार्या गोष्टींची जाणीव त्यांना होत नसणारी. श्वास चालतोय म्हणून जगत रहाणारी...
कोणी कितीही आशेचे किरण दाखवले तरी फरक पडत नाही. ना मायेचा ओलावा त्यांना सुखावतो, ना अंधारातून त्यांना बाहेर पडावंसं वाटतं, ना कोणाची बोचरी वक्तव्यं त्यांच्या मनाला जाळून टाकतात. बिचारे मूकपणे सगळं सहन करत असतात. वाट पहात शांत पडून असतात उदासपणाने. कोणाची वाट पहायची तीही जाणीव नसते जणू.
वय वृद्धत्वाकडे झुकत असते... कर्म करण्याचं बळ कमी होत जातं.. आपण निरुपयोगी आहोत ही भावना सतावत असते... अपमान, दुरावा, दुर्लक्ष, त्यांचा इतरांना पडलेला विसर, नवीन पिढीचा माज... सगळं त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे आहे.
नवीन जन्म घेतलेले आपलेच जीव त्यांना हिणवतात, त्यांच्या असहायतेला हसतात...
अशावेळी आजूबाजूचे, जवळचे क्षुद्र जीव देखील त्यांच्या नाकारलेपणाचा आनंद घेतात हे दाखवण्यासाठी त्या क्षुद्र जीवांना गवताची पाती संबोधलं आहे.
कधीकाळी जो वाटसरु तापल्या, शिणलेल्या, परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेत मन शांत करायला त्यांच्या सानिध्यात आलेला असतो, म्हणजेच त्यांच्या उभरत्या काळात मदतीसाठी आलेला याचक असतो, नंतर तो देखील त्या दुर्बलांना पाचोळा समजून अजून खचून जायला भाग पाडतो.
इतके सगळे मानसिक त्रास होत असले, समजत असले तरीही तो जीव पाचोळा होऊन शांत निवांत शेवटच्या घटका मोजत पडून रहातो...
अखेर अचानक वार्याच्या झोक्या सारखा अंतिम क्षण वेगात येतो आणि पाचोळारूपी शरीरातून आत्म्याला दूर दूर घेऊन जातो..
सगळं कसं शांत, स्वच्छ, रिकामं होऊन जातं..
अंगण झाडून साफ केल्यासारखं..
पण ती रिकामी उदास जागा तरुवर लागलेल्या पालवीला, तुम्हीही पाचोळा होऊन पडून जाल अशी जाणीव देऊन जाते...
कधी कधी काव्याच्या शेवटच्या दोन ओळी त्या काव्याला वेगळंच वळण देऊन जातात. या कवितेत, 'तुम्हीही कधीतरी पिकलं पान होणार आहात. तुमच्यावर देखील पाचोळ्याचं आयुष्य येणार आहे, जीवनातली क्षणभंगुरता, शेवट अपरीहार्य आहे' हे प्रत्येकाला दर्शवतात.
वास्तवाचं भान देणारी ही कविता म्हणूनच मला जास्त भावते.

राजेश्वरी

पाचोळा - कुसुमाग्रज

कविता रसग्रहण    पाचोळा - कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकला विशाळ आणि त्याच्या बिलगूनिया पदास जीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा ये...